सहकार क्षेत्र हि पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असल्याचे बोलले जाते. कोकणात सहकार क्षेत्र रुजत नाही पण याला वसई विकास सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रातील वावर बघितल्यावर छेद देण्याचे काम झाले आहे. सहकार क्षेत्राच्या कक्षा रुंदावतानांच वसई विकास सहकारी बँकेने सभासदाच्या मुलाच्या मधील गुणांचा गौरव करून एक चांगला पायंडा पाडला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी वसई येथे केले. ते वसई विकास सहकारी बँकेने आयोजित केलेल्या गुण गौरव समारंभात बोलत होते. मुलांनी आपले आवडते क्षेत्र निवडून त्यात करियर केल्यास अपयश येणार नाही असा सल्ला दिला.
वसई विकास बँकेच्या सभासद व सभासदांच्या मुलांचा ‘गुणगौरव समारंभ नुकताच समाज मंदिर सभागृह, न्यू इंग्लीश स्कूल समोर, वसई येथे संपन्न झाला समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवेंद्र भुजबळ, निवृत माहिती संचालक, महाराष्ट्र शासन हे उपस्थित होते. त्यांच्या बरोबर आकाशवाणीचे निवृत्त सह संचालक भूपेंद्र मेस्त्री, समाज मंदिर ट्रस्टचे नितीन म्हात्रे, सोमवंशी क्षत्रिय समाज महा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, वसई विकास बँकेचे माजी चेअरमन जगदीश राऊत व सुरेश चौधरी, माजी महापौर प्रवीण शेट्टी, बँकेचे चेअरमन आशय राऊत, व्हा.चेअरमन शिरीष राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप यशवंत ठाकूर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन आशय राऊत आणि बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बँकेचे ग्राहक आणि सभासद होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेत्या सुजाता तुस्कानो यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कला गुणांनी ठसा उमटविलेल्याचा सत्कार हि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे १० वी ते पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रपती पदक विजेत्या सुजाता तुस्कानो यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे काम करत राहिल्यावर त्याचे फळ हे मिळते. आरोग्य केंद्रात काम करताना अनेक समस्या आल्या तरी त्यावर मात करून मी माझे ध्येय गाठले आहे. यावेळी त्यांनी अनेक घटनांचा उल्लेख केला. त्यात मीरारोड आणि भाईंदरच्या मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडल्याची ओळख असेल किंवा चेना ब्रिज जवळ झालेल्या बस अपघातातील जखमींवर केलेले उपचार असतील यावर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वीरेंद्र पाटील यांनी केले. तर आभार बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत यांनी मानले. कार्यक्रमास विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : मच्छिंद्र चव्हाण.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800