समुद्र प्रवास…..
आज आम्ही पहाटे 2 वाजताच उठलो. पहाटे साडेतीन वाजता सगळे आवरून निघलो कारण आज श्री नर्मदा मय्या व समुद्र महाराज यांच्या कृपेने श्री नर्मदा परिक्रमेचा समुद्र प्रवास करायचा होता. एकदा का नर्मदा परिक्रमा सुरू झाली की नर्मदा नदी ओलांडून जायचे नसते आणि जिथून परिक्रमा सुरू करतो तिथेच ती संपवायची. त्यामुळे आपण काही काळ दक्षिण तटावर असतो तर काही काळ उत्तर तटावर जायचे त्यामुळे आपल्याला हा समुद्र प्रवास करावा लागतो. काल पर्यंत आम्ही दक्षिण तटावर होतो आता आम्ही उत्तर तटावर जाणार होतो.
अंकलेश्र्वर ते विमलेश्वर प्रवास झाला. पहाटे आम्ही विमलेश्र्वर मंदिरात दर्शनासाठी आलो. तिथे आम्ही चहा आणि बालभोग घेतला. उत्तर तट हा स्वमोक्षार्थ सांगितला आहे. मग समुद्र प्रवास आता सुरवातीपासुन शेवटापर्यंत खूपच सोयीचा आणि सुखकर झाला आहे.
विमलेश्र्वर हे दक्षिण तटा वरील शेवटचे मंदिर. जवळच रत्नेश्वर महादेव आहे. त्यातच बारा ज्योतिर्लिंगे आहेत.
इथे विमलेश्वर शिवलिंगाच्या आत नर्मदा जल आहे. ते तिर्थ म्हणून दिलं जातं. मंदिर आणि परिसर मोठा आहे. समुद्र प्रवास करण्यासाठी ईथे यावच लागतं.
आम्ही आज अगदी भल्या पहाटे देव दर्शन घेतले. आज इथे गर्दी नव्हती. इथे अन्न छत्र आहे. पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना इथे भोजन प्रसाद दिला जातो. आम्ही मस्त गरम गरम शेवया उपमा हा बाल भोग घेऊन छोट्या गाड्यांमध्ये बसून खाडीच्या किनाऱ्यावर आलो. सर्वांनी लाईफ जॅकेट घातली. पूर्वी इथे बांबूच्या शिडीवरून बोटीत जावं लागायचं. आता मात्र लोखंडी शिड्या बसवून सर्वांची सोय करण्यात आली आहे. बोटीत बसणं त्यामुळं आता एकदम सोपं झालं आहे. इथे आमच्या अगोदर अगदी रात्र भर जागून लोक भजने म्हणत बोटी किनाऱ्याला लागण्याची वाट बघत होते. थंडीही होती. जिकडे तिकडे शेकोटी पेटवून लोक शेक घेत भजने म्हणत जागत होती. आम्हीही भरतीचे पाणी खाडीत भरण्याची वाट बघत होतो. साधारण 600 ते 700 माणसे हा प्रवास करणार होती त्यासाठी 6 बोटी होत्या. भरतीचं पाणी बघता बघता वाढलं आणि आम्ही सगळे जण लोखंडी शिडीवरून सर्वजण बोटीत बसलो आणि बोट सुरू झाली.
समुद्र महाराज शांत होते कारण हवा संथ गतीने वाहत होती. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी प्रकाश काका यांनी सगळ्यांना समुद्र महाराज आणि नर्मदा माता यांची मानस पूजा करायला सांगितली होती आणि त्याचा प्रत्यय ही आम्हाला आला. सगळे बोटीत बसले आणि गणपती बाप्पा नर्मदे हर समुद्र महाराज यांचा जयजयकार करत आम्ही निघालो. अंधारातच बोटीतून प्रवास सुरू झाला. थोडा वेळ शांतता होती कारण गार वाऱ आणि थंडीही असल्याने सगळे शांत होते. साधारण 1 तासात सूर्य उगवताना पाहून सगळेजण फोटो काढण्यात मग्न झाले. आणि मग सगळ्यांची बोलती सुरू झाली. दोन तासांच्या प्रवासानंतर उत्तर तटावरून नर्मदा जिथं सागरास येऊन मिळाली तिथं नावाड्यानं जल परिवर्तन केलं. आता आपल्याकडे सागर महाराज पाहुणे आले आहेत. नावाड्यास यथोचित दक्षिणा देऊन सन्मानित केलं गेलं.
बघता बघता उत्तर तट दिसू लागला. उतरताना सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या असणारा धक्का बांधला आहे. त्यामुळं बोटीतून उतरणं अगदी सहज सोपं झालं आहे. प्रकाश काकांनी सगळ्यांचा बोटीत एक फोटो काढला. आम्ही बस जवळ गेलो.
बस मिठी तलाई येथे गेली. इथे गोड्या पाण्याची विहीर आहे. स्नान करणे, हातपाय धुणे असं सगळं झालं. चहा बाल भोग कार्यक्रम झाला. आज 2 वेळा बालभोग मिळाला आणि आम्ही आता दहेज येथील हॉटेल वर मुक्कामी पोचलो.
परिक्रमा बघता बघता दक्षिण तटावरून उत्तर तटावर आली.
मार्कंडेय ऋषींना नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 45 वर्षे लागली होती. त्यांनी नर्मदा नदीला मिळणाऱ्या 999 नद्या ही ओलांडल्या नाहीत. म्हणून त्यांना नर्मदा पुराण लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. नर्मदा नदी ही विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत या दोघांच्या मधून वाहते. मार्कंडेय ऋषींनी या मिठीतालाई विहिरीचे असणारे खारट पाणी नर्मदेचे जल त्यात टाकून गोड केले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे परिक्रमेत नर्मदेच्या स्नाना इतकेच महत्व या मिठी तलाई च्या स्नानाला दिलेले आहे. मय्या कृपा अपार आहे. सगळ्यांची रोज जागरण सुरू असल्याने आज दुपारी विश्रांती होती. रात्री परिचय कार्यक्रम झाला.
आरती झाली. हळदी कुंकू तिळगुळ समारंभ झाला. पुरणपोळी चे जेवण झाले. दुसऱ्या दिवशी परत पहाटे 4 वाजता उठायचे होते.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
छानच