प्रिय आई,
अग तू किती साधी तूला कश्याचाच हव्यास नाही. तूला फक्त सर्वांनी एकत्र यावं, हसत खेळत राहावं हिच तुझी साधी अपेक्षा. याच अपेक्षेने तू किती जणांशी जोडली होती. आपलं कुटूंब किती मोठं, सतत काका, मामा, चूलते घरी पाहूण्याची रेलचेल चालूच असे.
तू तुझ्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठी. तू एकटीच, बाकी भावंड सगळी सावत्र, तूला पाच बहिणी दोन भाऊ. तू लहान असतानाच म्हणजे एक दिड वर्षांची असतानाच तुझी आई, म्हणजे माझी आज्जी वारली. तुझ्या वडिलांनी (आजोबांनी) तू लहान म्हणून दुसरं लग्न केलं. तुझी जन्मतारीख पण तुलाच काय, कूणालाच माहित नव्हती.

आई, तुला मग लागोपाठ भावंड झाल्यामुळे तुझं शिक्षण झाले नाही. लहान लहान भावंडाना सांभाळण्यात व बारीक सारीक घरकामात तु शाळेत गेली नाही. पण तुला अभ्यासाची खुप आवड होती. तुझी भावंड अभ्यासाला बसली की तू काम आटपून अक्षर ओळख शिकत गेली. मग हळू हळू ती अक्षरं स्वतःच गिरवून गिरवत वाचत गेली. मग तू रोज एक एक प्रत्येक देवाचं, देवीचं नावं गिरवत गेली व हळूहळू पुस्तक वाचायला पण शिकली. अग, तुझ्यात सरस्वती देवी उपजतच होती. तुझं नाव पण किती सुंदर कस्तूरी. सर्वांना सुगंधित करणारी.
आम्ही भावंडे लहान होतो. तेव्हा समजत नव्हतं, पण आई तुझा वाढदिवस कधीच साजरा केला गेला नाही याची खंत वाटते. कारण तारीखच माहित नव्हती. आमचे वाढदिवस तू खुप आवडीने करत असे. आम्हांला न चुकता त्या दिवशी नविन कपडे घालायला लावायची व आम्हांला ओवाळायची मग देवळात नेऊन देवाला नमस्कार करून सुटे पैसे देवाच्या पेटीत घालायला सांगायची.

पण मी थोडी मोठी झाल्यावर ठरवायची की दिवाळीत लक्ष्मी पूजनला तुझा वाढदिवस साजरा करायचा व तूला ओवाळायचं, माझी अशी खूप इच्छा असायची, कारण त्यादिवशी तू खूप सुदंर अशी लक्ष्मी सारखी भासायची, मस्त दिसायची. तूला एक तेज येत असे. लक्ष्मी पूजेची तयारी करताना आम्ही तुला पाहायचो. साडी, दागिन्यांनी तू देवीला छान सजवायची. मिठाई, फळं, फराळ ठेवायची. तेंव्हा आपल्या घरी लक्ष्मीला नमस्कार करायला शेजारपाजार येत असे. त्याच दिवशी तुलाच लक्ष्मी म्हणून तूलाच ओवाळावेसे वाटे. पण तसे करायचे काहीना काही कारणाने राहून जायचे ते राहूनच गेले. ते खुप वाईट वाटतेच.
पण आई, तू लक्ष्मी पूजनच्याच दिवशी पूर्ण पूजा झाल्यावर वयाच्या ऐंशीला तू शांत होत स्वर्गवासी झाली. खरंच आई, दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यावर मी शांत बसते. मन शांत करत तूला स्मरते. मला तू लक्ष्मी रूपात दिसते. किती भाग्यवान आहेस तू, प्रत्येक लक्ष्मी पूजनला मी तुझ्या आठवणीत तुला स्मरतच लक्ष्मीपूजन करते.
तुझी लेक (माई).

— लेखन : सौ.पूर्णिमा शेंडे (कोल्हापूरे). मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
khup chhan lihile . adaranjali