मालसर ते गरुडेश्वर
भल्या पहाटे सहा वाजता सर्व आन्हिके उरकून चहा घेऊन आम्ही सर्वजण आता मालसर च्या दिशेने निघालो. रोज सकाळी लवकर उठणे हा आमचा दिनक्रम झाला आहे. पहाटे म्हणजे साडेतीन ते 4 वाजता उठायचे, आवरायचे आणि निघायचे. रोज नवीन ठिकाणी मुक्काम. त्यामुळे म्हणतात तसे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर. तसे रोज 5 तासासाठी बॅग उपसायच्या, परत बंद करून गाडीत पाठवायच्या. साधारण दोन तासांच्या प्रवासात आम्ही परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज अर्थात श्री टेम्बे स्वामींच्या चरित्रावर प्रकाश काका यांनी निरूपण करून सगळी माहिती सांगितली. स्वामींचा जन्म १३/०८/१८५४ रोजीचा. त्यांचे जन्म गाव, माणगाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळ. स्वामींचे आजोबा हरिभट, वडील गणेशभट, आई रमाबाई पत्नी अन्नपूर्णा आणि स्वामींचे गुरू श्री नारायणानंद सरस्वती.
उज्जैन. नरसोबाची वाडी येथे प्रत्यक्ष यती वेशात नृसिंह सरस्वती यांनी त्यांना दर्शन दिले. ते नृसिंह सरस्वतींचे प्रकट रूप होते.
स्वामींनी आजन्म सोवळे जीवापाड सांभाळले. पायात चप्पल घातली नाही. डोक्यावर छत्री धरली नाही. कोणत्याही वाहनात बसले नाहीत. नद्यांवरची स्तोत्रे लिहिली. स्वामींच्या जवळ असणारी दत्त मूर्ती त्यांच्याशी बोलायची. स्वामींनी जीवन संपेपर्यंत दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. संस्कृत प्रचुर विपुल ग्रंथ संपदा लिहिली.
दत्त पुराण हे कलियुगातील १९ वे पुराण लिहिले. स्वामींच्या जवळ असणारी पंच धातूची दत्त मुर्ती त्यांच्याशी बोलायची.
रंगावधूत स्वामी, गुळवणी महाराज, दीक्षित महाराज, योगानंद सरस्वती हे महाराजांचे प्रमुख शिष्य होते.
इंदोरची महाराणी इंदिराबाई होळकर यांना स्वामींनी एकमुखी दत्त मुर्ती भेट म्हणून दिली होती.
हिंदू धर्मातील घटनेतील दोष महाराजांनी दुरुस्त केले.
आषाढ शुद्ध प्रतिपदा २४/०६/१९१४ यादिवशी गरुडेश्वरी देह ठेवला. हे सांगून पूर्ण झाले आणि आम्ही मालसर ला आलो. हे क्षेत्र नर्मदा किनाऱ्यावर गुजरात राज्यात उत्तर तटावर आहे. तालुका शिनोर, जिल्हा वडोदरा.
येथे किमान सव्वाशे वर्षे जुने स्वामी माधवदास यांनी स्थापन केलेले सत्यनारायण व श्रीकृष्ण यांच्या एकत्र मूर्ती असणारं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मूर्ती अत्यंत साजीरी. एकटक बघत बसावं.
आम्ही अगदी सकाळी सकाळी मंदिरात गेलो होतो. दर्शन झालं. मंदिराच्या पुढं सिमेंट चा चौथरा आहे.
त्यावर बसून पूज्य श्रीकृष्ण डोंगरे महाराजांनी सतत ३३ वर्षे भगवान श्रीकृष्णाचं लीळाचरित्र म्हणजे भागवत कथा सांगितली आहे. समोर कदंब वृक्ष आहे.
डोंगरे महाराज म्हणजे त्याग तपस्या आणि संयम यांची मुर्ती. भागवताचे वक्ते. कृष्णभक्त. देहाला झाकायला केवळ एक धोतर. समोर छोटी कृष्णमूर्ती ठेवून ते कथा सांगायचे. प्रसंगा नुरुप त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तथा देहबोली बदलायची.
मिळणारी बिदागी ते सामाजिक कार्यास देऊनच मग ते आसन सोडायचे. त्यांचं सोवळे अत्यंत कडक होते.
डोंगरे महाराज हे कथा सांगताना कृष्णमय व्हायचे. हिंदू धर्मात जी अठरा पुराणे सांगितली आहेत त्यापैकी एक म्हणजे श्रीमद्भागवत…. पुराणांच्या क्रमवारीत भागवत हे आठवे पुराण आहे. भागवत पुराण व गीता यांचे आधी श्रीमद् हा शब्द वापरतात. कारण ही साक्षात देववाणी आहे. हा पौरूषेय ग्रंथ आहे.
भागवत पुराणाचा संक्षिप्त परिचय पुढील प्रमाणे आहे.
भाषा : संस्कृत
विषय : कृष्ण भक्ती
पाने : १८०००
लेखक : व्यास महर्षी..
कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारा वैष्णव ग्रंथ म्हणजे श्रीमदभागवतपुराण…..
हा ग्रंथ म्हणजे भारतीय वाड:मयाचा मुकुटमणी आहे…
भक्तियोगाचे महत्व समजावून सांगितले आहे.
भागवतातील प्रत्येक श्लोक हा कृष्ण भक्ती सुगंधित करतो. यात साधनज्ञान, सिद्धज्ञान, साधनभक्ती, सिद्धभक्ती, मर्यादा मार्ग, अनुग्रहमार्ग, द्वैत अद्वैत समन्वय आदी विविध विषय हाताळलेले आहेत.
श्रीमद भागवत हा सर्व वेदांचे सार असून त्याचे रसपानाने जो तृप्त होईल त्याचे मन अन्य कुठेच रमणार नाही. या कथेच्या सेवनाने परिक्षीत राजाचा उध्दार झाला. भागवत कथा हीच साधन असून हेच साध्यही आहे. जगावं कसं हे भगवदगीता शिकवते. तर मरावं कसं हे भागवत शिकवते.
वस्तू कष्टाने मिळविता येतात. भगवत भक्ती मात्र त्याच्या ईच्छेनेच घडते. सत्संगा शिवाय विवेक नाही. विवेका शिवाय देव नाही.
भागवत कथा म्हटलं की डोंगरे महाराजांचे नाव आपसुक येतेच.
श्रेष्ठ भागवतवक्ता कृष्णप्रेमी आदर्श पुरुष.
त्याग तपस्या यांची संयमी मुर्ती म्हणजे डोंगरे महाराज.
कथा सांगताना भावानुरूप त्यांच्या शरीरात बदल घडत.
छोटी कृष्णमूर्ती साक्ष ठेवून श्रोत्यांकडे न बघता महाराज कथा करत. कथेतील बिदागी हॉस्पिटल, गोशाळा, मंदीर, अन्नक्षेत्र यासाठी विश्वासू सहकाऱ्यांकडे देऊनच कथेच्या जागेवरून प्रस्थान करत.
महाराजांनी संग्रह काय तो केलाच नाही. एकच धोतर अर्धे कमरेखाली तर अर्धे अंगावर नेसत.
इच्छेविरुद्ध जर कुणी दर्शन घेतले तर महाराज उपवास धरत.
महाराज नीतिमान आयुष्य जगले.
भगवद गीतेचे सार म्हणजे न्याय आणि नीती हेच आहे.
नर्मदा किनाऱ्यावर गुजरात राज्यात उत्तर तटावर मालसर येथे डोंगरे महाराजांनी सलग ३३ वर्षे भागवत सांगितले.
महाराजांनी शेवटची कथा शुकताल येथे सांगितली.
तिथल्या कदंब वृक्षाखालील डोंगरे महाराजांचा कथेचा चौथरा आहे.
सत्य नारायण मंदीर आहे. अंगारेश्वर मंदिर आहे. पंचमुखी हनुमान आहे. राम लक्ष्मण सीता मंदिर आहे.
नर्मदा परिक्रमा मार्गावर हे स्थान आहे.
पुढे अंगारेश्वर महादेवाचे कुणा यवनाने तोडलेले व पुन्हा पश्चात बुद्धी आल्या कारणाने नव्याने बांधलेले शिवमंदिर आहे ते पाहिले.
त्याच्या खुणा मंदिराच्या मागील भिंतीवर आजही पाहायला मिळतात.
मंदिरात गणपती व हनुमान आहेत.
परिसर स्वच्छ आहे.
जवळच पंचमुखी हनुमंतराय तसेच राम लक्ष्मण व सीता माई यांच्या मूर्ती असणारं मंदिर आहे.
मालसर मध्ये वर्षभर भागवत कथा चालते.
इथं राहण्याच्या व भोजनाच्या चांगल्या सोयी आहेत.मालसर दर्शन करून बाल भोग घेऊन आम्ही आता शिनोर कडे निघालो. मालसर पासून शिनोर पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे वडोदरा जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. मोठी बाजारपेठ आहे. जुनं गाव असल्या कारणाने रस्ते लहान आहेत. पूर्वीच्या सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातील हे गाव आहे. गुजराती धाटणीची अनेक जुनी घरे आजही पहायला मिळतात.
उत्तर तटावरील शिनोर मध्ये नर्मदा किनाऱ्यावर श्री गणपती मंदिर असून देवाच्या दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत.इथे पायी वाल्यांसाठी अन्नक्षेत्र आहे.समोर विशाल नर्मदा पात्र आहे.
भलामोठा घाट आहे.
हे स्थान पायीच्या मार्गावर आहे.
रंगावधूत स्वामींनी आपल्या शिष्य गणांना नारेश्र्वर ते गरुडेश्वर पायी परिक्रमा करण्याचा सल्ला दिला होता. त्याने संपूर्ण परिक्रमा पूर्ण केल्याचं पुण्य पदरी पडेल असंही सांगितलं. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिनोर ते सौभाग्य सुंदरी दरम्यान दिडतास किमान पाच किलोमीटर अंतर सर्वाँना पायी चालत जायचे होते.
सर्व मूर्ति आनंदाने नर्मदेच्या काठाने पायवाटेने चालत आल्या. त्यात सर्व वयोगटातील मुर्ती होत्या.
नर्मदा किनाऱ्यावर आपल्याला आपल्या क्षमतांचा नव्याने अंदाज येतो. नर्मदा अगदी उजव्या हातास ठेवून आम्ही चाललो.
किनारा निर्मनुष्य. स्वच्छ नितळ निर्मळ शांत नर्मदा आणि आपण एकुटवाने.
अनुसंधान यातूनच होते.
पायी चालण्यातलं सुख अनुभवायचे असेल तर नर्मदा किनाऱ्यावर यायला हवं.
उन्हात चाललो तरी सगळे जण आनंदात होते. वाटेत भंडारेश्वर महादेव मंदिर आहे. तिथेही जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतले आम्हाला छान लिंबू सरबत मिळाले. हे मंदिर थोडे उंचावर असल्याने तिथून नर्मदा नदीचे भव्य पात्र सुंदर दिसत होते. आम्ही परत चालायला सुरुवात केली.
शिनोर पासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर सौभाग्य सुंदरी नामक देवीचे मंदिर आहे. हे स्थान पायीच्या मार्गावर आहे.
कणाकणाने वाढणारी देवी अखंड सौभाग्य लाभावे म्हणून पुजण्याची प्रथा आहे.
ईथे अनेक शिवमंदिरे आहेत. बिल्व वृक्ष आहेत. वीरगळ आहे. वानर सेना भरपूर आहे. परिसर निर्जन आहे. ईथपर्यंत आम्ही पायी परिक्रमे अंतर्गत चालतच आलो. दर्शन झालं.
नर्मदा किनाऱ्यावर अनुसया माता याठिकाणी ब्रह्म, विष्णू व शिव यांनी अनुसयेची परीक्षा घेतली व त्यातून दत्त प्रभू जन्मास आले असं म्हणतात.
येथे सती अनुसया मातेचे मंदिर आहे. हे स्थान पायीच्या मार्गावर आहे. दत्त प्रभूंचे निराळे संस्थान आहे.
उत्तर तटावरील वरील या आश्रमासमोरून नर्मदा वाहते. आपण उंचावर असल्यानं मय्येचे मनोहारी रूप इथे पाहायला मिळते.
बरीच मंदिरे आहेत. जागा रमणीय आहे.
पायी परिक्रमा करत असताना इथे मुक्काम व भोजन यांची व्यवस्था केली जाते.
येथे गंगनाथ नावाचे शिवलिंग आहे. इथून चांदोद पर्यंतचे मय्या पात्र दिसते. तात्या टोपे भूमिगत असताना येथे येऊन राहिले होते.
मार्कण्डेय पुराणात वरील शिवलिंगाचा उल्लेख आहे. नर्मदा किनाऱ्यावर कुबेर आल्याचा उल्लेख आहे.
इथे ते शिवस्वरूप आहेत तर देवी पार्वती ही जगदंबेच्या रुपात आहेत. इथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. आजच्या दिवशी गुजरात राज्यातील नर्मदा किनाऱ्यावरील पायीच्या मार्गावरील कितीएक अनमोल अनवट जागांवर जाऊन आम्ही देवदर्शने घेतली.
ही स्थाने बसच्या मार्गावरील खचितच नाहीत. लहान रस्ता व दोन्ही बाजूला रस्त्यावर आलेला झाड झाडोरा यामुळे आमची बस दोन्ही बाजूला चांगली घासत होती परंतु सर्वांना अगदी किनाऱ्यावर नेल्याचा आनंद त्यापेक्षा अधिक असतो असे प्रकाश काका म्हणाले.
येताना गुरुवार असल्याने सगळ्यांनी आग्रह धरल्याने गरूडेश्र्वर येथे दत्त मंदिरात व टेंब्ये स्वामींच्या समाधी स्थानी जाऊन दर्शन घेतले. संध्याकाळची आरती मिळाली. सगळ्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी खरे तर सकाळी आम्ही या मंदिरात येणार होतोच पण आज गुरुवार चां योग होता. मग हॉटेल वर आलो. रूम ताब्यात घेतल्या आणि नेहमीप्रमाणे आमचा हरिपाठ आरत्या साठी हॉल वर जमा झालो. तदनंतर भोजनोत्तर मुक्काम गरुडेश्वर….
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800