आनंदीबाई शिर्के
आधुनिक स्त्रीची स्वप्नं सत्यात येण्यासाठीची पार्श्वभूमी जणू त्या काळच्या अनेक लेखिका तयार करत होत्या. त्यात काशिबाई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के, कमलाबाई टिळक अशा अनेक जणी होत्या.
“सांजवात” या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्या एक मान्यवर लेखिका आनंदीबाई शिर्के..
कथाकार व बालसाहित्यकार म्हणून ओळखल्या जाणा-या आनंदीबाई शिर्के यांचा जन्म ३ जून १८९२ रोजी झाला..
आनंदीबाईं यांचा विवाह म्हणजे त्या काळात लेखिका आणि संपादक यांचे भावबंध जुळून प्रेमविवाह होण्याचं हे दुर्मीळ उदाहरण.. .

प्रत्यक्ष आयुष्यातही आनंदीबाई एक धाडसी, कणखर, आधुनिक विचारांच्या तरुणी होत्या. घरातच त्यांच्यातलं वेगळेपण आणि तेज जाणवू लागलं होतं.
आनंदीबाईंचे वडील बडोद्याला गायकवाड सरकारच्या सेवेत नोकरी करीत असल्यामुळे आनंदीबाईंचे बालपण गुजरातमधील नवसारी, पाद्रा, बडोदा, मेहसाणा येथे गेले तेथील विविध गुजराती शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. परंतु कौटुंबिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला परिचारिकेचं प्रशिक्षण घेऊन तोच व्यवसाय पत्करणार आणि वडिलांना हातभार लावणार असा निश्चय करून त्या एकविसाव्या वर्षापर्यंत विवाहापासून दूर राहिल्या.. त्या काळात ही बंडखोरीच होती… त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतले पण त्यालाही घरातून विरोध होता.. त्याच काळात लेखनाची आवड उत्पन्न होऊन त्यांनी ‘कुमारी आनंदी’ या नावाने कथालेखन सुरू केले…

पुस्तकांची सोबत आणि वाचनाची आवड मात्र त्यांनी मनापासून जोपासली. वाचनातूनच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली… वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या लेखन करू लागल्या होत्या.
स्त्री लिहिते याचं नावीन्य हळूहळू ओसरू लागलं होतं आणि स्त्री काय लिहिते याकडे लक्ष जाऊ लागलं.. १९१० मध्ये त्यांची “शारदाबाईंचे संसारशिल्प” कु.आनंदी या नावानं ही पहिली कथा मासिक मनोरंजन मध्ये प्रसिद्ध झाली..अनेकांचं या नव्या नावाने लक्ष वेधून घेतलं. तर त्याच वर्षी ‘मासिक मनोरंजन’ मध्येच त्यांचा ‘स्वच्छता’ हा निबंध ही प्रसिद्ध झाला. “मराठा मित्र’” मध्ये त्यांची ‘बेगम आरा’ ही कथा प्रकाशित झाली… ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता त्या काळात आनंदीबाई यांनी आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली…
१९२८ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘कथाकुंज’ प्रकाशित झाला. या कथासंग्रहाला श्री. कृ. कोल्हटकरांची प्रस्तावना लाभली.. तर १९३४ मध्ये ‘कुंजविकास’ तर १९३९ मध्ये ‘जुईच्या कळ्या’ हे कथासंग्रह तर १९४३ मध्ये भावनांचे खेळ व इतर गोष्टी, १९६४ मध्ये “साखरपुडा, १९५८ मध्ये ‘तृणपुष्पे’, १९८१ मध्ये ‘गुलाबजाम’ या कथा प्रसिद्ध… याचबरोबर ‘रूपाळी’ ही कादंबरी आणि बालसाहित्याच्या दालनात ‘कुरूप राजकन्या’, ‘तेरावी कळ व इतर गोष्टी’, ‘वाघाची मावशी व इतर गोष्टी’ हे त्यांचे बालकथासंग्रह प्रसिद्ध. …

तसेच इतिहासाच्या पुस्तकांसाठी ही त्यांनी लेखन केले.. त्यांनी अनेक गुजराती पुस्तकांचे ही अनुवादही केले..
सांजवात’ हे त्यांचे आत्मचरित्र १९७२ साली म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रकाशित झाले..या आत्मचरित्राला वि.द.घाटे यांची प्रस्तावना लाभली.. हे आत्मवृत्त अत्यंत प्रांजल, हृदयस्पर्शी व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे… या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी यात घेतला आहे.
स्त्रियांशी निगडित अशा सामाजिक समस्यांचे चित्रण, पुरोगामी विचारसरणी, मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द व म्हणींचे वैपुल्य ही त्यांच्या रचनेची वैशिष्ट्ये…
अत्यंत विचारी, संयमी, कष्टाळू, प्रगल्भ, चिंतनशील अशा आनंदीबाईं यांची लेखनशैली अतिशय प्रसन्न व मधुर होती… नर्मशृंगार सहजतेने कथेत आणणार्या त्या पहिल्या स्त्री-कथाकार होत्या…
स्वभावचित्रणावरील कौशल्य, तंत्रावरील हुकमत व स्त्रियांच्या भाषेचा परिणामकारक वापर यांमुळे समकालीन काळातील त्या महत्त्वाच्या स्त्री-लेखिका ठरतात…
पुणे येथे आकाशवाणीवर अनेक प्रसंगी, अनेक विषयांवरील त्यांची भाषणे गाजली. १९३६ मध्ये जळगाव येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य सम्मेलनात स्वागताध्यक्ष पदाचा सन्मान आनंदीबाई यांना मिळाला होता. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाला वृत्तपत्रांमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती.
१९३८ मध्ये पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठा महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून आनंदीबाईं यांची निवड झाली..
निबंध, कथा, बाल-साहित्य, स्त्री-साहित्य, अनुवादित साहित्य, आत्मवृत्त अशी बहुविध साहित्यनिर्मिती करणा-या आनंदीबाईं यांचे ३१ ऑक्टोबर १९८६ रोजी निधन झाले.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800