थोर लेखक श्री.ना.पेंडसे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या रथचक्र या गाजलेल्या पुस्तकाचे श्री दिलीप गडकरी यांनी केलेले परीक्षण आपल्याला नक्कीच आवडेल.
श्री.ना.पेंडसे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
पेंडसे यांच्या मला आवडलेल्या पुस्तकासंदर्भात लिहिण्यापूर्वी त्यांचे बालपण तसेच त्यांच्या साहित्याचे उगमस्थान इत्यादी बाबत आपण विचार करू.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी येथे राहणाऱ्या नारायण गणेश पेंडसे व अन्नपूर्णा नारायण पेंडसे या दांपत्याला नऊ अपत्ये झाली. श्रीपाद हे थोरले अपत्य ५ जानेवारी १९१३ रोजी जन्मले. हेच ज्येष्ठ साहित्यिक श्री.ना.पेंडसे. त्यांना जवळचे मित्र व नातेवाईक ‘शिरुभाऊ ‘ म्हणत. वयाच्या अकरा वर्षांनंतर ते मुंबईला मामाकडे शिक्षणासाठी गेले. त्यांनी पाचवीत असतांना पहिला लेख लिहिला त्यामध्ये ‘ भाऊचा धक्का ते हर्णेबंदर’ प्रवासाचे वर्णन होते.
पेंडसे मॅट्रिक झाल्यानंतर विल्सन कॉलेजमध्ये शिकू लागले.१९३७ साली पेंडसे यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.पेंडसे १९४२ मध्ये बी.एस्सी. पास झाले व त्यांना त्याच वर्षी बेस्टमध्ये नोकरी लागली. सांगलीच्या कुमारी कमल नारायण मराठे हिच्याशी १४ फेब्रुवारी १९४३ रोजी पेंडसे विवाहबद्ध झाले.कमल मराठे लग्नानंतर सौ. कमल श्रीपाद पेंडसे झाल्या. घरखर्च भागवण्यासाठी कमलाबाई नोकरी करू लागल्या. त्यांना नंदा व सरोज या कन्या व अनिरुद्ध हा पुत्र झाला व पेंडसे यांचा संसाररथाचा व साहित्याचा गाडा वेगाने धाऊ लागला.
नोकरी व संसार सांभाळून पेंडसे यांनी वाचन , लेखन , व्यक्ती निरीक्षण हे छंद जोपासले.पेंडसे यांनी जीवनात पहिल्यांदा ‘ जीवनकला’ ही कथा लिहिली व सह्याद्री मासिकात प्रकाशित झाली तेव्हापासून त्यांना लेखन कलेचे तंत्र सापडले.त्यांनी सुरुवातीला अनेक व्यक्ती चित्रे लिहिली. १९४१ साली पेंडसे यांचा त्यांच्या व्यक्तीचित्रांचा संग्रह ” खडकावरील हिरवळ ” या नावाने प्रकाशित झाला.त्यानंतर ते कथा , कादंबरी , आत्मचरित्र , नाटक , स्पुट लेख लिहू लागले.
श्री.ना. पेंडसे यांचे मला आवडलेलं पुस्तक रथचक्र श्री.ना.पेंडसे यांना वाचन , लेखन , चिंतन याची आवड होती. कथा , कादंबरी लेखन करण्यापूर्वी त्यांनी अनेक व्यक्तींचं निरीक्षण केलं.थोडक्यात त्यांचं वाचन केलं त्यासंदर्भात चिंतन केलं आणि त्यातूनच व्यक्तिचित्रं साकार झाली. याचा फायदा त्यांना कादंबरी व नाटक लेखनाच्या वेळेस झाला.१९४९ साली त्यांनी ‘एल्गार ‘ ही पहिली कादंबरी प्रकाशित केली.ती लिहीताना त्यांनी कादंबरी संदर्भात काही कल्पना निश्चित केल्या होत्या. समाजाला काही शिकवण्यासाठी अथवा संदेश देण्यासाठी आपण लेखन करायचे नसून आपली कादंबरी राजकारणापासून अलिप्त ठेवायची इतकेच नाही तर राजकीय संघटनेचा उल्लेखही करायचा नाही असे ठरवले होते. एल्गार प्रकाशित झाली. वाचकांना ती आवडली. त्यांनी ती प्रादेशिक कादंबरी आहे़ असा प्रचार केला.पेंडसे यांची जन्मभूमी आणि त्यांच्या वाट्यालाआलेलं जीवन याचा उल्लेख आल्यामुळे पेंडसे कादंबरी लेखनात यशस्वी झाले.आशय , रचना , भाषा हे एकजीव झालेले घटक असतात. त्यांच्या एकात्मतेतून कलावस्तू निर्माण होते असे पेंडसे यांना वाटत होते.
पेंडसे यांच्या मते कादंबरी ही कलावस्तू आहे़ , सौंदर्यनिर्मिती हे तिचं प्रयोजन आहे़ , तिला उपजत बांधा असतो , स्वतःची भाषाशैली असते.पेंडसे यांच्या मते ‘रथचक्र ‘ ही सर्वात यशस्वी कादंबरी १९६१ साली प्रकाशित झाली.दोन वर्षांच्या आत तीची पहिली आवृती संपली.इतर कादंबऱ्यांपेक्षा ही जास्त लोकप्रिय झाली.हया कादंबरीच्या विक्रीबाबत जास्त विचार केला तर ह्या कादंबरीबाबत मोठं वादंग माजलं , तिच्यातील ‘ ओंगळ ‘ शब्द काहींना खटकले , काहींना कादंबरीची नायिका ‘कृष्णाबाई ‘ अश्लील वाटली.तर काहींना ‘तंत्रा’ चा अतिरिक्त जाच लेखकाने स्वतःवर लादून घेतला आहे़ असं वाटलं.एक दोन अपवाद वगळले तर हया कादंबरीतील व्यक्तींना नावं नाहीत. कादंबरीत ‘योजिलेल्या तंत्रा ‘चं एक खास वैशिष्ट्य म्हणून काहींनी ह्याचा उल्लेख केला.; तर काहींना ह्यात सवंगपणा दिसला. दोन वर्षात हया कादंबरी बाबत उलट सुलट चर्चा येत होत्या.काहींना ही कादंबरी आवडली , पण ‘गारंबीचा बापू ‘ ही कादंबरी रथचक्रपेक्षा सरस आहे़ अशी प्रतिक्रिया दिली.पेंडसे वाचकांच्या स्तुतीमुळे जास्त आनंदी होत नसत तसंच टीकेमुळे नाराज होत नसत.
एखाद्या जिवंत वस्तूसारखा कादंबरीचा विकास होत जावा अशी पेंडसे यांची भूमिका असे. ‘रथचक्र ‘ कादंबरीची मूळ कल्पना लेखन करता करता विस्तारत गेली. प्रथम ‘एका आईने आपल्या मुलांचं भलं व्हावं ह्याकरिता केलेली धडपड ‘ एवढीच ती होती.त्यानंतर नायिका पत्नी आणि स्त्री हया नात्यानंही पेंडसे यांना दिसू लागली. हया तीन नात्यांत शेवटी ‘आई’ इतकी पुढे गेली की कादंबरीचं नांव ‘आई ‘ ठेवावं असे त्यांना वाटू लागले.पेंडसे तिन्ही नात्याने जरी नायिकेकडे बघत होते.तरी हया सगळ्यांचा समावेश करणारं एक मोठं सूत्र कादंबरीत आपोआपच आले ते म्हणजे नायिकेचा नियतीशी चालू असलेला मुकाबला. या मुकाबल्यात ती यशस्वी होत नाही. आपण योजिलेलं ध्येय सिध्दीस नेलं ,आता जगण्यासारखं काही उरलं नाही.हया कल्पनेच्या आहारी जाउन ती आत्महत्येला प्रवृत्त होते.आयुष्यात मिळणारे यश क्वचितच निर्भेळ असतं. कादंबरीची नायिका कृष्णाबाईच्या बाबत तीने अशक्य ते शक्य करून लढाई जिंकली तरी नियतीने तीला दगा दिला. ह्याच नियतीचा ‘कृष्णाबाई ‘ हा एक भेसूर,ओंगळ आविष्कार होता. कृष्णाबाई असंभाव्य वाटू नये आणि मूळ कथानकाशी हया प्रकरणाचा धागा सहजपणे मिळून जावा ही पेंडसे यांची भूमिका होती.या प्रकरणामुळे कादंबरीला एक नवं परिमाण लाभलं असं पेंडसे यांना वाटत होते.काही वाचक त्यांच्या मताशी सहमत होते तर काहींना हे प्रकरण असंबद्ध , अनावश्यक वाटलं.
मी पेंडसे यांची अनेक पुस्तकं वाचली. रथचक्र कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तिच्यावर स्तुतीपेक्षा टीका जास्त झाली तरी तीची विक्री खुप झाली व त्यामुळे सर्व कादंबऱ्यांत पेंडसे यांना रथचक्र ही खुप आवडली.त्यामुळेच हया कादंबरीत असं विशेष काय आहे़ ? म्हणून मी ती वाचली. पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं जमिनीत अर्धरुतलेले रथाचं चाक दाखवले आहे़.कादंबरी वाचून झाल्यानंतर मला असे वाटले की ही कादंबरी जर नायिका प्रधान आहे़.कृष्णाबाई या नायिके भोवती कथानक फिरत आहे़ तर हे नांव व असे मुखपृष्ठ कां दिलं ? जेव्हा पुन्हा प्रस्तावनेसह बारकाईने ही कादंबरी वाचली तेव्हा माझ्या लक्षांत आलं की ही कोकणातील एकत्र कुटुंबात रहात असलेल्या कृष्णाबाईची ही व्यथा आहे़. कृष्णाबाईच्या संसार रथाला जरी दोन चक्र असली तरी तिचा नवरा आध्यात्मिक मार्गाला लागतो. मुलांना जन्मदेण्याव्यतिरीक्त तो काही काम करत नाही. म्हणजे तिच्या संसार रथाचं दुसरं चाक जमिनीत रुतलं आहे़. एकत्र कुटुंबात नवरा काही कमवत नसला अथवा काम करत नसला तर सर्वजण बायकोला दोष देतात व बायकोसह मुलांचा अपमान करतात. मुलांचा अपमान होऊ नये म्हणून ती वेगळी राहते मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्नं करते. मुलगा हुशार असतो तो शिकून आपल्या संसाराचे रुतलेले चाक वर काढण्यास मदत करेल असे तील वाटत असते परंतु नियती कृष्णाबाईची परिक्षा बघत असते.मुलगा सुध्दा तीच्या मनाविरूध्द वागतो व संसाररथाचं चक्र रुतलेलंच राहतं. असा शेवट लेखकाने केला आहे़.त्यामुळे कादंबरीचं नांव व मुखपृष्ठ योग्य आहे़ याची खात्री पटली म्हणून ती कादंबरी मला जास्त आवडली .
पेंडसे यांच्या लेखनशैलीचा विचार केला तर वाचकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात.संवाद मोठे प्रभावी व सहजसुंदर असतात. व्यक्तीचा शोध , व्यक्तिमत्वाचा समग्र विचार हे पेंडसे यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते.
लेखकाने योजलेल्या शब्दावरून त्याच्या लेखणीची ताकद लक्षात येते.सुरवातीला आपल्या कादंबरीतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या पेंडसे यांनी मुंबई महानगरीचा अनुभव तितक्याच ताकदीने आपल्या कादंबरीतून व्यक्त केला आहे़.यावरून सातत्य आणि प्रयोगशीलता हे पेंडसे यांच्या शैलीचे वैशिष्ट्य आहे़.
पेंडसे यांनी राजकारणापासून कादंबरीला दूर ठेवायचे इतकेच काय राजकीय संघटनेचा उल्लेखही आपल्या लेखनातून करायचा नाही असे ठरवले होते .परंतु लोकमान्य टिळकांनी केलेले मूलगामी स्वरूपाचे संशोधन आणि राजकारण हया दोन्ही गोष्टी एकदमच केल्या व दोन्ही क्षेत्रांत कळस गाठला. त्यामुळे प्रभावित होऊन पेंडसे यांनी “आभाळाची हाक ” ही कादंबरी लिहिली.ही कादंबरी १९ मार्च २००७ रोजी प्रकाशित झाली आणि चारच दिवसांनी म्हणजे २३ मार्च २००७ रोजी साहित्यातून विश्वबन्धुत्वाची पताका मिरवणारा कोकणचा कलंदर , श्रेष्ठ साहित्यिक ‘काळाची हाक ‘ आल्यामुळे पडद्याआड गेला.
— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800