बहुदा १९६५-१९६६ मधील ही गोष्ट. आशालता वााबगावकर, रामदास कामत आणि मास्टर दत्ताराम अशा दिग्गजांनी रंगमंच गाजवण्याचा तो काळ होता. लयाला गेलेली संगीत नाटकाची परंपरा उर्जिता अवस्थेत ही मंडळी आणत आहेत असे तेव्हा कौतुकाने म्हटले गेले. नेमके तसेच कौतुक गेल्या २५ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यात “कलाद्वयी”ने सादर केलेल्या प्रयोगा चे झाले.
त्यावेळीचा प्रयोग भरत नाट्य मध्ये पाहिला होता. कालच्या प्रयोगाचे आगळे पणाची दखल घ्यायला पाहिजे ती ज्या पार्श्वभूमीवर तो सादर झाला त्यासाठीची. . “कलाद्वयी”चे सर्वच कलाकार भारावलेले होते. कर्वे पथावरील बंद पडलेल्या कारखान्यात मोठ्या मेहनतीने उभारलेल्या द बॉक्स या नवख्या नाट्य मंदिरात सुमारे दीडशे प्रेक्षक तिकीट काढून छोट्या मोठ्या अडचणी सहन करीत उपस्थित राहिले होते. जवळपास सर्वच स्त्री पुरुष ज्येष्ठ होते. नाट्यगृहात आपापल्या आसनावर बसण्यासाठी अंधारात रस्ता शोधत जावं लागलं त्याची कोणीही थोडी देखील नाखुशी दाखवली नाही. एक छोटे सात मिनिटाचे टेक्निकल इंटरवल, दहा मिनिटाचे मोठे इंटरवल होते. त्याही वेळात तोपर्यंत कलाकारांनी सादर केलेले गीत, संगीत, आणि अभिनय याची तारीफ करणे असाच सगळ्यांनी प्रतिसाद दिला. हे सगळे मुद्दाम सांगणे अशासाठी आवश्यक वाटते की इतर ठिकाणी अशा गैरसोयींचा मोठा गाजावाजा होतो. पाच तासाच्या या प्रयोगात मात्र उलटे घडत होते. या वेळात देखील ठिकठिकाणी रसिक प्रेक्षक उत्स्फूर्त दाद होते. हे खऱ्या रसिकांचे लक्षण होते.
‘द बॉक्स’ या नाट्यगृहाची माहिती पुणेकर रसिकांना अद्याप व्हायची आहे. बहुतेक रिक्षावाल्यांना सुद्धा विचारत विचारत शोध घ्यायला लागतो. संगीत मत्स्यगंधाचा प्रयोग याच नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी झाला तेव्हा शेजारच्या लागून असलेल्या दुसऱ्या नाट्य गृहामध्ये डीजेच्या कलकलाटामुळे तो रद्द करावा लागला होता. रद्द झालेल्या नाट्यप्रयोगाच्या तिकिटाचे परत करू असे जाहीर करण्याची नामुष्की आयोजकांना आली होती. परंतु हा नाट्य प्रयोग परत कराल तेव्हा आम्ही येऊ असे सांगून रसिकांनी या नाट्य कलाकारांना मोठा दिलासा दिला होता. कालच्या प्रयोगाला बहुसंख्य प्रेक्षक परत आले होते.
‘द बॉक्स’ नवे मिनी थिएटर आहे. नाटका ची ऑडिओ व्हिज्युअल क्वालिटी खूप छान आहे. श्रवणाचा आनंद खूप मिळतो. प्रा वसंत कानेटकर यांच्या कथानकाची आणि संवाद लेखनाची ताकद आणि त्यातील बारकावे पहिल्यांदा पाहिले तेव्हा लक्षात आले नव्हते ते काल खूप प्रकर्षाने जाणवले.
प्रयोग संपला तेव्हा कित्येक प्रेक्षकांनी टाळ्यांनी तर दाद दिलीच. पण कौतुकाची थापही मनापासून दिली. हा प्रायोगिक रंगमंचावर केलेला प्रयोग अनुभवण्यासाठी आणि कलाकारांचे कौतुक करण्यासाठी ज्येष्ठ संगीत अभिनेत्री मधुवंती दांडेकर, शिलेदार कुटुंबातील दीप्ती भोगले आणि संगीत अभ्यासक, गायक डॉ. विकास कशाळकर हे खास उपस्थित होते.
जाणकार प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुभाष इनामदार हे देखील होते. त्यांनी स्टेजवर येऊन “संगीत रंगभूमीला चांगले दिवस नव्याने पुन्हा एकदा आणणाऱ्या” या कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले.
नाटकात काम करणाऱ्या कलाकारांनी आपल्या भूमिका परिणामकारक केल्या होत्या. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पदांची रंगत अधिक पसंत पडली..गद्य संवाद आणि गायक कलाकारांनी आमच्यावर तीन तास मोहिनी घातली. जुन्या पिढीच्या नाट्यप्रेमींना “संगीत मत्स्यगंधा” या नाटकाविषयी काही सांगायला पाहिजे असे नाही. तथापि नव्या पिढीच्या प्रेक्षकांना थोर परिचय देणे आवश्यक आहे.
गोवा हिंदू असोसिएशन ने संगीत मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेले नाटक रंगमंचावर एक मे १९६४ रोजी प्रथम सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांंनी या नाटकाला संंगीत दिले आहे. महाभारतातील महत्त्वाची एक घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे. देवव्रत अर्थात भीष्माचार्य आणि त्यांचे पिताजी राजा शंतनूची पत्नी सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा यांची ही कहाणी आहे. पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते. तिच्या सूडबुद्धीचे परिणाम देवव्रताला आणि सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात. फार गहन आशयाचे हे कथानक असून अप्रतिम संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असे हे नाटक आहे.
..
श्रेय नामावली, कलाद्वयी, पुणे सादर करीत आहे, संगीत मत्स्यगंधा
लेखक – वसंत कानेटकर
संगीत– पं. जितेंद्र अभिषेकी
दिग्दर्शन आणि नेपथ्य डिझाईन– आशुतोष नेर्लेकर
संगीत मार्गदर्शन– संजय गोगटे
संगीत साथ– संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे.
पार्श्व संगीत– सारंग जोशी, प्रिया नेर्लेकर
नेपथ्य सहाय्य आणि रंगमंच व्यवस्था– संतोष, सचीन, दत्ता आणि मंडळी
प्रकाश योजना– यशोदीप खरे
रंगभूषा– सयाजी शेंडकर
वेषभूषा– जाधव नाट्य संसार
वेषभूषा सहाय्य– राकेश घोलप, मधुरा ताम्हणकर
विशेष आभार– प्रदीप वैद्य, द बॉक्स टीम
सूत्रधार– संजय गोसावी, वर्षा जोगळेकर
भूमिका आणि कलावंत–
भीष्म- संजय गोसावी
धीवर- चंद्रकांत सहस्रभोजनी
प्रियदर्शन- निरंजन कुलकर्णी
चंडोल- चिन्मय पाटसकर
अंबा- वैभवी जोगळेकर
शंतनू- ओंकार खाडिलकर
पराशर- चिन्मय जोगळेकर
आणि
सत्यवती- अस्मिता चिंचाळकर
सविनय सादर करीत आहोत, कलाद्वयी निर्मित, संगीत मत्स्यगंधा
परेशर : चिन्मय जोगळेकर
देवाघरचे ज्ञात कुणाला
गुंतता हृदय हे
नको विसरू संकेत मिलनाचा
साद देती हिमशिखरे
सत्यवती : अस्मिता चिंचाळकर
गर्द सभोवती रान साजणी
अर्थशून्य भासे मजा हा कलह जीवनाचा
मी आता नाही आई
राजा शंतनू : ओंकार खाडिलकर
संसार सुख नसते भाळी
स्त्री प्रेमाविण जीवन अवघे..
— लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— छायाचित्र : पराग गोरेगावकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप सुंदर