पाण्यातले दिवस
‘पाण्यातले दिवस’ हे प्रल्हाद जाधव यांचे हे अवघ्या ६५ पृष्ठांचे राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेले ललित सुंदर व दुर्मीळ पुस्तक ! प्रकाशनाचा काळ दिलेला नाही. तेव्हाची किंमत होती रुपये ३०/- फक्त.
निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला अंगभूत सौंदर्य असते. बाह्यत्कारी सौंदर्याचा आस्वाद नजरेने घेणे ही सुखद बाब आहे, त्याहीपेक्षा आंतरिक सौंदर्याचा आस्वाद घेणे हा स्वर्गीय आनंदाचा ठेवा आहे. मात्र त्यासाठी जसा पाण्यात डोळे उघडे ठेवण्याचा सराव हवा, तसाच कल्पनेचा एक डोळा उघडा ठेवण्याचा सराव असणे आवश्यक आहे. असा कल्पनेचा डोळा उघडा ठेवून नदी, मासे, मासेमारी आणि अन्य जलचरांच्या संगतीत घालवलेले पाण्यातले दिवस असे सार मलपृष्ठावरील ब्लर्ब्जमध्ये व्यक्त झालेले आहे. Give a man a fish, and you feed him for a day.
Teach a man to fish and you feed him for a lifetime ही चिनी म्हण सुरुवातीला असून हे पुस्तक आईला ; झर्यावरच्या धुक्याला अर्पण केलेले आहे. अर्पण पत्रिकेत एक वेगळेपण आहे. या पुस्तकातील ललित लेखांना एक, दोन, तीन अशी आठपर्यंत शीर्षके दिली आहेत.

पहिल्या ललित लेखात लेखकाचा मासेमारीशी आता काहीही संबंध राहिलेला नसला तरी काही क्षण त्यांना भूतकाळाच्या काठावर ओढून नेतात आणि मासेमारीसंबंधीच्या आठवणीत चिंब भिजवून टाकतात. मग त्यांना लहाणपणीचा प्रसंग आठवतो. “तू मोठा झाल्यावर आंगठेबहाद्दर होणार की सहीबहाद्दर?” असे त्यांना आजोबा विचारतात तेव्हा ते “आंगठेबहाद्दर” असे उत्तर देतात. घरातली मंडळी खो खो हसतात. “मी तुला मासे मारायला शिकवीन” असे आजोबा म्हणतात. पण आजोबांकडून त्यांना मासेमारी शिकण्याची संधी मिळाली नाही पण त्या क्षणी त्यांच्या मनावर मासेमारीचा संस्कार झाला. तो पहिला धडा मनाच्या पाटीवर कोरला गेला. त्यातूनच त्यांना मासेमारीचा छंद लागला. बालपणाची ८-१० वर्षे या छंदात गेली. अजूनही त्या दिवसांची नशा उतरलेली नाही.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे त्यांचे गाव. तेथे ते जेव्हा जेव्हा जातात तेव्हा सावित्री नदीवर फेरफटका मारतात. या सावित्री नदीचे मोठे हदयंगम वर्णन या लेखात आहे. त्यांची आई सावित्रीचा उल्लेख ‘गंगामाई’ अशी करायची. ‘सारे काही त्या गंगामाईलाच ठाऊक आहे’ असे ती गूढ बोलायची. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहात जाणारी ती एकमेव नदी आहे. सावित्रीने पोलादपूरला आपल्या कुशीत जागा दिली आहे असे ते सुंदर वर्णन करतात. तिच्यातील डोह, तिला मिळणारा ओढा, ‘गाढववळण’, ‘बेडकी ‘संगम, ‘जुटा’ बेट, ‘हंडी ‘डोह,’ कोंडी ‘डोहाची विविध प्रकारच्या माशांच्या आकर्षणास कारणीभूत ठरलेली विलक्षण अंतर्गत रचना, तेथे मासेमारी करणे कसे आव्हान असते त्याचे ललित सुंदर वर्णन यात आहे. पोलादपूरला त्यांचे आज्या आले की ते त्यांना वांबी मारण्यासाठी घेऊन जात. त्यांच्या सोबतचे क्षण म्हणजे त्यांना असीम सुखाचा ठेवा वाटतो. ‘हंडी’ डोहाचे वर्णन आहे. बेडकी, उंबराची फुगी, बामणाचा पाणवठा, हत्तीमहाल, चिखलीची बाग, गंगाबायचा घाट यांचे अंगभूत सौंदर्य आहे. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी कल्पनेचा एक अंत:चक्षू उघडा करता येण्याचा सराव हवा असे लेखक सांगतो. सावित्रीत डुंबण्यात आणि मासेमारी करण्यात त्यांचे बालपण गेले. त्या ओल्या दिवसांच्या आठवणी त्यांचे जीवन व्यापून उरल्या आहेत. सावित्रीच्या पाण्यात उडी मारुन बाहेर पडल्यावर जे सुख अंगावरुन निथळत राहते त्याला कुठेही तोड नाही असे ते सांगतात.
दुसर्या ललित लेखात लहानपणी घरात अवती-भवती असलेले मासेमारीचे वातावरण, माशांच्या शिकारीच्या सुरस व चमत्कारिक कथा, त्या वातावरणाचा त्यांच्यावर हळूहळू पडलेला प्रभाव यात वर्णन केला आहे. लहानपणी एकदा रामचंद्र तात्या त्यांना पाठीवर बसवून वांबी मारायला घेऊन जातात. तात्यांच्या गळ्याभोवतीचा हात सुटून ते पाण्यात कोसळतात व तळालाच जातात व एका आंतरिक प्रेरणेने ते पाण्यावर पहिला हात मारतात. त्या क्षणी त्यांच्यात जो आत्मविश्वास निर्माण होतो आणि जो आनंद मिळतो तसा त्यांना नंतर केव्हाही मिळाला नाही असे ते सांगतात. त्या क्षणापासून त्यांची सावित्रीशी कायमची दोस्ती झाली.आजोबांनी आहीर मारल्याची गोष्ट लेखकाला आजही आठवते. अंगाला अतिशय बळकी असलेला हा मासा. त्याची शिकार करायला फार मोठा अनुभव व कसब लागते. गावातल्या कोंबड्या गायब व्हायला लागल्या तसे गावकरी संभ्रमात पडले. आजोबांनी कोंबडीचोर आहीर शोधला व त्याला पकडून घरी आणले. मासेमारीच्या वेगवेगळ्या पध्दती, कोलंबी जिला काळीज नसते व खेकडे , कोलंब्या पकडण्यासाठी आजोबांनी सांगितलेली सोपी युक्ती, माशांचे विविध प्रकार, मासेमारीच्या विविध पद्धती यात वर्णन केले आहे. मासेमारीचे पारंपरिक शास्त्र हे सूक्ष्म निरीक्षणावर, मासेमारांच्या स्वानुभवावर आणि त्यांच्या दांडग्या मेहनतीवर आधारलेले आहे असे लेखक सांगतात. जगात माशांच्या सुमारे २१,००० जाती आहेत. त्यातील दीड हजारहून अधिक जातीचे मासे भारतात सापडतात. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी पट्ट्यात, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव येथील धरणांच्या मोठ्या संख्येमुळे आढळणारी मासे, चवीच्या क्रमवारीनुसार मासे याचे मोठे रंजक वर्णन यात आहे.
तिसऱ्या ललित लेखात गळाला कोणकोणत्या प्रकारचे आमीष (आवीस) लावले जाते याचे रंजक वर्णन केले आहे. त्यामध्ये गांडूळ, लहान लहान कोलंब्या, मळ्याचा मासा, भिंगुर्डा, पितुर्डी, बेडूक, हिरवा टोळ असे आमिष लावलेल्या गळाचे विविध प्रकार कळतात. माश्यांच्या सवयी, मासेमारीच्या पध्दती यांचे ललित सुंदर वर्णन यात आहे.
चौथ्या ललित लेखात गळाने मासे मारणे हा काहींचा छंद आहे तर त्यावरही उपजीविका करणारे मासेमार आहे याबाबत वर्णन आहे. गळाने मासेमारी करणारा माणूस हा जवळजवळ समाधी अवस्थेप्रत पोहोचलेला असतो आणि त्याच्यात आणि निसर्गात अद्वैत निर्माण झाले असते असा सुंदर विचार मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, नेपोलियन यांची उदाहरणे याठिकाणी दिलेली आहेत. गळाने मासे मारायची साधने यांचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. गळाने मासे मारणे ही साधना आहे आणि नशीबाचाही भाग आहे. त्यातील डावपेच आणि मासोळींच्या चाली. मासा आणि माणूस यातील संघर्ष अशा अनेक पैलूंचे यात ललित सुंदर वर्णन केलेले आहे.
पाचव्या लेखात गरवणे या मासेमारीच्या अवघड पध्दतीबद्दल वर्णन आहे. पाण्यात बुडी मारुन माशाच्या निवासस्थानाचा शोध घेऊन आमीष थेट माशाच्या तोंडासमोरच खेळवणे व त्याने त्यावर चावा टाकताच त्याला फारुन बाहेर काढणे अशी ही पध्दत असते. आहिराच्या शिकारीसाठी शेराच्या झाडाचा चीक मारणे, डोहात तिसळाचे (तिरफळाचे) कूट टाकून मासेमारी करणे, पागाने मासे मारणे, कंडाळ पाण्यात सोडणे, मत्स्यसंवर्धन, बांधण घालणे, खवल मारण्यासाठी पालवणे ही पध्दत, गॅसची बत्ती खांद्यावर घेऊन नदीच्या काठाने मासे मारायला जाणे, पर्या आटवणे, वल्गन लागणे अशा विविध पध्दतींचे वर्णन केलेले आहे.
सहाव्या लेखात आहीर या दुर्मीळ आणि शक्तिशाली माशाच्या शिकारीसाठी वापरात असलेल्या चीक मारणे या पध्दतीबाबत वर्णन आहे. आहिराच्या शिकारीची साधने, आहिराचे मर्मस्थान कल्ला, सुसरीची शिकार यांचे यात वर्णन आहे. केवळ गळाच्या साहाय्याने सुसरीची शिकार करणारे त्यांचे आईचे वडील, खेडजवळ भोस्ते हे लेखकाचे आजोळ. तिथल्या नदीत सुसरी फार असत.
सातव्या लेखात पेटलेल्या टायरच्या प्रकाशात खेकडी पकडायला जाण्याचा रोमहर्षक अनुभव , खेकड्याच्या जाती खेकडी पकडण्याच्या पद्धती, कोईण टोपली, मुठे पकडणे, खेकडी भरडणे खेकडे नांगवणे,नदी अवधीला येणे इ. बारकाईने रंजक वर्णन केलेले आहे.
आठव्या प्रकरणात माशाचे डोळे सदैव उघडे असतात. त्याच्या डोळ्यांना पापण्याच नसतात. डोळे उघडे ठेवूनच त्याला झोप घ्यावी लागते. माशाच्या पोटातील पिशवी, तिचा ध्वनी काढण्यासाठी होणारा उपयोग, माशांच्या मनातील भाव-भावनांची देवाण-घेवाण डोळ्यांनी होते, ट्यूना नावाचा गाणारा मासा, भावना व्यक्त करण्यासाठी मासे रंग बदलतात, माशांचे गंधज्ञान, त्यांची वाढ कधीही खुंटत नाही, वजनदार मासे, माशांचे प्रजनन, माशांच्या जगतातील वैचित्र्य, तिलापिया, समुद्रकडी, डाॅक्टर मासा, लचूक अशी आश्चर्यकारक व रंजक माहिती यात दिलेली आहे. मासे स्वतःची वीज स्वतः निर्माण करु शकतात. मत्स्यावतार, मत्स्यकन्या, मछींद्रनाथ, मनू आणि मासा इ. अनेक उल्लेख या ललित लेखात आलेले आहेत.
दिनकर गांगल ह्यांनी थोरो, दुर्गा भागवत आणि प्रल्हाद हा लेखकावर थिंक महाराष्ट्र पोर्टलवर लिहिलेला लेख आवर्जून वाचावा असा आहे. त्यात त्यांनी प्रल्हाद जाधव यांची लेखणी अतिशय हळूवार व तरल असल्याचे व त्यांच्या लेखणीत जरुर तेव्हा नाट्यत्मक्ता येते तसेच त्यांचे विषयवैविध्य विस्तृत आहे असे नमूद केलेले आहे. १३ नाटके, ९ एकांकिका, रानभूल, तांबट, आनंद नक्षत्र, आनंदाची मूळाक्षरे, गॅलरीतली रातराणी, प्रसिध्दी आणि प्रतिमा, हिमाक्षरे इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. पाण्यातले दिवस हे त्यातले ललित सुंदर आणि रंजक असे पुस्तक आहे !

— लेखन : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800