कन्या असते घराचे रत्न
सोनुल्या पावलांनी
दुडदुडत देते घराला घरपण
छुमछुम तालावर धरत ताल
चिवू काऊंची करते मैत्री ||१||
घेवून येते आईचे बालपण मुठीत
आठवण माहेराची आठवायला परत
जगते पोरी संग राहून गेलेले सारे
खेळणी रंगाची, बार्बीच्या प्रेमाची ||२||
पोरीच्या खेळण्याचे, बोलण्याचे
किती ग कौतुक सांगू ताई
माझी सोनपरी मोठी होऊन
गिरवते आईचे धडे पटापट ||३||
माय भरून पावते पोरीच्या संसारात
तिला कमी जास्त मदतीसाठी
जीव होतो कासावीस रात्री बेरात्री
सासरी जाताना ठेवते मागे आठवणी ||४||
पोरापेक्षा लेकीचाच घास अडकतो कंठात
तरी तिच्या बाईपणाला समाज देतो नकार
तिच देते दोन घराला प्रकाश
भरून टाकते कानाकोपरे आनंदाने ||५||
— रचना : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800