आली आली पहा मंगलमय ही दिवाळी
रेखु चला सुबकशी प्रांगणात रांगोळी
पिवळाधम्मक झेंडु आणि आंब्याची पाने
त्यात कोवळ्या ओंब्या अशी सजली तोरणे
गोड तिखट फराळाची झाली पहा रेलचेल
धडामधुम फटाक्यांची कित्ती कित्ती आलबेल
प्रथम दिन दिपावली आहे रमा एकादशी
साऱ्या चराचरी कुणीही राहु नये उपाशी
ओढ ममता मायेची धेनुमाता नी पाडस
पुज्य पूजनी असती द्वादिनी वसुबारस
दरवळ उटण्याचा न् सुगंधीत साबणाचा
दिन असे आज स्नेहमय अभ्यंगस्नानाचा
लाह्या बत्तासे अर्पूनी उधळु सुगंधीत सुमन
मनोभावे वंदु लक्षुमीला आहे आज लक्ष्मीपूजन
शुभदिन आहे आज स्नेहमय दिपावली पाडवा
स्नेहबंध नात्यांतील सदा राहो मधुरतम गोडवा
प्रेमळ लुटुपुटुचे खट्याळ बंधु भगीनीचे नाते
भाऊबीज दिनाला आनंदाला उधाण येते
सण वर्षाचा सण हर्षाचा या सारे आनंद लुटुया
जीवनी रंग भरणाऱ्या त्या परमेशासी स्मरुया
— रचना : नेहा हजारे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800