साल १९९३, जानेवारी महिना. मुंबईत बॉम्ब स्फोटाने थैमान घातले होते. अशात मी तामिळनाडूतील कल्पकम अणू ऊर्जा केंद्रातून ऱ्हुदयाच्या ऑपरेशन (बायपास साठी) मी मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्रात ट्रान्स्फर घेऊन आलो.
येथील BARC च्या हॉस्पिटल चे रिपोर्ट्स घेऊन डॉ नीतू मांडके यांना भेटायचे होते. बॉम्बस्फोटांमुळे त्यांच्या कन्सल्टिंग सेंटर ऐवजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यानी भेटायला बोलावले होते. त्याप्रमाणे मी, माझी पत्नी, आणि मित्र कै. श्रीपाद खोबरे यांना भेटावयास गेलो. त्यानी माझे सर्व रिपोर्ट्स बघितले आणि माझी सर्व माहिती घेतली. मुलं किती ?, कामाचं स्वरूप… वगैरे विचारलं.
त्यावेळी मला ३ लहान मुली होत्या. मोठी मुलगी चौथीत, दूसरी मुलगी तिसरीत होती तर धाकटी मुलगी फक्त २ वर्षाची होती.
डॉ नीतू मांडके यांनी सर्व परिस्थिती चे आकलन केलें व मला २३ जानेवारी चा बेड बुक करा व ॲडमीट व्हा असे सांगितले.
त्यावेळी आमच्या BARC च्या डॉक्टरांनी सांगितले होते की, डॉ नीतू मांडके रू १०,०००/- ऑनमनी घेऊ शकतात. त्या कारणाने मी त्यांना परत परत विचारत होतो, अजुन काय ? अजुन काही… पण ते म्हणाले, ‘अजुन काही नाही, तुम्ही 23 ताराखेला ॲडमीट व्हा. आपण 25 तारखेला सकाळी ऑपरेशन करू’. त्या प्रमाणे मी २३ जानेवारीला ॲडमीट झालो.
तरी सुद्धा जे माझ्या सोबत होतें (माझे काका मोठें भाऊ) यांना कल्पना दिली होती की १५००० रू तुमचे जवळ असू द्या. समजा त्यानी विचारलं तर द्यावे लागतील.
मी आणि माझे स्नेही २३ जानेवारी ला सकाळीं ११.०० वा. हॉस्पिलमध्ये दाखल झालो. माझ्या सर्व चाचण्या सुरू झाल्या. २३-२४ जानेवारी ला सर्व तयारी झाल्यावर २५ जानेवारी ला सकाळीं ०६.०० वा मला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. नंतर मला भुल देऊन बेशुद्ध केलें.
त्यानंतर ऑपरेशन पुर्ण झाल्यावर दुपारी ०४.०० वा मला अती दक्षता विभागात नेले असे माझे बरोबरचे नातेवाईक सांगतात. पुढील काही दिवस तिथे ठेऊन मग जनरल वॉर्ड मध्ये ठेवले.
डॉक्टर रोज येऊन सर्वांची विचारपूस करून जात असत. आम्ही चार पेशंट तिथे होतो.
माझे समोर एक मुस्लिम पेशंट होता. डॉक्टर मांडके, त्याला विनोदाने म्हणत ‘साब आपके दिल से अल्ला को निकालकर हनुमान को बिठा दिया हैं’ . सांगायचे म्हणजे त्यांनी काहीही वर पैसे विचारले नाहीं.
माझा डिस्चार्ज अमावस्येच्या दिवशी येत होता. ते म्हणाले उद्या आमावस्या आहे, मी परवाचा डिस्चार्ज लिहितो. असा हा देव माणूस आम्हाला सोडून गेला. या घटनेला ३१ वर्ष होतायेत. या ऑपरेशन नंतर दोनदा एजोपलास्टी झाली, आणि अजुनही मी वय वर्ष 81 अजुनही मी ठणठणीत आहे ज्याने माझे बायपास ऑपरेशन केले ते डॉक्टर मांडके आज या जगात नाहीत. मीच काय कोणीही त्यांना विसरू शकणार नाहीं अश्या या देव माणसाला माझा साष्टांग नमस्कार.
— लेखन : देवेंद्र लाखोळे.
निवृत्त वरिष्ठ संशोधन अधिकारी,
भाभा अणुसंशोधन केंद्र. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800