गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज, 6 फेब्रुवारी रोजी दुसरी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या हृद आठवणी सांगताहेत संगीत कार्यक्रम आयोजक श्रीकांत कुलकर्णी.
लता दीदींना विनम्र अभिवादन.
– संपादक.
लतादिदी १९४३-४४ पासून अव्याहतपणे दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी स्व. दिनानाथ मंगेशकर पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सादर करत असत. बरीच वर्षे मी सुद्धा कार्यक्रमाला जात असे. प्रत्यक्ष लतादीदींना पहाणे आणि त्यांचा आवाज ऐकणे ही पर्वणीच होती.
असाच एका वर्षी २४ एप्रिलला षण्मुखानंद सभाग्रुहात कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाचे आयोजक श्री. अविनाश प्रभावळकर (हृदयेश आर्ट) मला परिचित होते. त्या दिवशी माझ्या बरोबर भारतीय चित्रपट श्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि सौ. मृदुला पुसाळकर होते. कार्यक्रमाला सालाबादप्रमाणे मान्यवर आणि स्टार सिंगर्स आणि तारे-तारकांची उपस्थिती होती. मध्यंतरात मी शेखरला म्हणालो चल आपण लतादिदींना भेटूया. तो तर उडालाच. “अरे श्रीकांत नको केवढी गर्दी आहे तसेच कडेकोट बंदोबस्तपण आहे”. मी म्हणालो, “तू चल मी आहेना”.
मी स्टेजवर गेलो अविनाशला म्हणालो माझ्या सोबत दादासाहेब फाळके यांचे नातू आणि नातसुन आले आहेत त्यांची दिदींबरोबर भेट घडवायची आहे, तो म्हणाला, “जा दिदींना भेट, त्यांना पण घेउन जा”.
मी त्या दोघांना बाहेर थांबून ग्रीनरुममधे शिरलो. आत पंडितजी, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती आणि बरेच जण होते. समोर दिदी बसल्या होत्या. मी त्यांना नमस्कार केला आणि सोबत नेलेली “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या” भाषणांची सीडी त्यांना भेट दिली. (आमच्या झपाटा मार्केटिंग तर्फे ही सिडी सादर केली होती.)
दिदींनी ती सिडी बघीतली आणि म्हणाल्या, “तुम्हाला कुठे मिळाली ?”
मी म्हणालो, ”स्वातंत्र्यवीर सावरकरस्मारक येथून मिळाली आणि सावरकर प्रेमींसाठी त्याची सिडी बनविली”.
दिदी म्हणाल्या, “पण ह्यात स्वातंत्रवीरांच्या लालकिल्ल्यावरील भाषणाचा समावेश नाही”. मी सांगितले, “मला ते मिळालं नाही”. तेंव्हा त्या म्हणाल्या, “माझ्याकडे ते आहे,” लगेच मी म्हणालो, “तुम्ही ते दिलेत तर त्याची पण सिडी करायला मला आवडेल”. त्यांनी आदिनाथला बोलाविले आणि त्याला ती सिडी दिली.
मी दिदींना सांगितले, “दादासाहेब फाळके यांचे नातू आपणास भेटावयास आले आहेत”. त्या लगेच म्हणाल्या, “त्यांना घेऊन या”. मी त्वरीत बाहेर येऊन दोघांना आत घेऊन गेलो. दिदींनी आम्हाला बसायला सांगून त्यांची आस्थेने विचारपूस केली. शेखरने दिदींना फाळकेंची प्रतिमा भेट दिली. नंतर आमच्या चौघांचा मी दिदींच्या अनुमतीने फोटो घेतला आणि दिदींचा निरोप घेउन बाहेर आलो.
— लेखन : श्रीकांत कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Vert sweet memories
खूप छान आठवणी आहेत.