चौर्याऐंशी लक्ष योनीतुन मनुष्य जन्म हा बहुमोल
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.
पुन्हा आहे जन्म आपला पक्का मनाला समज
जगा जीवन समजा जीवन हे अखंड विश्व अनमोल
स्वच्छ असंख्य नद्या, उंच महान हिमालय, शिखरे
सखोल समुद्र सोनेरी किनारा पसरे विशाल क्षितिजे
आपली वसुंधरा नीलवर्णीय दिसते सुंदर गोल
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.
हिरवी झाडे, निळे आकाश, चंद्र तारे त्यात अमाप
सुर्यादय, सुर्यास्ताचे रंग कोण रंगवती मनोहर
रंगीबेरंगी फुले , पशूपक्षांचा किलबिलाट गोड
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.
जंगले, ही हिरवळी चोहीकडे डोंगर, दरी निरामय
नको मोह माणसा, नको करू अती हव्यास
सुमधूर सृष्टी समतोल, ऐक ना निसर्गाचे बोल
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.
ग्लोबल वॉर्मिग करत पृथ्वी म्हणते ‘हो सावधान’
जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भू प्रदूषण होत आहे
भूमातेच्या गर्भाचे खनिज खणाल किती खोल ?
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.
घे शपथ, घे आण, घे प्रतिज्ञा, आणि दे वचन.
वाचवू माती, जपू थेंब थेंब पाणी आणि शुद्ध हवा.
हाच आहे ठेवा. या पृथ्वीतलावरील हा स्वर्ग बहुमोल
हजारो जन्मातही नाही समजायचे पर्यावरणाचे मोल.

– रचना : पूर्णिमा शेंडे.