राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांना वाहिलेली हि काव्यांजली. राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
१. राजमाता
स्वर्णकळी उमलली
तेजस्वी जशी सौदामिनी
लखुजींच्या अंगणी
जिजाऊमाता !!
संस्कारांचे बळ घेऊन आली मानिनी
शहाजींची अर्धांगिनी
दैदिप्यमान !!
यवनांचे हल्ले
काळजी रयतेची वाहिली
शिवबात पेरली
स्वातंत्र्यबीजे !!
पराक्रमी पुत्र
तोरण शिवबाने बांधले
स्वराज्याचे साकारले
स्वप्न !!
डगमगली नाही
ती तेजस्वी नारी
दिली उभारी
शिवराजास !!
धन्य जिजाऊ
असा पुत्र घडवला
रयतेचा झाला
राजा !!
— रचना : अरूणा दुद्दलवार
२. जिजाऊ
जिजाऊ माँ जगदंबा राष्ट्राची जननी
धन्य जाहली शिवबास जन्म देऊनी ।।धृ।।
पती राजे होते निजामाचे वीरमणी
भूमिका निभावे आदर्श माता पत्नी
डगमगली ना कधी झुंजार रागिणी ।।1।।
पुत्राचे पाय पाळण्यात राहे ओळखुनी
शिवबाला समजावी स्वधर्म कहाणी
बाळगोपाळांना सांगे गोष्टी मर्दानी ।।2।।
स्वराज्य स्थापावे ध्यास तिचे मनी स्वप्नि
सुराज्य व्हावे शिवबास शिकवणी
जय जय कार करी म्हणे माय भवानी ।।3।।
शिवबा शूर मावळा राहे दुष्टां संहारूनी
प्रजेला सांभाळी सर्व धर्म भावनेनी
जाणता राजा कीर्ती राही संपादूनी ।।4।।
— रचना : अरुण गांगल. कर्जत- रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800