|| अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते| तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||
पूर्णिमा, तू रोज हे स्तोत्र नियमित म्हणशील, तर तुझे योगक्षेम व्यवस्थित चालेल. असा हा भगवतगीतेचा श्लोक मला मंत्र म्हणून ‘भाऊं’नी दिला आणि मला माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्ययाला येऊ लागला.
‘कै विनायक कृष्णराव शेंडे’ माझे पूज्य, आदरणीय गुरू. त्यांचा सहवास मला तीस वर्ष लाभला. मी पूर्णिमा आनंद शेंडे त्यांची धाकटी सून. रोज सकाळी मला त्यांच्या मंत्रपठनाने छान जाग यायची. सगळे मंत्र, स्तोत्र ते सकाळी देवाची पूजा करताना म्हणत असत. त्यामुळे आम्हां कुटुंबियांचे, माझ्या मुलींचे नकळत पाठ होत गेले. आध्यात्मिक ओढ अशी लागत गेली

आम्ही सर्व त्यांना आदराने ‘भाऊ‘ म्हणत असु. ते आम्हा संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ होते.
लग्नानंतर मी शेंडे घराण्यात आले पण मला त्यांनी माहेरची उणीव कधी भासू दिली नाही. आईवडिलांसारखेच प्रेम मला सासूसासर्यांनी दिले.
घरी वावरताना, नोकरी, मुलींचे संगोपन करताना भाऊ मला नेहमी मदतीचा आधार देत. त्यांचं राहणीमान जेवढं साधं होतं, तेवढेच त्यांचे विचार उच्च होते. कोणत्याही विषयांवर त्यांचे ज्ञान गहिरे होते. मग ते समाजकारण असो, राजकारण असो किवां स्वयंपाकघरातील किरकोळ वस्तूंचे औषधी उपयोग असो, मला ते सर्व नीट समजावून सांगत असत.
महाराष्ट्रातले मोरगाव मंदिर किती जुने आहे, कधी बांधले, हिमालयातील नद्या, प्रयाग, तिकडील देऊळे, मंदिरे, कुठल्याही वनस्पतीचे फायदे, तोटे, औषधी गुणधर्म, अशी अनेक बारिक सारीक माहिती ते तपशीलवार सांगत असत.
भाऊंचे वाचन म्हणजे संत तुकाराम गाथा, एकनाथ, नामदेव, अनेक संताचे चरित्र वाचून पारायणे झाले होते. दासबोध, ज्ञानेश्वरी तर सतत वाचनात असे. ज्योतिषशास्त्राचे ज्ञान तर अफाट सागरासारखे होते. रोज संध्याकाळी चार ते सहा घरी येणार्या लोकांच्या अडीअडचणी वर ते उपाय सांगत. तरूण मुलांपासून जेष्ठ लोकांपर्यंत सर्व त्यांचे शिष्य असत.
माझी ज्योतिषशास्त्र शिकायची इच्छा त्यांना सांगितल्यावर लगेच मला आठ दहा दुर्मिळ पुस्तके आणून दिली. अभ्यासाची सुरवात कशी करायची, राशी, नक्षत्र, कसे पाठ करायचे समजावून सांगत. पण ते नोकरी, मुलींच्या शाळा, स्वयंपाकघर व्यापातून शिकायचे राहून गेले.
भाऊ १९८२ मध्ये ‘पोस्ट अँड टेलिग्राफ’ मधून सेवानिवृत्त झाले. या तीस वर्षांच्या कालावधीत मी त्यांना कधीच उदास, केविलवाणे, दुःखी किंवा वैतागलेले पाहिले नाही. किंबहुना ते सतत आनंदी, उत्साही, नविन नविन पुस्तके, मासिकं वाचून त्यावर लिखाण करणारे असेच भावले.
वयाच्या ऐंशी व्या वर्षी त्यांनी !! श्री स्वामी समर्थ लीलामृत !! हे तीनशे पानी पुस्तक लिहिले. ‘श्री गजानन आशिष’ साठी तर त्यांनी चाळीस एक लेख लिहिले आहेत.
भाऊंचा आवाज म्हणजे एक वेगळी ओळख. ‘मी’ ची जाणिव त्यांना करून द्यावी लागत नसे. त्यांच ‘असणं’ म्हणजे आम्हाला कल्पवृक्षाची छाया होती.
वयाच्या नव्वदीत पंधरा मार्च २०१२ मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. त्यांची आठवण आम्हाला सतत असते.
त्यांच्या दुर्मिळ वस्तू म्हणजे रुद्राक्ष, स्तोत्र, पठणाची पुस्तके, जूने पंचाग, ज्योतिषशास्त्राची पुस्तके, त्यांची खास लिखाणाची पेटी, नेहमीची शबनम पिशवी आणि काठी त्यांच्या आठवणी विसरू देत नाही.
एकूणच त्यांचे समर्पित जीवन पाहून सहजच मनात येते !! दिव्यत्वाची जेथे प्रचिती! तेथे कर माझे जुळती.!!

– लेखन : पूर्णिमा शेंडे.
– संपादन: अलका भुजबळ. 9869484800.
पूर्णिमा, “भाऊ” बद्दल- तुझ्या सासऱयांबद्दल तू खूप छान लिहिले आहेस. तुझा सासऱयांची राहणी साधी होती पण विचार खूप उच्च प्रतीचे होते. त्यांचे पाठांतर, अनेक प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनाची आवड, निरीक्षण शक्ती खूप चांगली होती. एक माणूस म्हणून ते खूप चांगले होते म्हणूनच संपूर्ण कुटुंबाला चांगल्या सवयी लागल्या. त्यांच्यामुळेच तू सुसंस्कृत झाली. कविता, परीक्षणे इ .लिहायला लागली. त्यांचा 30 वर्षांचा सहवास लाभला. तू खूप भाग्यवान आहेस. आता ते संस्कार पुढे अनेकांना देण्याची जबाबदारी तुझी आहे. आत्मविश्वासाने पुढे जात रहा.
Khup chhan 👌
धन्यवाद