Friday, November 22, 2024
Homeलेखडॉक्टर काका सांभाळा !

डॉक्टर काका सांभाळा !

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे. फारसे स्पेश्यालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याचं कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका, मामाच !

आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा ! पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं.

अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा.

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो. आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली.

खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी. कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला. समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली.

मग ऑपरेशन पूर्व तपासणी, ऑपरेशन नंतर तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा.

वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.

पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ? त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे.

या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ? पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर ! व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात. जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड. नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.

आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी.

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली. हे असं असतं ?  खरं तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही. त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले. समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली.

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये निर्णय मिळतो, न्यायाबद्दल खात्री देता येत नाही.

समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता, यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ? आपण सर्वसामान्य माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.

आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ? आज तरी भविष्य धूसर दिसतंय !
डॉक्टरकाका सांभाळा स्वतःला !!!

सुनील देशपांडे.

– लेखन : सुनील देशपांडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9868484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आजकाल वैद्यकीय क्षेत्रात मग सरकारी हॉस्पिटल असो किंवा खाजगी हॉस्पिटल सर्व ठिकाणी कमालीचा गोंधळ आहे. मेडिक्लेम पॉलिसीच्या नावाखाली लूटमार चालू आहे. चुकीच्या ट्रीटमेंट मुळे पेशंट दगावत आहेत तर काही वेळेस डॉ. ची चुकी नसताना पेशंट च्या नातेवाईक यांचा उद्रेक पाहायला मिळतो.
    श्री सुनील देशपांडे यांनी लेखनातून वास्तव रूप समोर आणले आहे त्यांचे हार्दिक आभार 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments