आज तो खूप दिवसांनी नाही तर खूप महिन्यांनी चौपाटीवर जाऊन बसला होता. रविवार असल्यामुळे चौपाटीवर खूप गर्दी होती. लहान लहान मुले वाळूत घरे बांधून खेळत होती. काही प्रेमीयुगुल एकमेकांच्या हातात हात गुंफून बसले होते. तर काही वृद्ध व्यक्ती हातातील काठीचा आधार घेऊन हळूहळू चालत होती. हा एकटाच शून्य नजरेने बघत बसला होता. इतक्यात समोर एक खेळणे विकणारा येऊन उभारला.
“लो न साब कुछ तो ले लो. देखो कितने सारे खिल्लौने है. ये देखो कितना बढिया मास्क है. बच्चे खुश हो जायेंगें. सिर्फ बीस रुपये में. .ले लो न साब.” असा म्हणत तो त्याच्या समोर उभा राहिला.
त्याने अगदीच थकलेल्या नजरेने त्या खेळणी विकणाऱ्याकडे पाहिले आणि त्याची नजर एकदम तो विकत असलेल्या मुखवट्याकडे गेली. तसा तो झटकन उठला आणि एक मुखवटा विकत घेऊन परत खाली बसून मुखवट्याकडे एकसारखा बघून मनात विचार करु लागला,’ हा मुखवटा घालून मी तिच्या समोर वावरत होतो. तिच्या पासून तिचे आजारपण लपवत होतो. या मुखवट्याआड मी माझे किती अश्रू गोठले होते हे माझे मलाच माहीत. शेवटी तिला तिचे आजारपण समजले फक्त आणि फक्त एका रक्ताच्या उलटीने. कर्करोगाने आजारी आहोत आपण हे तिला जेव्हा कळले तेव्हा पासून तीच जास्त माझी काळजी करु लागली होती. जसा मी मुखवटा लावून लपवले तसे तिने देखील मुखवटा लावून माझ्या पासून लपवले की तिची व्याधी तिला समजली आहे आणि ती अगदी थोडेच दिवस याची साथ देणार आहे. शेवटी तिचा मुखवटा गळून पडला तसा तिचा हात आणि हाताबरोबर घेतलेले वचन शेवटपर्यंत साथ देण्याचे सोडून ती निघून गेली कायमचीच. जसे सागरीकिनाऱ्यावर बांधलेले वाळूचे घर एका लाटेने उध्वस्त झाले.’
— लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800