महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची सुरुवात केली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे असेल.
ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची राज्य सरकारची अनेक वर्षापासूनची योजना होती. त्या जागेबाबत तेथील पोटभाडेकरुने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून या न्यायालयीन लढ्यात अनेक जण सक्रीय सहभागी होते. मुंबई उच्च न्यायालयाने पोटभाडेकरुची याचिका फेटाळून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भिडे वाड्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी फुले दाम्पत्याच्या कार्याला साजेसे भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य सरकारच्यावतीने उभारले जाणार आहे.

भिडे वाडा आणि मुलींची शाळा
भिडे वाडा आणि फुले दांपत्य यांचा फार जवळचा संबंध त्या काळामध्ये होता. भिडे वाडा पुण्यातील बुधवार पेठ मध्ये आहे. हा भिडे वाडा त्या काळामध्ये अनेक सामाजिक चळवळीचे केंद्र बनलेला होता. या वाड्याचे मालक तात्यासाहेब भिडे हे समाजकार्यात आघाडीवर होते. अतिशय उदारमतवादी होते. त्यांचा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा घनिष्ठ संबंध होता.
एके दिवशी जोतीराव हे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यावर आले आणि त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे सांगितले. त्यावर दोघांमध्ये चर्चा झाली आणि तात्यासाहेब भिडे यांनी आपल्या वाड्यातील जागा देण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे भिडे यांनी कोणतेही भाडे न घेता या चांगल्या कामासाठी त्यांनी आपला वाडा देण्यास परवानगी दिली. त्यांनी ही शाळा चालवण्यासाठी दरमहा पाच रुपये देणगी देण्याचे ही कबूल केले तसेच सुरुवातीच्या खर्चासाठी त्यांनी एकशे एक रुपयांची देणगी दिल्याची नोंद पहावयास मिळते. अशाप्रकारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू करण्यास जागा मिळाली आणि तारीख १ जानेवारी १८४८ या दिवशी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा प्रारंभ केली. त्यामुळे या दिवसाला ही महत्त्व आहे.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी शाळा सुरू केली त्या भिडे वाड्यालाही महत्त्व आहे.
सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. पहिल्यांदा जोतीरावांनी आपल्या मित्र परिवारातील सहकाऱ्यांची भेट घेऊन शाळेबाबत ची माहिती दिली आणि आपल्या मुलींना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे सुरुवातीला एकूण सहा मुली या शाळेमध्ये दाखल झाल्या. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख माधवी थत्ते, सोनू पवार आणि जानी कर्डिले. अशाप्रकारे या सहा मुलींपैकी चार ब्राह्मण, एक धनगर आणि एक मराठा अशा समाजाच्या होत्या. अशी ही भारतातील भिडे वाड्यात सुरू झालेली पहिली मुलींची शाळा होती. राष्ट्रीय स्मारकाचा जो प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता तो आता न्यायालयाच्या निर्णयाने सुटलेला आहे. या भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे. ही सर्व मराठी बांधवांसाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे.

— लेखन : डॉ.संभाजी खराट
(लेखक सामाजिक चळवळीचे अभ्यासक आहेत)
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800