“रातराणी“
काॅण्टिनेण्टल प्रकाशनाने जानेवारी १९५८ मध्ये डॉ. वि. पां. दांडेकर यांच्या निवडक लघुनिबंधांचा संग्रह ‘रातराणी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. तेव्हाची किंमत आहे तीन रुपये. या संग्रहाला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
फेरफटका या लघुनिबंध संग्रहातील जगण्यांत मौज आहे, मागे फिरुन पाहिले असता, बोरें, टेकडीवरुन या लघुनिबंध संग्रहातील दर्शनी राग, नथिंग सिरीयस, एक पाऊल पुढे या लघुनिबंध संग्रहातील आनंदाचे संकेत, रेल्वे – लाइन्स, सर्व क्षणिकम्, न वठणारा वृक्ष, आळस, काळ खेळतो आहे या लघुनिबंध संग्रहातील काळ खेळतो आहे, जमेचिना, घडेचिना!, निर्व्यसनी माणसे!, विहार,मध्यरात्र, काळी पोत, कोथिंबिरीच्या काड्या, मिळवुनी त्रिभुवनीच्या ललना,
– पंचवीस वर्षांनंतर या लघुनिबंध संग्रहातील भटक्या, मिश्रराग, माझ्या ग दारावरनं, डामरी रस्ते,
किर्लोस्कर आॅक्टोबर दिवाळी अंक १९४९ मधील आवडते आवाज,
किर्लोस्कर आॅक्टोबर १९५१ मधील रेल्वे – स्टेशन,
किर्लोस्कर आॅक्टोबर, १९५३ मधील कोणी वायफळ मजशी बोलेल का ?
मनोहर एप्रिल १९५५ मधील कळलं का? वसंत आला! असे एकुण २६ लघुनिबंध यात आहेत. पाथरकर यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.
गमतीचे विचार हा लघुनिबंधाचा प्राण आहे असे डॉ वि. पां. दांडेकर म्हणतात. एखादी घटना पाहिली की, तिच्यातील गंमत त्यांच्या आधी लक्षात येते, गमतीचे विचार सुचू लागतात. एखादी घटना पाहून गंभीर विचार सुचू लागले, तर त्यांचे रुपांतर निबंधात किंवा प्रबंधात होईल आणि गमतीचे विचार सुचू लागले, तर लघुनिबंधात होईल. काही लघुनिबंध निसर्गाच्या दर्शनाने अंतर्मुख बनल्यानेही तयार होतात. मनांत ठाण देऊन बसलेल्या काही काव्यपंक्तीवरुनही काही लघुनिबंध सुचले आहेत असे ते म्हणतात.
१.जगण्यात मौज आहे या लघुनिबंधात साबरमती नदीवरील पुलाच्या कठाड्यावरुन वाकून पाहणाऱ्या मुलाला ते वाकू नको, पडशील ना असे म्हणतात. त्यावर तो ‘एक दहाडे मरवूंज छे ना? असे उत्तर देतो. पुढे चालून गेल्यावर त्यांना खळग्यात लहान लहान मासे अन्नासाठी धडपडताना दिसतात. जगण्यात आनंद आहे, काव्य आहे, विपन्नावस्थेत देखील मजेत राहणे शक्य आहे. पण उदासीनपणे संसार करावा अशी शिकवण मिळत आली आहे. खडकावर आदळणार्या फेसाळ लाटा, लाटांवर नाचणार्या गलबतांच्या डोलकाठ्या, सोनेरी मुलामा देणारी सुर्यकिरणे अशी दृश्ये आनंददायक आहेत. शिवाजी – संभाजी यांचे धर्मप्रेम, तुकारामाची अतुल शांती, रामदासाची निरिच्छता, टिळकांचा स्वार्थत्याग यानेही अंतःकरण आनंदी होते. रोजच्या व्यवहारातील आनंद लुटण्याचे कितीतरी प्रसंग ते वर्णन करतात. परोपकारातील आनंद, चित्रकला, संगीत, साहित्य वाचन इ. तील आनंद जगण्यांत मौज असल्याची उदाहरणे ते देतात.
२.मागे फिरुन पाहिले असता या लघुनिबंधात परगावी जाण्याच्यावेळी रेल्वे स्टेशनमधून गाडी निघाल्यावर मागे फिरुन पाहिले तर?, आपल्यापुढे चालणाऱ्या स्त्रीच्या मुद्दाम पुढे जाऊन तिच्याकडे मागे फिरुन पाहणे, परीक्षेच्या वेळी मागे फिरुन पाहणे, विद्यार्थिनीने मागे फिरुन पाहणे, खूप दूर चालून गेल्यावर मागे फिरुन पाहणे असे विविध प्रकार व त्यातील गमती यात वर्णन केले आहे. तशीच गोडी आयुष्यात मागे फिरुन पाहण्यात असते.
३.बोरे या लघुनिबंधात आनंदाच्या प्रसंगी आनंद आणि शोकाच्या समयी जरा धैर्याने प्रसंगाला तोंड द्यावे कारण आपला संसार हा द्राक्षाप्रमाणे निव्वळ गोड किंवा चिंचेप्रमाणे निव्वळ आंबट नसून बोराप्रमाणे आंबट – गोड आहे असा विचार मांडला आहे.
४.दर्शनी राग या लघुनिबंधात मनाला जेथे त्रास होत नसेल अशा प्रकारचे रागावणे काही वाईट नाही. कृतक कोप किंवा दर्शनी कोप काही वावगा नाही. मनुष्याने प्रसंगाच्या जरुरीप्रमाणे अवश्य रागवावे, पण त्या रागवण्यात द्वेष नसावा, दुष्ट बुध्दि नसावी. आपले रागावणे निर्विष असावे, त्यात न्यायबुध्दी असावी, पण खुनशीपणा नसावा असे विचार मांडले आहेत.
५.नथिंग सीरियस या लघुनिबंधात गंभीर वाङ्मयाबरोबरच गंभीरेतर वाङमयाचीहि जरुरी असल्याचे सांगितले आहे. वाङ्मयाचा टिकाऊपणा त्याच्या ठिकाणी असलेल्या गांभीर्यावर अवलंबून नसतो. आनंदी वृत्तीचा जन्म गांभीर्याच्या पोटी नसून ‘नथिंग सीरियस’ किंवा बेफिकीरीत आहे.
६.आनंदाचे संकेत या लघुनिबंधात आपले सणवार म्हणजे आनंदाचे संकेत होत. आपल्या समाजाने निरनिराळे सण निर्माण करुन सर्वांना एकाच वेळी आनंदित होण्याची सोय करुन ठेवली आहे. मात्र आपण त्यात आनंदाने भाग घेतला पाहिजे निसर्ग सुध्दा ऋतुचक्राद्वारे आनंदाचे संकेत देत असतो असे सुंदर विचार मांडले आहेत.
७.रेल्वे – लाइन्स या लघुनिबंधात लेखकाला रेल्वे – लाइन्सविषयी विलक्षण आकर्षण वाटत आले आहे. त्या लोखंडी रुळांच्या कडेकडेने जात असताना त्यांचे दु:ख, काळज्या, अडचणी, विवंचना यांचा त्यांना विसर पडतो. त्या चकचकणार्या परंतु पुढे पुढे अस्पष्ट होत जाणार्या रेल्वे – लाइन्सकडे पाहिले की दूरच्या आणि वेगळ्या मुलखाची त्यांना आठवण होते. त्या स्मृतींनी त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद वाटतो. प्रवास न करता प्रवास केल्याचे श्रेय मिळते. रेल्वे – लाईन्स म्हणजे परमनंट वे. या मार्गाला डोळ्यासमोर ठेवून आडमार्गाला कितीही भटकले तरी वाट चुकण्याची भीती नसते असे ललित चिंतन मांडले आहे.
८.सर्व क्षणिकम् या लघुनिबंधात काळापुढे कोणाचे काही चालत नाही,सर्व क्षणिकम् .बागेतील फुलांचा बहर असेल क्षणिक पण तो असत्य आहे का?, इंद्रधनुष्य पाहून होणारा आनंद. केवळ क्षणिकत्वाच्या मुद्द्यावर आपण सुंदरतेचा त्याग करु शकत नाही. शाश्वततावादी लोकांचे कुठे चुकते यावर यात विचार मांडले आहेत. दगडासारखे शाश्वततेचे जीवन कंठण्यापेक्षा इंद्रधनुष्याचे क्षणिक जीवन पुरवले असा सुंदर विचार यात मांडला आहे.
९.न वठणारा वृक्ष या लघुनिबंधात लेखकाला कधीहि न वठणार्या वृक्षाची उपमा काॅलेजला द्यावीशी वाटते. विद्यार्थ्यांशी खेळीमेळीने वागून त्यांच्या आशाआकांक्षा जाणून घेणे, त्यांना नीट मार्ग दाखवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे इ. कामे प्राध्यापकाला एखाद्या बागवानासारखी करावी लागतात.
१०.आळस या लघुनिबंधात आळस हा मनुष्याचा शत्रु नसून मित्र आहे, दुष्मन नसून दोस्त आहे, कसे ते सांगितले आहे. मनुष्याचा कलच आळसाकडे असल्याचे आढळते. कुंभकर्ण हा या सर्व आळशी लोकांचा आचार्य! तीच तर्हा ऋषीमुनींची. त्यांचे तप म्हणजे निद्राच असावी. प्रदीर्घ निद्रेमुळेच ते तत्वज्ञानाला जन्म देऊ शकले. पाश्चात्य राष्ट्रे अकारण उद्योगात वेळ घालवतात, याच्या उलट पौर्वात्य राष्ट्रात आळसाला मान दिला जातो. जो वेळ आळसात घालवतो, त्याचवेळी खरोखर जगतो आहे असे लेखकाला वाटते. ज्यांनी आळसात वेळ कधीच घालवला नसेल, त्यांचे आयुष्य नीरस, बेचव, कृत्रिम, यांत्रिक बनून जाते. अगदी देवशयनी एकादशी, प्रबोधिनी एकादशी यांची उदाहरणे देऊन लेखकाने आळसाचा चांगलेपणा सांगितला आहे.
११.काळ खेळतो आहे या लघुनिबंधात पिवळी – सोनेरी जुनी पाने गळून पडतात, व लाल मखमलीसारखी मऊ मऊ पाने झाडांच्या कटिखांद्यांवरुन खाली बघत असतात.तसे दृश्य पाहूनच काल:क्रीडति, काळ खेळतो आहे असे शंकराचार्यांनी म्हटले असावे असे लेखकाला वाटते. काॅलेजमध्येही लेखकाला जुने विद्यार्थी, नवे विद्यार्थी असे दृश्य दिसते.एकेकाळचे जुने विद्यार्थी भेटतात आणि लेखकाला आनंद होतो. शहरात देखील ४० वर्षात लेखकाला बदल जाणवतो. राष्ट्राराष्ट्रातील चढउतार हा सर्व लेखकाला काळाचाच खेळ वाटतो. काळ फिरतो आहे, फिरु द्या त्याला. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही अशा बहुजनसमाजाच्या वृत्तीला आपण काय करणार असा प्रश्न ते शेवटी विचारतात.
१२.जमेचिना, घडेचिना! राजकवि यशवंत यांनी ‘युगंधराचे पालुपद’ या कवितेत श्रेष्ठ लोकांच्या हातूनही त्यांच्या मनाजोग्या गोष्टी न घडल्याने ‘जमेचिना, कळेचिना, पटेचिना, घडेचिना’ असे म्हटले आहे. कित्येक वर्षांपासून ते लवकर उठण्याचा आणि उशिरा झोपण्याचा प्रयत्न करुन पाहतात पण जमतच नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. नीटनेटक्या पोशाखाची गोष्ट जमत नाही. परीक्षेत पहिला नंबर मिळवण्याची गोष्ट जमत नाही. हुकमी पल्लेदार वक्तृत्व जमलेले नाही. या सर्व उणीवाच आहेत पण त्याचा फायदा असा की ते इतरांकडे सहानुभूतीने, उदारपणे बघू शकतात.ही गोष्ट मात्र जमते असे ते शेवटी म्हणतात.
१३ निर्व्यसनी माणसे लेखकाला निर्व्यसनी मनुष्याची अत्यंत भीति वाटते. त्यांच्या अनुदारपणाबद्दल लेखकाला तक्रार आहे. असे लोक छांदिष्ट व अनुदार असतात. मोहापासून दूर राहत असल्याने त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी करडी असते. त्यांच्या हातून चूक होत नसल्याने दुसर्यांच्या चुका त्यांना खपत नाही. ते संतापतात. निर्व्यसनी माणसापेक्षा छोटी व्यसने असलेला मनुष्य लेखकाला आवडतो. अशा मनुष्याशी वार्तालाप करण्यात मौज असते. निर्व्यसनी माणसाला जगाची वाईट बाजू सतत दिसते. स्वतः उपभोग न घेणार्या व दुसऱ्यांनाहि उपभोग घेण्यापासून परावृत्त करणार्या या निर्व्यसनी लोकांना लेखक समाजाचे शत्रू मानतात.
१४.विहार क्रीडावृत्तीने आकाशांत विहार करणार्या पारव्यांइतके, इतर पक्ष्यांच्या उड्डाणात लेखकाला आकर्षण वाटत नाही. घारी आकाशात उंच उडतात पण त्यांची दृष्टी खाली जमीनीकडे असते. पांढरे बगळ्यांची रांग बहारीची दिसते. पण त्यांच्या पांथस्थपणामुळे ते लेखकाला आवडत नाही. दुसरीकडे जाण्याचा मार्ग एवढ्याच अर्थाने ते आकाशाकडे बघतात. बहुतेक बाकी पक्षी आकाशात उडतात पण त्यांचे मन आकाशात रमत नाही. चंडोल पक्ष्याचे आकाशावर प्रेम असते पण स्वतःच्या गाण्याकडेच त्यांचे अधिक लक्ष असते. पारव्यांइतके कलासक्तीने आकाशाकडे बघणारे क्वचित दुसरे पक्षी असतील. केवळ विहार, केवळ क्रीडा, केवळ खेळ म्हणून आकाशात उंच उंच उडत जाणाऱ्या रसिक पारव्यांचे म्हणूनच कौतुक वाटते. हेच तत्व मनुष्यांबाबतही लागू करुन लेखक त्या अनुषंगाने आणखी चिंतन मांडतो.
१५ भटक्या लेखक भटकण्याचा अंतर्भाव चैनीच्या आणि सुखोपभोगाच्या प्रकरात करतात. वयाच्या आठव्या वर्षापासून ते भटकत आले आहेत. लहानपणी मातापितरांच्या सहवासात वेळ घालवणे जितके अगत्याचे आहे तितकेच निसर्गाच्या, झाडाझुडपांच्या, नदीसमुद्राच्या सहवासात घालविणे जरुरीचे आहे असे लेखक सांगतात. विश्वाची अगाधता फिरस्त्यालाच आकलन होईल.
१६. मिश्रराग संगीत ही देवांची वाणी आहे, देवांची भाषा आहे असे कवि ब्राउनिंग म्हणतो. गायकाने मिश्रराग गाऊन दाखवले. पिलू, दरबारी, खंबावती, मालकंस, बागेश्री, पुरिया इ. श्रोत्यांच्या मुखातून ‘वाहवा’ ‘वाहवा’ ‘खाशी’ असे धन्योद्गार निघतात. लेखकाला इंद्रधनुष्य आठवते. निसर्गातही अशीच संमिश्रता आढळते. संमिश्रता हा सृष्टीचा प्राण आहे. स्त्री पुरुषातही अशी संमिश्रता हवी. संमिश्र रागांप्रमाणेच संमिश्र स्वभावाची लेखकाला अगदी अवीट गोडी वाटते.
१७. माझ्या ग दारावरनं‘ माझ्या ग दारावरनं |मैत्रांचा मेळा गेला |टोपीवरनं ओळखला |भाऊराया ||’ अशी ओवी लहान मुली म्हणतात त्याची लेखकाला आठवण होत राहते. दारावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रहदारीकडे बघत राहणे ही लेखकाची रिकामपणाची कामगिरी आहे. त्याचा त्यांना कंटाळा येत नाही आणि त्यांच्या मनाची भरपूर करमणूक होते. कवि लार्ड टेनिसनच्या लेडी आॅफ शेलाॅट या भावकाव्यातील नायिकेचे ते उदाहरण देतात. तिला खिडकीबाहेरच्या जगाकडे बघण्याची मनाई होती. तिला तो शापच होता. आपल्याला तो शाप नाही असे लेखकाला वाटते. खिडकीबाहेर दिसणार्या रहदारीत मनोज्ञ विविधता असते. ऋतुचक्राचीहि रहदारी लेखकाला पाहायला मिळते.
१८.मध्यरात्र लेखकाला मध्यरात्रीची वेळ मनापासून आवडते. एकदा ते पुण्यास असताना जुन्या पद्धतीच्या वाड्यात राहत. रात्री नाटक पाहण्यासाठी ते कडीला कुलूप लावून गेले मात्र परत येऊन पाहतात तर कोणीतरी कुलुपासह कडी लावून टाकली होती. ती रात्र त्यांनी पुण्याच्या सडकांवर फिरुन घालवली व ते मध्यरात्रीच्या प्रेमात पडले. ती चांदणी रात्र होती. द्वादशीचा चंद्र पश्चिमेकडे कलत चाललेला. वर मृगनक्षत्र. पलीकडे व्याधाची चांदणी. नीरव शांतता.ते फिरत राहिले. बर्याच वेळाने कोंबडे आरवले. उरलेली रात्र दगडू हलवायाच्या दत्ताच्या पायर्यांवर घालवली. ते नंतर मध्यरात्रीच्या प्रेमातच पडले म्हणून सर्वात शेवटच्या खेळाला जाणे त्याला आवडते.
१९ काळी पोत काळ्या पोतीकडे पाहून लेखकाला समाधान वाटते. आनंद वाटतो. या पोरीचं लग्न कसं होणार? या काळजीत असलेल्या कुरुप मुलीचे लग्न होऊन ती काळी पोत मिरवते किंवा दुसरी एक मुलगी जिचे लग्न कसे होईल यापेक्षा ते अजून कसे झाले नाही तिचे जमल्यावर नंतर तिची काळी पोत पाहून त्यांना समाधान वाटले. स्त्रियांना काळ्या पोतीचा वाटणारा अभिमान, त्या वेळी कोणतीहि स्त्री कमालीची सुंदर वाटणे, सुवासिनी सौभाग्याला दृष्ट लागू नये म्हणून काळी पोत घालण्याची प्रथा असावी. बाईचे वर्म म्हणजे काळी पोत. काळी पोत नजरेस पडताच एका चारुगात्रीची स्तुति करता करताच ते कसे राहिले तो किस्सा यात वर्णन केला आहे.
२०. कोथिंबिरीच्या काड्या बायकांना घरांतील स्वामिनी किंवा गृहदेवता म्हणून एकदा मान्य केल्यावर त्यांच्या व्यवहारात पुरुषांनी वास्तविक मुळीच लक्ष घालू नये. ते अधिकारविभागणी तत्त्वाच्या विरुद्ध आहे. पुरुषांचे लक्ष हे अभिनंदनाच्या, उत्तेजनाच्या, प्रशंसेच्या स्वरुपाचे असावे. आपल्या भाषेत रमणी, गृहिणी,सुगरीण असे अनेक प्रतिशब्द निर्माण झाले आणि त्यांच्याशी एकनिष्ठतेने स्त्रियांचे व्यवहार चालत आलेले आहे. आयुष्याच्या विशिष्ट काळात प्रत्येक स्त्री ही कामिनी असते. मातृत्व ही त्या पुढची अवस्था. पुरुषांची दखलगिरी नसावी म्हणजे बायकोने निवडलेल्या कोथिंबीरीतील काड्यांवरुन तिला वाटेल ते बोलू नये. काही पुरुष इतके मूर्ख असतात की ते स्वतः अकारण दु:खी होऊन स्वतःच्या बायकांना दु:खी करतात. खरे तर स्त्रियांच्या सर्व व्यवहाराकडे रसिकतेने बघणे हीच पुरुषांची खरी भूमिका असावी असा यात विचार मांडला आहे.
२१.मिळवुनी त्रिभुवनींच्या ललना ‘मस्त कलंदर झूलो लाल, अल्ला अल्ला झूलो लाल’ हे एका फकीराचे गाणे कैक वर्षे लेखकाच्या कानात घुमत होते.भैरवी रागात गायलेल्या ‘मिळवुनी त्रिभुवनींच्या ललना’ ही ध्वनिमुद्रिका ऐकल्यावर त्याही ओळींनी त्यांचा पिच्छा पुरविला. पुढील ओळी त्यांना आठवत नाही. खरोखर त्यांच्यापुढे तिन्ही भुवनातील सुंदर सुंदर स्त्रिया येऊन उभ्या राहिल्या असा त्यांना भास होतो. कोणती सेवा करु असे त्या विचारतात. त्यातील काही लग्नही करायला तयार होतात. पण लेखकाला प्रश्न पडतो. शेवटी त्यांच्याकडे सुकन्या, सुपत्नी, सुमाता होऊन जग सुंदर व सुखी करावे अशी लेखक मागणी करतो.
२२. डामरी रस्ते डामरी रस्ते म्हणजे आधुनिक सुधारणेचे अपत्य, कोणाचेहि लक्ष वेधतील असे, कोणालाहि आवडतील असेच असतात. स्वच्छ, सरळ, तुकतुकीत डामरी रस्ते त्यावरुन चालणाऱ्यांना उत्तेजित करतात. त्यावर सायकलिंग करणे आनंददायक असते. दुपारी मात्र हे रस्ते त्यांच्यावर पाऊल ठेवू देत नाहीत. पावसाळ्यात पाऊस पडत असताना व पाऊस पडून गेल्यावर डामरी रस्ते फार सुंदर दिसतात. असे असले तरी लेखकाला साध्या रस्त्यांचे आणि त्याहीपेक्षा पाऊलवाटेचे विशेष आकर्षण वाटते. अगोदर कोण कोण येऊन गेले ते त्यावर अगदी स्वच्छ दिसते.पावलांवर पाऊल टाकण्याचे समाधान मिळते. डामरी रस्त्यावर पावले कोणाची उमटायला नकोत आणि मार्गदर्शन कोणाला व्हायला नको. असे भावनाशून्य डामरी रस्ते लेखकाला आवडत नाही. ते निर्जीव यंत्रासाठी ठीक असले तरी सजीव माणसासाठी काही चांगले नाही असा विचार ते मांडतात.
२३. आवडते आवाज संवादी, विसंवादी, मधुर, कर्कश, सार्थ, निरर्थक आवाज आपल्या कानावर सतत येत असतात. त्यातील काही आवाज आपल्या आवडीचे असतात. दयाळ पक्ष्याचा मधुर आवाज, देवचिमण्यांची भूपाळी, कोकिळाच्या गुजगोष्टी, बुलबुलचा आवाज, गोड गळ्याने दारावरुन भजने म्हणत जाणारा साधू, कपबशांचा आवाज, सागराचा गंभीर ध्वनि, रात्रीच्या वेळी पावसाचा आवाज, विहिरीवर चालणाऱ्या मोटेचा कुरुकुरु आवाज अशा कितीतरी आवडत्या आवाजाविषयी यात ललित वर्णन केले आहे.
२४. कोणी वायफळ मजशी बोलेल का? बोलण्याचा शुध्द आनंद जर हवा असेल, तर माणसाने काही वेळ तरी वायफळ बोलले पाहिजे. मुद्देसूद बोलण्यात मेंदूची करामत दिसली तरी मनाचा मोकळेपणा वायफळ बोलण्यात प्रतीत होतो. वायफळ बोलायला विश्वासू श्रोता मात्र हवा. प्रकृती उत्तम ठेवायची असेल तर वायफळ बोलले पाहिजे असे रंजक विचार यात मांडले आहेत.
२५.रेल्वे – स्टेशन लेखकाच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टीत रेल्वे – स्टेशन आहे. संध्याकाळच्या वेळी त्यांचे पाय त्यांच्या नकळत एखाद्या स्टेशनकडे वळतात. गाडी यावयाच्या वेळी ते स्टेशनवर जात असतात. रेल्वे रुळ, प्रवाशांची धांदल, बुकींग क्लार्क, टी. टी.,हमाल, इंजिन, शंटींग, हिरवे तांबडे झेंडे इ. त्यांना आकर्षक वाटत राहते.
२६. ‘कळलं का? वसंत आला! ऋतुराज वसंत हिवाळ्याचा दरबार चालू असतानाच नकळत मोठ्या गमतीने येतो. वसंत आला आहे याचा पहिला पुकार, पहिली ललकारी’- टक- टक – टक अशी तांबट मारतो आणि खरेच वसंताची चाहूल लागते. सीताफळीवर बारीक हिरवी लव दिसू लागते. वड, पिंपळ, अशोक, लिंब यांच्यावर नवी कोवळी पालवी शोभून लागते. मोहरही लोंबू लागतो. वसंत आला बरं का असेच जणू ते बजावून सांगतात. हवेत बदल होतो. झुळकी येऊ लागतात. फुले फुलू लागतात आणि वसंताचा दरबार भरु लागतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या पेरुची फुले मात्र वसंतात फुलतात. आम्रवृक्ष वसंताचा झेंडा उभारतो. वसंत आल्याचे कुहू कुहू आवाजातून कोकिळ जाहिर करीत असतो. गुलमोहोर, केशिया इ. फुलांनी डवरतात. असे वसंताचे ललितरम्य वर्णन यात केले आहे.
हे सर्वच लघुनिबंध मनाला भावणारे आहेत. डाॅ वि. पां. दांडेकर यांची शैली, गमतीदार चिंतनशीलता यांचे दर्शन यातून होते.
— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800