१. श्रीराम विजयोत्सव
पाच शतके सरली
झाली आनंदी पहाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
गुढ्या तोरणे पताका
आज सजवूया घाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
किती सोसला विरह
झाली सुमंगला पहाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
धर्म नीती सुखावले
आली विजयी पहाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
राम राज्य आले आज
सत्य पाहतसे थाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
राम चरण वंदूया
जन मेळवू अफाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
सुख शांती निनादूदे
फुलो मांगल्याने घाट
चला होऊया आपण
सारे श्रीरामाचे भाट
— रचना : सौ.शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
२. अयोध्येत श्रीराम
अयोध्येत राममंदिर उभारले अद्भूत
श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल
होईल गौरव उत्फुल्ल होतील रामभक्त
आतिषबाजी नेत्रदीपक सारी होईल
सजली अवघी नगरी करावया स्वागत
हर्षोल्हास मनी स्वेच्छेने पुष्पवृष्टी होईल
दिवाळी जणू पुन्हा देशात अवतरली
झळाळतील दिवे अंधार अस्त होईल
सुरेख रंगावली, गुढ्या तोरणे उभारली
भारल्या मनात श्रीराम मूर्ती स्थित होईल
रामनामाचा गजर शरयू तीरी आरती
आशामनी रामराज्य भविष्यात ही होईल
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800