राजस्थान म्हणजे हस्तकला, वास्तूकला, ह्यांचं माहेर घर. रंग बिरंगी सौंदर्यच मनोहर रूप. उंटाच्या मदमस्त चालीत बहरणारं राज्य. आपल्या अनोख्या नृत्य शैली ने मोहवणारं राज्य. वाळवंटात ही सुंदर रांगोळी रेखाटणारं राज्य म्हणजे राजस्थान आणि जेव्हा त्याच्या विज्ञापनात, “राजस्थान मेरी जान” असं म्हटलं जातं तेव्हा ते अक्षरशः सत्यच असतं.
हे राज्य मला अनेक कारणांमुळे आवडतं.
ह्या राज्यातील अगणित सुंदर वास्तू आपल्या सौंदर्याने माणसाला अक्षरशः वेड लावतात.
जयपुर ही ह्या राज्याची राजधानी. इथले भव्य किल्ले, महाल आणि झील (सरोवर) हे पर्यटकांना आकृष्ट करतात. पर्यटक इथे आले की वेगळ्याच दुनियेत आल्या सारखे देहभान विसरतात. चंद्र महाल, हवामहाल, आमेर दुर्ग दृष्टीला भुरळ पाडतात.

गवर्नमेंट सेंट्रल हॉलमध्ये हस्तीदंताच्या कलाकृती, वस्त्राभूषण, नक्षीदार काष्ठ कृती, संगमरवरी प्रतिमा, लघुचित्र, शस्त्र इत्यादींचा भरपूर मोठा खजिनाच सापडतो.
शाही बत्तखांच्या शिकारी साठी एका झीलमध्ये बांधलेला, जलमहाल हा अतिशय सुंदर आणि अद्भुत महाल आहे.
कनक वृंदावन हे प्राचीन गोविंददेव विग्रह साठी मंदिरांचा सुंदर समूह आहे.
ब्लू पॉटरी, रत्नाभूषण, मीनाकारी आणि राजस्थानी मोजडी ह्या इथल्या प्रसिद्ध असलेल्या वस्तू.
इथली, माऊंट आबू, देलवाडा मंदिर वाघांची तीन अभयारण्य (मुकुंदरा हिल्स, रणथंबौर आणि सरिस्का आणि भरतपुर) हे देखील एक वैशिष्ट्य आहे.
जैसलमेर, धौलपुर, बिकानेर, ह्या शहरांची अमिट छाप मनावर घेऊनच आपण इथून जातो.
उदयपुरला तर “झीलों का शहर” म्हटलं गेलं आहे. शांत सरोवरां भोवती उच्च कोटीच्या वास्तूंनी सुसज्ज हे शहर म्हणजे नयनाभिराम शहर. ह्या शहराचे सौंदर्य डोळ्यांना आल्हाद देणारे, वास्तू आश्चर्य चकित करणाऱ्या आणि त्या वास्तूंचे नक्षीकाम खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
एकूण हे राज्य जरी वाळवंटात असलं तरी सौंदर्य आपल्या आत समावून, येणाऱ्याला वेड लावणारं आहे.
जर आपण ट्रेन ने प्रवास केला तर ह्या राज्याच्या वाळूचे कण भराभर आपल्या स्वागतार्थ धावून येतात. जर ए.सी. क्लासमध्ये असाल तर ठीक अन्यथा तुम्हांला आपल्या खिडक्या बंद कराव्याच लागतील. नाहीतर ही वाळू तुम्हांला प्रेमाने कवटाळेल आणि त्या प्रेमात तुम्ही माखून निघाल.
ह्या राज्यात गाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. उंच स्वरात आणि पूर्ण रंगात येऊन गायक गातात आणि हातात दोन चिक्कण दगडाचे तुकडे चिपळ्यांसारखे वाजवत असतात बरोबर सारंगी ही साथ देते.
रंगीत फेटे लावलेले पुरुष आणि मुलं जेव्हा गाणी गातात तेव्हा आपले पाय आपसूकच ठेका धरू लागतात.
पधारो म्हारे देस..अशी साद ते गायक घालतात.
छोट्या छोट्या आरश्यांनी सजवलेले रंगीबेरंगी लहंगे आणि त्यावर सुंदर भरतकाम केलेल्या चोळ्या घातलेल्या स्त्रिया डोक्यावर ओढणीचा पदर घेऊन कपाळावर नाजुक नक्षीदार मांगटीका लावून, हातात हस्तीदंताच्या बांगड्या (ज्या दंडावर पण असतात) घालून वावरताना दिसतात. येता जाता. घणी खम्मा, खम्मा घणी हे शब्द खूपच आपुलकीचे आणि गोड वाटतात.
इथल्या खाण्यात बेसनाचे पदार्थ भरपूर असतात. इथे अलोवेराची भाजी प्रसिद्ध आहे. दाल बाटी चूरमा गट्टे की सब्जी, पापड ची भाजी आणि मांसाहारी पदार्थ हे वैशिष्ट्य आहे. आंबट, गोड आणि तिखट असं हे जेवण अतिशय स्वादिष्ट असतं.
राजस्थानचे घूमर आणि कालबेलिया हे नृत्य प्रसिद्ध तर आहेतच पण त्याचा ठेका, त्यांची लय ही, बघणाऱ्या नाचायला लावतात.

इतकं सुंदर, हे वाळवंटातील राज्य मला अतिशय आवडतं. त्याचं वर्णन करताना इतकं भरभरून लिहावंसं वाटत की शब्द आणि विचार कमी पडतात.
माणसाने आपल्या आयुष्यात ह्या सुंदर राज्यात एकदा तरी जाऊन यावे. भारताला गर्वोन्नत करणारे हे राज्य भारत भू खंडाला एक आगळं वेगळं सौंदर्य प्रदान करणारं आहे.
आणि मला आपल्या प्रेमात पाडणारं.

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800