या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
दुर्गा सप्तशतीचा पाठ केला. दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यावर आश्चर्य वाटतं. नऊ दिवस नऊ रात्र देवीने महादुष्ट, महाबलाढ्य राक्षसांशी लढून त्यांचा विनाश करून विजय प्राप्त केला. दुर्गा देवी सबला आहे. शस्त्रधारी, पराक्रमी, साहसी आहे. तिचे वाहन सिंह आहे.
दुर्गा देवी स्त्री असून सुद्धा तिने महिषासूर, दुर्ग, कुंभ-निकुंभ, मधु-कैटभ, चंड-मुंड ध्रुमलोचन, चिक्षुर, रक्तबीज … अशा महादुष्ट, महाक्रूर, महाभयानक, अत्त्याचारी, महाबलवान असंख्य राक्षसांचा वध केला. ती स्त्री आहे.तिची सेना स्त्रियांची होती. तिने महाभयानक राक्षसांचा विनाश केला आणि विजय मिळविला. तिच्या पराक्रमामुळे ती पूजनीय झाली. दुर्गा देवी महिषासूरमर्दिनी झाली.

दुर्गादेवीने महिला सैन्यासह स्वपराक्रमाने लढून महाबलाढ्य दुष्ट राक्षसांचा विनाश करुन विजय मिळविला. फक्त महिलांनी लढलेले हे पहिले युद्ध आहे. दुर्गादेवी- राक्षसांचे हे युद्ध 9 दिवस 9 रात्र चालले म्हणून याला नवरात्र म्हणतात.
सप्तशती ही स्त्री शौर्याची, स्त्री पराक्रमाची गाथा आहे. आपण नवरात्रात स्त्रीशक्तीचा जागर करतो. नवरात्रात दुर्गादेवी महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा करतो.
स्त्री शब्दात त्रिशक्ती आहे, नवरात्रात महापूजा, आराधना, होम हवन, भक्ती करतात. दुर्गादेवी शक्ती धैर्याची देवता, महालक्ष्मी धन सौंदर्याची देवता आणि महासरस्वती विद्या बुद्धीची देवता आहे. या त्रिदेवीच्या भक्तीने आपल्याला स्त्रीशक्ती, आत्मशक्ती, कायिक शक्ती, बौद्धिक शक्ती जागवायची आहे. हा खरा स्त्रीशक्तीचा जागर आहे. स्त्रीमध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा अंश आहे म्हणून स्त्रिने या आपल्यामधिल त्रय शक्तींना जागवून स्त्रीशक्तीचा जागर करायचा आहे. स्त्रीमध्ये अपार शक्ती आहे. नवरात्रात कायिक शक्ती, बौद्धिक शक्ती, धैर्य शक्ती, आत्मशक्ती जागवण आजच्या काळाची गरज आहे.

सरकारने महिलांना आरक्षण दिले. बर्याच महिलांचे मत पडले आम्हाला आरक्षण नको. आम्हाला रक्षण हवे. स्त्रीला रक्षण हवय. स्वतंत्र देशात स्त्री सुशिक्षित आहे पण सुरक्षित नाही.
आपल्याकडे मुलींना कां अबला केले ? जड उचलू नको, धावू नको ! किती बंधन लावली ! कां तिला नाजूक केलं ? स्त्री म्हणजे नाजूक हे तिचे विशेषण झाले. स्त्री किती नाजूक हो…
आम्ही लहानपणी खेळत असू….
“काऊन सये वाकली ?कंबर मोडली.
कशा कशाने ?
जाई जुईच्या वेलाने !”
जाई जुईच्या वेलाने कंबर मोडणारी स्त्री ! एवढी नाजूक स्त्री ? नाही !
स्त्री मनाने दृढ आणि शरीराने सुदृढ हवी.
आपल्या वेदकालीन पौराणिक स्त्रीया लढवय्या होत्या. कैकयी, सत्यभामा लढल्या. युद्ध भूमिवर जाऊन युद्धात पतीला मदत केली.
ऐतिहासिक स्त्रिया रणरागिणी होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई,चित्तूरची राणी चेन्नमा युद्धात लढल्या. राणी लक्ष्मीबाई मर्दानी पोषाख घालून लढली. अहिल्याबाई होळकर, हजरत महल या समरांगणा होत्या. कॅ.लक्ष्मी सहगल, कनकलता बरुआ, कल्पनादत्त, बीना दास या क्रांतीकारी स्त्रिया बंदूक वापरत असत. बंदूक चालवत असत.
प्रत्येक स्त्रीमधिल ही दुर्गा अवतरीत व्हायला हवी. महिला देवीसारख्या सक्षम व्हायला हव्या. दुर्गा देवीच्या लढण्याचे आश्चर्य वाटत होते तर दुसरीकडे दुर्गेची प्रेरणा मिळत होती.
त्यादिवशी मी शाळेत जायला निघाले. माझ्याबरोबर काही मुली होत्या. शाळा दहा मिनिटाच्या अंतरावर होती. सहसा मुली आपल्या शिक्षिकांच्या सोबतीने शाळेत जायच्या. शाळेतल्या मुली ग्रुपने जायच्या. समोरच माझ्या सहशिक्षिका मैत्रिणी आणि त्यांच्याबरोबर बर्याच मुली माझ्याकरिता थांबल्या होत्या.
“अग आत्ता एक विचित्र माणूस जातांना बघितला कां ?”
“नाही ! तो त्या दुसर्या रस्त्याला वळला असावा.”
“तो मुलींच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडत होता. मुली खूप घाबरल्या. एका मुलीच्या तर गळ्यातील साखळीला हात घातला. ती तर खूपच घाबरली” मैत्रिणीने सांगितले.
ही घटना भर बाजारात घडली होती. कुणीही मदतीला आलं नाही. त्याला पकडायच धाडस कुणी केलं नाही ! समाजात आज बघे दिसतात. खूप वाईट वाटलं. भयानक चीड आली. शिवाय मुलींनी भितीपोटी शाळा बंद करायला नको हा महत्वाचा विचार मनात येऊन गेला.
काय करावं ? वाईट वाटले.आज पन्नास लोक येऊन त्याला पकडू शकत होते. पूर्वी महिलांना रस्त्यावर लोक असले की सुरक्षित वाटायचे. मदतीकरिता धावून यायचे. आता तर सारे बघे असतात. काही तरी करायला हव होतं. मुलींच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा प्रश्न होता.
आमच्या स्त्रीयांमधिल दुर्गा जागली. आपल्या हाती लेखणी आहे. आपल्या लेखणीत जोर आहे. लेखणी हे शस्त्र आहे.! मुलींकडून अर्ज लिहून घेतला. सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि पोलिस स्टेशनला अर्ज पाठवला.पोलिसांनी या परिस्थितीचा गांभिर्याने विचार केला. ताबडतोब त्याला हद्दपार केले. पुन्हा कधी तो दिसला नाही.
नागपूरची घटना आहे. एक गुंड माणूस सारखा महिलांना त्रास द्यायचा. तेथिल बायकांना खूप भिती वाटायची. पोलिसमध्ये तक्रार केली. काही उपयोग झाला नाही. तो बेदरकारपणे हिंडायचा. बायका मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. बायकांमधिल दुर्गा जागी झाली. हजार हातांची दुर्गा अवतरली. प्रत्येकीने हातात विळा, कोयता, काठी, लोखंडी सळाख, जे मिळेल ते घेतल अन् आपल्या कामावर शंभर महिला निघाल्या. तो गुंड माणूस दिसताच त्या शत महिलांनी त्याला घेरले अन् सपासप मारले. जणू तिथे दुर्गा अवतरली होती ! हजार हातांनी त्याचा विनाश केला. सगळ्या भराभर आपआपल्या घरी गेल्या ! जणू काहीच झाले नाही ! आज दुर्गा देवीने राक्षसाला ठार मारले होते.
पुराणकाळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंत रणरागिणींचा लढा सुरूच आहे. त्यात त्या विजयी झाल्या आहेत. आधार नसल्यावर नारी शक्तीच कामी येते.
आज स्त्रियांच्या दृष्टीने जग असुरक्षित आहे. घरी दारी स्त्री असुरक्षित आहे. स्त्री सक्षम आहे. तिला आता सबला व्हायचे आहे. अगदी दुर्गादेवीप्रमाणे !
मुली महिला मलखांब, कुस्ती, वेटलिफ्टिंग बाॅक्सिंग सगळ शिकतात. पुरस्कार मिळवितात. मग सामान्य मुलींना अबला म्हणून का वाढवतात ?. तिला सबला सशक्त सक्षम करणे आवश्यक आहे. कुस्तीसारख्या पुरुषप्रधान खेळात महिलांनी इतिहास रचला आहे. मेरीकाॅमने बाॅक्सिंगमध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहे. म्हणजे स्त्री सबला होऊ शकते. मुलींनु जुडो कराटेचे क्लास लावायला हवे योगा करायला हवे. एन सी.सी. मध्ये प्रशिक्षण घ्यायला हवे. शारिरीक बल कमवायला हवे. मुली महिलांनी स्व-सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम सबल व्हावे. दुर्गादेवच्या प्रेरणेने स्त्रियांचे सक्षमिकरण व्हायला हवे.

— लेखन : मीना खोंड. निवृत्त प्राचार्य, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
स्त्री शक्तीचा आढावा घेणारा अभ्यासपूर्ण लेख.