भारतातून मराठी वंशाचे लोक अमेरिकेत १९६०-७० च्या दशकात शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त गेले आणि तेथेच स्थायिक झाले. उच्च शिक्षण असल्यामुळे त्यांनी नोकरीच्या ठिकाणी इंग्रजी भाषा व उच्चार व्यवस्थित शिकून घेतले. शिवाय त्यांना मातृभाषा येतच होती, संस्कारही मराठी होते.
या मराठी जनांनी अमेरिकेत घरे घेतली. त्यांचे परिवारही तेथे वाढू लागले. मराठी भाषिकांना एकत्र आणून आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. संस्कृती शिवाय मराठी माणसाला त्याचे पूर्ण अस्तित्व जाणवत नव्हते.
अमेरिकेत राहून या मंडळींनी त्यांची भाषा आणि राहण्याची पद्धत फक्त अनुसरली होती. पण त्यांची संस्कृती स्वीकारली नव्हती. मराठी भाषिकांना एकत्र आणून सण समारंभ साजरे करावेत आणि जीवनात आनंद निर्माण करावा या हेतूने महाराष्ट्र मंडळे स्थापन होऊ लागली .
अमेरिकेत पहिले महाराष्ट्र मंडळ, शिकागो येथे १९६९ साली स्थापन झाले. त्यानंतर इतर ठिकाणीही महाराष्ट्र मंडळे निर्माण होऊन मराठी भाषिकांचे भाषेचे आदान-प्रदान वाढू लागले.
पण प्रश्न आला तो अमेरिकेत जन्मलेल्या मराठी वंशाच्या मुलांच्या भाषेचा. पुढच्या पिढीची ही मुले अमेरिकन शाळेत शिकत होती. अमेरिकेतील पाळणाघरात ठेवली जात होती. त्यामुळे ती मुले प्रथम पासून इंग्रजी भाषा बोलू लागली. इंग्रजी संस्कार त्यांच्यावर होऊ लागले. आठ-दहा वर्षांची मुले मराठी संस्कृतीपासून खुपच दूर गेलेली वाटत होती. कधी भारतात गेल्यावर त्यांच्या नातलगांशी नीट संवादही करू शकत नव्हती. आजी आजोबांच्या गोष्टी तरी यांना कशा समजाव्या ?
आपल्या आई-वडिलांपासून त्यांची नातवंडे तुटल्यासारखे होणे हे अमेरिकेत गेलेल्या मराठी वंशाच्या लोकांना क्लेशकारक होते. आपल्या मुलांना नातलगांचे प्रेम मिळावे यासाठी काहीतरी पूल तयार व्हायला हवा होता. मराठी भाषेचा धागा मजबूत करणे हे शक्य होईल का ? याबद्दल प्रयोग सुरू झाले. काही लोकांनी आपसात आपले विचार प्रकट करून काही निर्णय घेतले.
त्यानुसार काहींनी मुलांना मराठी शिकवण्यासाठी आपापल्या घरातच शाळा सुरु केला. १९७९ साली मिसेस सुधाताई टोळे आणि मिसेस कदम यांनी न्यू जर्सीत पहिली मराठी शाळा सुरु केली. त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने इतरही ठिकाणी मराठी शाळा सुरु होऊ लागल्या.

न्यू जर्सी येथील स्नेहल वझे यांच्याशी मी संपर्क करून याबाबतीत माहिती घेतली. तेव्हा त्या म्हणाल्या, “मी आणि माझे पती, १९८२ मध्ये अमेरिकेत आलो आणि आमच्या मुलाचा जन्मही अमेरिकेतच झाला. तो मराठीत बोलत नव्हता. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणामच जास्त होता. माझ्या मैत्रिणी उल्का वाघ, वृंदा देवल यांच्याशी ही गोष्ट बोलल्यावर त्यांची प्रतिक्रिया माझ्यासारखी होती. मुलांना आजी-आजोबांशी संवाद करण्यासाठी तरी मराठी शिकवायला हवे.”
स्नेहल वझे यांनी पुढाकार घेऊन शनिवार, रविवारच्या सुट्टीत आपल्या आणि मैत्रिणींच्या मुलांना एकत्र आणून आपल्या घरातच खेळीमेळीच्या वातावरणात मराठी शिकवायचे ठरवले. हळूहळू या उपक्रमाला यश येऊ लागले. गोष्टी सांगणे आणि ऐकणे यातून मुलांना मराठी भाषा शिकवता येत होती. प्रार्थना म्हणून घेऊ लागल्या. पंचतंत्रातील गोष्टी सांगू लागल्या. मुले आनंदाने ऐकत होती. मग तक्ते तयार करा, श्लोक म्हणुन घ्या यातूनच पुढे शाळा आकाराला आली. तीच आजची न्यू जर्सीमधील ‘मॉर्गनविल मराठी शाळा‘.
या शिक्षणाला काही स्तर असावा म्हणून सुरुवातीला विदर्भ साहित्य संघाच्या परीक्षांना मुलांना बसवु या असे त्यांनी ठरवले.
पुढे अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांचे शिखर मंडळ असलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाने ( बीएमएम) अत्यंत परिश्रम घेऊन सर्व शाळांसाठी अभ्यासक्रम बनवले आणि परीक्षा पद्धती ठरवली. त्यामुळे शाळा आता बीएमएमचा अभ्यासक्रम अनुसरते.
शाळेला आता एका देवळात जागा मिळाली आहे. तेव्हापासून पालकांच्या अंगावर कोणताही खर्च पडत नाही. या देवळात संस्कृत, हिंदी, कन्नड, तमिळ असेही वर्ग चालतात. लता फडके आज तिथे हेडमिस्ट्रेस आहेत. शाळांचे तक्ते बनवून घेणे व इतर कार्यक्रम आखणे असे त्या पाहतात.
लता फडके यांचेशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या, “भाषा आणि संस्कृती हातात हात घालूनच असतात. त्यामुळे मराठी भाषा शिकवताना मराठी सणवार, दैवते, चालीरीती यांची ओळख तरी करून द्यावीच लागते. मराठी शाळेची मुले, पालक आणि शिक्षक असा एक परिवारच असल्यासारखे सण साजरे करतात.”
न्यूजर्सी मध्ये एकूण पाच मराठी शाळा नावारूपाला आल्या आहेत. तसेच इतरही काही शाळा आहेत. ‘मराठी विश्व न्यू जर्सी‘ या महाराष्ट्र मंडळाने सर्व शाळांना पाठिंबा देऊन सहकार्याची भावना ठेवली आहे. ‘मराठी विद्यालय‘ ही न्यू जर्सीमधील सर्वात जुनी शाळा आहे (१९८६) . सुधीर आंबेकर या शाळेचे समन्वयक आहेत. मराठी संस्कृती आणि भाषा शिकणे हे ध्येय ठेवून ती चालत आहे. मराठीत संवाद करू शकणे आणि लिखाणात सहजता येणे ही दोन शैक्षणिक ध्येये आहेत. ‘मराठी विश्व’ तर्फे होणाऱ्या वसंतोत्सवात मुलांचाही कार्यक्रम असतो. मॉर्गनविल शाळेची मुलेही त्यात भाग घेतात.
सुधीर आंबेकर यांनी त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे की, ‘रामायण, महाभारत यांतील कथा मुलांना जड जात होत्या. त्यातील नांवेही उच्चारणे कठीण जात होते. तेव्हा आम्ही सरळ अकबर-बिरबलाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. उच्चार नीट व्हावे यासाठी आम्ही मुलांकडून प्रार्थना म्हणून घेऊ लागलो’.
साउथ ब्रुन्सवीक मराठी शाळा १९९३ च्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्थापन झाली. आल्हाद साठे यांनी आपल्या मुलांबरोबर इतरही मुलांना मराठी शिकवण्यास सुरवात केली. या शाळेत आता पाच ते पंधरा वर्षाची मुले आहेत. अक्षर ओळख, मराठी वाचन आणि बोलणं यावर भर दिला गेला. कथाकथन, नाट्य सादरीकरण यातून या शाळेतील मुलांची बऱ्यापैकी प्रगती झाली आणि एके वर्षी ५० मुलांसोबत भाषा आणि संस्कृती हा दीड तासाचा जंगी कार्यक्रम सादर केला.
मराठी संस्कृतीबरोबर अमेरिकन सण देखील या शाळेत साजरे केले जातात. सध्या ही शाळा लायब्ररीमधे भरते. तिला अनेक स्वयंसेवक लाभले आहेत.
एडिसन, न्यू जर्सी येथे मराठी शाळा आहे. ती सप्टेंबर ते जून चालते. २०२०-२१ साठी ही शाळा ऑनलाईन सुरू आहे. गावात ‘भारत सेवा आश्रम’ येथे ती भरते. एडिसन मराठी शाळा ही शिक्षक पालक यांच्या स्वयंसेवी संघटनेवर चालते. ही शाळा एडिसन, न्यू जर्सी येथे आहे. एसएससी सेंटर मध्ये ती शनिवार रविवार दुपारी असते.
बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या २००७ च्या आसपास असे लक्षात आले की या सर्व शाळा एका धाग्याने बांधायला हव्यात. यासाठी त्यांनी नेमलेल्या समितीतील सुनंदा टूमणे आणि विजया बापट यांनी मेहनत करून शाळांसाठी अभ्यासक्रम बनवला. अमेरिकेतील रोजच्या जीवनातील मुलांच्या ओळखीचे संदर्भ यात घेतले होते. २००९-१० च्या दरम्यान लीना देवधरे यांना भारती विद्यापीठ पुणे, यांची मान्यता मिळविण्यात यश आले.
नॉर्थ कॅरोलायना येथे १९९४ मध्ये ‘विद्या मंदीर‘ नांवाची मराठी शाळा स्थापन झाली होती. ती विनोद बापट आणि विजया बापट यांनी स्थापन केली होती. मराठी भाषा आणि संस्कृती शिकवणे हे तर त्यांचे ध्येय होतेच पण मराठी मुलांना आपल्या संस्कृतीचा आणि आचार विचारांबद्दल अभिमानाने सांगता येणे आवश्यक होते.
अमेरिकन शाळेत शिकताना मराठी मुलांना इतर मुलांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागे. ‘हिंदू धर्म हा खरा धर्म आहे का ? तुमच्या पालकांना नीट इंग्रजी का बोलता येत नाही ? त्यांचे इंग्रजी उच्चार इतके फनी का असतात ? आम्ही जे जे खातो ते तुम्ही का खात नाही ?’ अशा प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडत. या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बापट यांनी मुलांच्या मनात मराठी आणि मराठीपण याबद्दलची प्रीती निर्माण केली. या शाळेत मुलांना तीन लेव्हल्सपर्यंत शिक्षण मिळू शकते आणि अखेरीस प्रमाणपत्रही मिळते. या शाळेतील विद्यार्थी कविता आणि नाट्य सादरीकरण यात रस घेतात तसेच काही शास्त्रीय संगीतही शिकले आहेत.
शिकागो येथे २०१४ मध्ये मराठी शाळा स्थापन झाली. त्यावेळी नितीन जोशी बीएमएमचे अध्यक्ष होते. विद्या जोशी या शाळेच्या समन्वयक होत्या. त्यांनी शाळेला चांगले नावारूपाला आणले. तेथे आज शंभरच्यावर विद्यार्थी असून ही शाळा दोन बॅचेस मध्ये चालते. शाळेचा अभ्यास उत्तम चालला आहे.
मराठी भाषेबरोबर मराठी संस्कारही दिले जातात. या शाळेला इलिनोईस स्टेट ऑफ बोर्ड कडून मान्यता मिळाली आहे. मराठी भाषेच्या परीक्षेचे मार्क हायस्कूल प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. मराठी ही दुसरी भाषा म्हणून स्वीकारण्यात आली आहे. आता विद्या जोशी बीएमएमच्या अध्यक्ष आहेत.

याशिवाय, अटलांटा येथील मराठी शाळा २००९ साली स्थापन करण्यात आली. तिथे १४ वर्ग चालतात. आधी ‘किलबिल’चे वर्ग आणि त्यानंतर बीएमएमचे अभ्यासक्रम लागू होतात. या शाळेला सुद्धा जॉर्जिया स्टेटकडून मान्यता मिळाली आहे.
अमेरिकेतील अनेक शाळामंध्ये वाचनालयदेखील आहे. या वाचनालयात महाराष्ट्रातून नेलेल्या अनेक सुंदर पुस्तकांचा संग्रह आहे. छोट्यांची रंगीत मुखपृष्ठे असलेली पुस्तके पाहून ही पुस्तके मुले ऑनलाईन निवडू शकतात.
अमेरिकेत मराठी शाळेच्या परिचालनात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचं एक कौटुंबिक नातं तयार होतं. शाळेच्या कुठल्याही उपक्रमात पालकांचाही सक्रिय व उत्साही सहभाग असतो. आता इतकी वर्षे शाळा सुरु असल्यामुळे, या शाळेतून मराठी शिकलेली मोठी मुलेसुद्धा आता स्वतः शिक्षक होतात किंवा शिक्षकांना सर्वतोपरी शैक्षणिक कार्यात मदत करतात.
अशा तऱ्हेने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती अमेरिकेत जन्मणाऱ्या पुढील मराठी पिढ्यांकडेही उत्तमरीत्या संक्रमित होत आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

– लेखन : मेघना साने.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सातासमुद्रा पार अमेरिकेत मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करून मराठी संस्कृती जपली जाते. आणि आपल्याच मायभूमीत मराठी माध्यमाच्या शाळा बंद केल्या जातात ही शोकांतिका आहे. मेघनाताई साने यांनी सुंदर लेखन केले त्यांचे अभिनंदन 🌹 परदेशात राहून महाराष्ट्र मंडळ स्थापन करून सातासमुद्रपार मराठीचा झेंडा फडकवीला त्या बद्दल सर्व मराठी प्रेमी सभासदांचे हार्दिक आभार 🙏🌹
खुप आभारी आहे आरोटे साहेब
सातासमुद्रापार माय मराठी जोपासणाऱ्या शाळा उभ्या करून मराठी संस्कृती जपण्या साठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व मराठीप्रेमी मंडळींचे खूप कौतुक वाटते. सुंदर लेखनशैलीतुन सर्वांपर्यंत पोचवणाऱ्या मेघनाताईं चे अभिनंदन!
धन्यवाद मॅडम आपल्या अभिप्रायाबद्दल… असाच लोभ रहावा
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी याहून उत्कृष्ट उदाहरण कोणतेच असू शकत नाही. भाषेप्रती वसलेला आदर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मायमराठीची सातासमुद्रापार सेवा करणाऱ्या व मराठी संस्कृती परदेशात रुजविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ह्या मराठी हिऱ्याना मानाचा मुजरा!!!!
आपल्या बोलक्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी याहून उत्कृष्ट उदाहरण कोणतेच असू शकत नाही. भाषेप्रती वसलेला आदर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मायमराठीची सातासमुद्रापार सेवा करणाऱ्या व मराठी संस्कृती परदेशात रुजविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ह्या मराठी हिऱ्याना मानाचा मुजरा!!!!
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी याहून उत्कृष्ट उदाहरण कोणतेच असू शकत नाही. भाषेप्रती वसलेला आदर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मायमराठीची सातासमुद्रापार सेवा करणाऱ्या व मराठी संस्कृती परदेशात रुजविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ह्या मराठी हिऱ्याना मानाचा मुजरा!!!!
अटलांटा येथील महाराष्ट्र मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाना मी उपस्थित राहिलो होतो त्याठिकाणी लहान मुलांना विविध प्रकारचे मराठी कार्यक्रम पाहायला व ऐकायला मिळतात आपण लहान मुलांना भारतीय संस्कृतीची मुलांना कश्या प्रकारे ओळख करून देण्यात येते याबद्दल प्रकाश टाकला आहे धन्यवाद
माझी नात पालवी देखील नियमित या कार्यक्रमात सहभाग नोंदवते
खुप खुप आभारी आहे आपल्या प्रतिक्रिया बद्दल.