आनंदीबाई किर्लोस्कर
शांताबाई नाशिककर, कुमुदिनी प्रभावळकर, जानकीबाई देसाई, कमलाबाई बंबेवाले, इंदिराबाई सहस्रबुद्धे यांनीही मराठी वाङ्ममयात मोलाची भर घातली आहे.
मराठी लेखिका मराठी उद्योजक शं.वा. किर्लोस्कर यांच्या पत्नी तसेच स्त्री मासिकाच्या संपादिका आनंदीबाई किर्लोस्कर यांची आज ओळख करून घेऊ या.
आनंदीबाई किर्लोस्कर म्हणजे एका निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक. मूळच्या पुण्याच्या वैद्य असलेल्या आनंदीबाई यांचा जन्म १९०५ सालचा. आनंदीबाई यांनी अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेतले होते व त्या किर्लोस्करवाडीतील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. १९३२ सालात संपादक शंकरराव किर्लोस्कर यांच्याशी त्यांनी विवाह केला. दोघांचाही हा पुनर्विवाह होता पण समाजाची टीका आनंदीबाईंनाच सहन करावी लागली… स्वतःच्या दुःखातून त्यांनी इतर स्त्रियांची दुःखे जाणून घेऊन त्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे कथालेखन केले…
मराठी लेखिका असलेल्या आनंदीबाई किर्लोस्कर यांनी ‘”अज्ञाता’” या नावाने कथालेखन केले. आनंदीबाईं यांनी कथा आणि नाटके लिहिली. त्यानी स्त्री मासिकाचे संपादन केले… त्या संबंधित लेखक आणि चित्रकार यांच्याशी चर्चा करून दिवाळी अंकाचे नियोजन करीत असत. अंतरंग (१९४६), ज्योती (१९४४) व प्रतिबिंब (१९४१) हे कथासंग्रह आणि नव्या वाटा (१९४१) हे नाटक प्रकाशित झाले आहे.
त्यांच्या बहुतेक कथा स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतून निर्माण होणार्या गुंतागुंतीचा वेध घेतात…
आनंदीबाईं यांचे आजूबाजूच्या समाजाचे निरीक्षण सूक्ष्म आणि नेमके असे आहे.
वेश्यांच्या वेदनेची आणि अगतिकतेची कल्पना असल्यामुळे प्रत्यक्ष वेश्यावस्तीत जाऊन त्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले व त्या अनुभवांवर आधारित असा ‘”मगरीच्या मगरमिठीतून सुटका’” या नावाचा लेख लिहिला. .. शोधक पत्रकारितेचे हे एक महत्त्वाचे उदाहरण…!स्त्री-मनाचे आकलन दमदार असल्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व तिचे सत्त्व आणि तिचे अस्तित्व हा त्यांच्या प्रत्येक कथेचा केंद्रबिंदू…
संसारातल्या अनेक प्रसंगांवर आनंदीबाईं यांनी कथा लिहिल्या. स्त्रियांच्या मनातल्या निरनिराळ्या भावनांचा वेध नाजूकपणे घेतला व आपल्या कथेतून मध्यमवर्गीय जाणिवा प्रभावीपणे व्यक्त केल्या. स्त्रीजीवनाचे व मध्यमवर्गाचे अंतरंग उलगडून दाखविले.
नव्या वाटा या त्यांच्या पुरुषपात्रविरहित नाटकात आनंदीबाईं यांनी परित्यक्ता, प्रौढ, कुमारिका यांच्या जीवनविकासासाठी नव्या वाटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहपद्धतीतील दोष नाहीसे करून स्त्रीजीवन सुखकारक करण्यासाठी नव्या वाटा चोखाळण्याचा मार्ग त्यांनी आपल्या नव्या वाटा या नाटकातून सुचवल्या..
कथासंग्रह आणि नाटकाव्यतिरिक्त आनंदीबाईं यांनी काही श्रुतिकाही लिहिल्या आहेत.
सुशिक्षित स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव होऊनही जुन्या-पुराण्या रूढी-नियमांमुळे तिची होत असलेली परवड पाहून व्यथित होणा-या आनंदीबाई यांचे १६ सप्टेंबर १९४२ रोजी निधन झाले..
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800