Wednesday, September 17, 2025

ललित

आठवणींचा कलश

कधीकधी आतून आपण ओथंबून येतो. गहिवर दाटून येतो.
नकळत दुपारचे शांत ऊन हातावर झेलताना खूप साऱ्या आठवणी दाटून येतात.
काही गोड काही कडू. काही आंबट, तुरट, खारट तर काही मधुर. फुलपाखरं जशी फुलावर रुंजी घालतात तश्याच ह्या आठवणी आपल्या भोवती भिरभिरतात.
बालपणापासून ते तारुण्य आणि तारुण्य ते प्रौढावस्था. असा हा आठवणीचा प्रवास सुरू असतो. अलगद पावसाचा थेंब झेलावा, त्याचा गारवा मनात शिरावा तश्या आठवणी मनाला बिलगून येतात आणि मनाचं रीतेपण भरून येत.. मन मोहरतं.

लहानपणी चिमणीच्या दाताने तोडलेले चॉकलेट अजुनही आठवतं. ती गोड आठवण मोठ अजुनही रुंजी घालते. कट्टी दोस्ती मधील गोड़वा किती सुखद असतो. दोन निरागस मनाचा मेळ आयुष्यभर सोबत असतो. आपण खरच ते बाळपणीचे मित्र विसरु शकतो का ? सांगा ?

शाळा हे तर आठवणी चे मोठे दालन आहे. तिथलें गुरुजी किंवा बाई, मित्र, मधली सुट्टी, खाल्लेला डबा, तो अभ्यास आणि गृहपाठ न केल्यास मिळालेला धम्मक लाडू. पण त्यातही जीव होता, प्रेम होते म्हणून आजही शाळेतल्या बाई आपल्याला आठवतात. ती न विसरता येणारी आठवण न्हवे साठवण आहे.

वय वाढत असतं. प्राथमिक शाळेतल्या आठवणीना बिलगुन माध्यमिक शाळा येते. तिथल्या मॅडम, सर वाढ़ता अभ्यासा सोबत काही कोमल अंकुर मनात घेऊन येतो. मन या फुला वरुन त्या फुला कड़े धावते.
दोन वेण्याच्या रिबिनी सूटत जातात आणि मन साईसुटयो करीत सुटते. रिबिनाची आठवण आपले टोक मनाच्या काठावर नकळत विसावते. हलकेच सुटुन ही जाते.
लाल रिबिनीची रेघ
घेते अंतराचा ठाव.
किती कापले अंतर
परी मन घेते धाव.

अश्या गोड आणि निष्पाप आठवणीत काही कडू कारल्यागत आठवणी ही असतात.
किशोर वयात काही टारगट मुलां नी दिलेला त्रास कधी उमलत्या कळीला भोगावा लागतो. कळी उमलण्या आधीच कोमेजुन जाते.

कधी कधी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू आपल्याला खोल जखम करून जातो. ही कटू आठवण चिरकाल मनाला भेदून जाते. माझी वाडयातली आई, तिचं जाण ही नकळत्या वयात चटका लावणारी आठवण.
मग एकेक जवळची माणसं जात गेली. हृदयाच्या कप्यात खोल जखमा होत गेल्या. आई, बाबा, लेक, आणिक कितीतरी मित्र, नातलग..
एक नकळत अजूनही हलकीशी कळ मनात रुतून बसते.
सोबत गोड आठवणी येतात. मोहरल्या आंब्याचा सुगंध जसा दर्वळतो तश्याच या आठवणी गोड गुलाबी. लग्न, मूलं, त्यांची शिक्षण, लग्न, होणारी नातवंडं आणि गोड गोड पापी अश्याच सुंदर आठवणी घेऊन आपण जगत असतो.

आठवणीचा गोल पिसारा
असाच गरगरे देहभर
भरतो कलश मग मनाचा
आठवणी फिरती मनभर.
म्हणून माणसाने कायम
हसत राहावे. एकमेकांना हात द्यावा.
आणि सुखद आठवणीने मनाचा कलश भरता ठेवावा.

अनुपमा मुंजे

— लेखन : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं