तिसरी कन्या म्हणुनी दुर्लक्षी
दुःखी आजी-आजोबा झाले
बाबांची रोजचीच मारझोड
सांगा यात माझे काय चुकले ?
नाही पाटी-दप्तर ना शाळा
नसे सवंगडी मित्र-मैत्रिणी
आई बिचारी मनात झुरली
खायची सगळ्यांची बोलणी
मोलमजुरी करुनी सुद्धा
अंगभर नाही मिळाले वस्त्र
चकार शब्द नाहीच बोलणे
तयार होतेच काठीचे अस्त्र
दोनाचे चार,भाग्य नाही फळले
तिथेही कमतरता असे भाकरीची
दारू ढोसून रोजचीच मारझोड
वाताहात सगळ्या संसाराची
आपल्याच विश्वात रमली मुले
प्रारब्ध नाही आपल्या हातात
म्हातारपणी ना आधार कुणाचा
आणुनी सोडी शेजारी आश्रमात
कळेना देवा असे काय पाप केले
भोगणे असेल पूर्वजन्मीचे संचित
दे आता चरणी ठाव मला तुझ्या
नको करु स्त्रीजन्मा कधी वंचित
— रचना : डॉ. सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800