आम्ही आज सकाळी साडेआठ वाजता इंदूर ला पोहचलो. तिथून सगळे सामान घेऊन यशोधन ट्रॅव्हल च्या बस मध्ये भरले गेले आणि आम्ही निघालो एका हॉटेल वर जिथे आमचा नाष्टा म्हणजे परिक्रमेत याला बालभोग म्हणतात त्यासाठी.
आम्ही साडेदहा वाजता बालभोग घेतला. सगळे जण फ्रेश झालो आणि निघलो ओंकारेश्वर कडे असणाऱ्या निवासी हॉटेल वर.साधारण अडीच वाजता आम्ही हॉटेल मध्ये मुक्कामी पोहचलो. तिथे रूम वर जाऊन सगळे आवरून शुद्ध सात्विक भोजन घेतले. भोजनाला परिक्रमेत प्रसाद भोजन असे म्हणतात. ते जेवून 1 तासभर सगळ्यांशी गप्पा झाल्या. ओळखी झाल्या. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी आली आहेत नर्मदा परिक्रमेसाठी. इथे पुरुष मंडळींना बाबाजी म्हणतात तर महिलांना मैया किंवा माताजी असे म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये आपसात असणारा आदर यानिमित्ताने याठिकाणी व्यक्त होतो तर सर्व सदस्यांना मूर्ती असे संबोधतात.
भोजन प्रसाद घेतल्यावर साधारण साडेचार वाजता आम्ही बसने जवळच असणाऱ्या 3 मठांचे दर्शन घेण्यासाठी निघालो.परिक्रमे पूर्व संध्येला आम्ही गुरूंचे आशीर्वाद घेतले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या श्रीराम संस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर धूनीवाले बाबा यांच्या मंदिरात गेलो. इथे गुरू शिष्याचे नाते पाहायला मिळते.
त्यानंतर आणि शेगाव च्या गजानन महाराज संस्थान च्या देवळात जाऊन गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. समोरच आद्यगुरू श्री शंकराचार्य यांची ओंकारेश्वर स्थित नव्याने उभारलेली देखणी प्रतिकृती आहे.
स्थान ओंकार मांधाता पर्वतावर आहे.आद्यगुरू शंकराचार्य आणि त्यांचे सद्गुरू गोविंद पादस्वामी यांची येथेच प्रथम भेट झाली होती…
तद्नंतर आम्ही हॉटेल वर आलो. उद्याच्या प्रोग्रॅम बद्दल यशोधन टूर चे आयोजक प्रकाश काका यांनी खूप छान छान माहिती दिली. बसने आता होणारी यशोधनची ही 81 वी परिक्रमा आहे. सगळ्यांना पायी परिक्रमा करणे शक्य नसते हे लक्षात घेऊनच प्रकाश काका यांनी यशोधनची परिक्रमा बसने करण्याची योजना आखली आणि बोलता बोलता 81 व्या परिक्रमेत सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले. अतिशय सुंदर नियोजन पाहायला मिळाले. सगळ्या आलेल्या मूर्ती या वयोवृद्ध आहेत परंतु सगळ्यांची उत्तम काळजी घेतली जाताना पाहून खूप बरे वाटले.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800