भारतातील अनेक राज्यांमधील विवाहित स्त्रियांसाठी सर्वात महत्त्वाचा सण जर कोणता असेल तर तो म्हणजे करवा चौथ. कार्तिक पौर्णिमेच्या नंतर येणारी संकट चतुर्थी म्हणजेच करवा चौथ. ह्या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या जोडीदाराचे आयुष्य वाढावे यासाठी सकाळपासून ते रात्री चंद्र निघेपर्यंत निर्जल व्रत करतात.
या व्रताच्या दिवशी सर्व सुहासिनी एकत्रित येऊन देवीची पूजा करून करवा चौथ ची कहाणी ऐकतात. त्यानंतर सूर्याला अर्ग देऊन आपल्या पतीचे तसेच भावाचे आयुष्य वाढून धनधान्याची भरभराटी व्हावी असा आशीर्वाद सूर्याला मागतात. संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात.
व्रताच्या अनेक दिवसा अगोदर पासून नवीन कपडे,दाग-दागिन्यांची खरेदी केली जाते.ह्या दिवसांमध्ये उत्तर भारतातील सगळे बाजार देखील करवा चौथ च्या खरेदीसाठी जमणाऱ्या गर्दीने भरलेले दिसतात. पूजेसाठी वापरली जाणारी पूजेची थाळी तसेच चंद्र पाहण्यासाठी विविध प्रकारच्या सजवलेल्या चाळण्या, माती पासून बनवलेला करवा, मेहंदी यांची विशेष विक्री ह्या दिवसात बाजारांमध्ये होत असते.
संध्याकाळी जेव्हा चंद्र निघण्याची वेळ होते त्यावेळेस सर्व सुहासिनी छान पैकी तयार होतात. अगोदर चंद्राची पूजा करून नंतर पतीची पूजा करून चंद्र चाळणीतून पाहिल्यानंतर पतीचा चेहरा चाळणीतून पाहतात आणि त्यानंतर पती च्या हाताने पाणी पिऊन हे व्रत पूर्ण केले जाते.
विविधतेतून एकता दर्शवणाऱ्या आपल्या भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यामध्ये करवा चौथ हा व्रत विशेष पती-पत्नीमध्ये एकमेकाविषयी प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करणारा सुंदर असा सण फक्त उत्तर भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा व्हावा. कारण ह्या व्रताच्या निमित्ताने सर्व विवाहित स्त्रिया कितीही मोठ्या पदावर असल्या तरी आपल्या पतीसाठी हा व्रत करून चंद्र निघण्यापूर्वी विशेष तयार होतात आणि पती ही कितीही कामात व्यस्त असेल, कोणत्याही व्यवसायात तरी सुद्धा चंद्र निघायच्या अगोदर पत्नीसाठी घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याला माहिती असते की त्याचे आयुष्य वाढावे यासाठी त्याची पत्नी दिवसभरापासून उपाशी आहे म्हणून.
आज आधुनिक युगात अगदी छोट्या छोट्या कारणावरून एकमेकापासून वेगळे होणारे जोडप्यांची संख्या दिवसे दिवस वाढत असताना तसेच वर्षातून एक दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन ह्या विदेशी प्रकारचा सर्वत्र प्रचार होत असताना आपल्या हिंदू धर्मांमध्ये करवा चौथ सारख्या पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या सणाचे महत्त्व जाणून घेणेदेखील खूप महत्त्वपूर्ण आहे.
— लेखन : पूनम सुलाने-सिंगल. जालना
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800