सत्तेचा महिषासूर जगती
प्रलयंकारी, महाभयकारी
मद, मत्सर, मोहाच्या पायी
न्यायनिपुणता नीतीस मारी
ज्याची सत्ता त्याची मत्ता
ज्याचा मलिदा त्याला लत्ता
मदांध सत्ताधा-यांपुढती
मान तुकविते बापुडी जनता
गुणवत्तेला नाही थारा
रत्नपारखी बाजूस सारा
अंदाधुंदी, बजबजपुरी
राजकारणी खेळच न्यारा
अंधश्रध्दा, रोगराई
निरक्षरता गावोगावी
संधिसाधू, भोंदूंची चंगळ
दैत्य माजले जागोजागी
आई जगदंबे, करवीरवासिनी
तुळजापुरची माय भवानी
जोगेश्र्वरी, योगेश्र्वरी,
काली विंध्यवासिनी, वरददायिनी
येई धावूनि अस्त्र परजुनि
रिपुसंहारा कृध्द होऊनि
सौदामिनीसम तव चापल्ये
दमन करावे कृतांत होऊनि
एकच आशा मनी ठेवितो
शरद ऋतुच्या प्रसन्नकाली
प्रतिपदेला अश्र्विन मासी
धरतीवर ये माय माऊली
पूजन, अर्चन तुझेच करितो
उदे ग अंबे उदे
समाधान, सुख, शांति मिळावी
असाच वर तूं दे.

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कविता फारच छान आहे.