आई – ती येऊन चक्क बिलगली, अन मला म्हणाली….!!
सृष्टी – आई तू कधी देणार…गं…बाबांना…?
आई – (मी म्हणाले काय द्यायच गं राणी..! तर म्हणते कशी…!)
सृष्टी – काय गं आई..तू पण ना..! सगळी सगळीकडे आज पासून रोजडे, प्रपोज डे, प्राॅमिस डे अक्षरशः किस डे, व्हॅलेंटाईन डे पण..!? अजून काय काय.. अन किती ते डे जग साजरे करत आहे. अन् तुला मात्र कसलेही सोयरसुतक नाही.. या..विषयाचं…छे बाई…!!
आई – (मी जरा गालात हसत तिला म्हणाले….!) कोणी कोणाला द्यायचे रोज सांग की…!? तिचे बोल माझ्या मनातच ठसले, तिला अजुनच घट्ट पकडून कुशीत घेऊन तिच्या कोमल गालावरून दोन्ही हात फिरवत म्हणाले….!!)
आई – अगं माझ्या प्रिय राणी….!! एक प्रश्न विचारू ? उत्तर देशील मला….? (तिने मान व केसांची पोनी डोलवतच जरा आश्चर्याने हो म्हटले.)
आई – मला सांग आपल्या घरात गुलाबाची झाडे आहेत ना…? ती “हो” म्हणाली…!! जेव्हा गुलाबाला पहिले फूल आले होते तेव्हा आपण काय केले आठवते तुला..? तिने गालावर बोट ठेवून जरा विचार करत…हं..हं…म्हणत “हो” म्हणाली.
आई – सांग पाहू काय केले होते ?
सृष्टी – हो..! आठवलं आई. गुलाबाचे पहिले फुल आपण देवाला वाहिले होते.
आई – नंतर दुसरे फूल आल्यावर काय केले सांग…?
सृष्टी – अं…हो..हो..ते मीच तोडून आणून बाबांकडे दिले तेव्हा बाबांनी ते तुला द्यायला सांगितले होते आणि तू ही ते छान केसात माळले होते…..!!
सृष्टी – ए..! आई पण मी जे विचारते त्याचे उत्तर दे..उगीच मलाच नको प्रश्न विचारू…हं….!!
आई – बरं..बरं…आता फक्त एकच प्रश्न हं…! नंतर झाडाला खूप फुले येत गेली….त्यांचे आपण काय केले सांग बरे बाळा…..?
सृष्टी – आई नंतर तर इतकी फुले आली की…. त्यांचे काय केले ते आठवतच नाही….गं…! कुणाला वाटून दिले होते का…!!
आई – मी सांगते…हं..राणी…! गुलाब फांदीवर भरगच्च लगडलेली फुले पाहिली अन काय करावं म्हणून, मी मग सरळ त्याचा छानसा गुलकंद केला..!! आधी विचार आला होता वाटून द्यावीत पण ती देखील सुकल्यावर फेकलीच गेली असती…ना…!म्हणून हा प्रयोग केला व तो सक्सेसही झाला.
सृष्टी – हं… बरोबर…आठवले.! किती छान मधूर लागत होता तो गुलकंद आई. अजूनही तुझ्या हातचा गुलकंद सगळ्यानाच आवडतो..! अगं आई पण यात माझ्या प्रश्नाच उत्तर राहूनच जातय ना..गं…!!
आई – अगं राणी यातच तर मी तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर दिले..ना… तुझ्या लक्षात नाही आले का…!!
सृष्टी – उत्तर दिले ? अन् तू मला..(आश्चर्याने) कधी..? केव्हा ? सांग..सांग…! (मी खळखळून हसले तिच्या केसांना तेल लावत म्हटले….!)
आई – हे बघ राणी..! गुलाबाचे पहिले फूल आपण भगवंताला दिले म्हणजेच काय तर जीवनात आपला पहिला नमस्कार असो की खाद्यपदार्थ असो,अथवा वस्तू मनापासून ही (सुमनाने)भगवंताला वाहायला हवीत.
दुसरे फूल म्हणजे जे घराचे कर्ता धर्ता आहेत ते. ज्यांच्यात सर्वांचा खूप जीव आहे असे तुझे बाबा. त्यांच्याकडे तू हक्काने फूल आणून दिले व त्यांनीच ते फूल तुझ्यामार्फत मला द्यायला लावले म्हणजे बाबांनी लाडक्या लेकीच्या म्हणण्याने मला फूल दिले. पण ते तुझ्यामार्फत मी देखील त्यांच्या हक्काची पण तुलाही कळावे की, घरातली गृहिणी / नोकरदार स्त्री सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. बाकीच्या फुलांचाही असाच उपयोग केला म्हणजेच ते नातेवाईक. अशाच प्रकारे झाड जसे जसे पोक्त होत गेले तसे तसे त्यावर अनेक फुले फुलत गेलीत म्हणजे आमच्या संसारात अनेकांची संख्या वाढली. जसे झाडाला कुठे कळ्या तर कुठे फुले आलेली तर कुठे पाकळ्या गळत चाललेल्या. तसे संसारात लहान, मोठी, कोवळी, ज्येष्ठ मंडळी घर करून राहिलीत व काही निजधामाला गेलीत.
या सगळ्यांना प्रेम तर द्यायलाच हवे म्हणून ती बाहेर न टाकता मी सरळ एका बरणीत पाकळ्या साखरेच्या पक्क्या पाकात एकजागी करून मुरवून ठेवल्यात आणि मधूर गुलकंद तयार झाला. अशाच प्रकारेच माझी सारी नाती मी एका धाटणीत एका छताखाली प्रेमाच्या स्वभावातून जपत आले आहे बाळा आणि जीवात जीव असे पर्यंत ती जपेल बघ. गुलाबाच्या रोपाकडे तू बघितलं असेलचं कमी फुलं असतात तेव्हा ते अगदी हलकेच हलतात परंतु जेव्हा आंगोपांग कळ्या फुले लगडतात तेव्हा किती मोठ्या आनंदाने हलतात डुलतात हो..ना…! सगळे एकत्र आलेले असतात. खूप आनंद झालेला असतो म्हणून ती मनसोक्त हलतडुलत असतात. का तर एकत्र फुलण्याने आनंदाचा अनुभव जास्त मिळतो म्हणून. तसेच कुटुंब एकत्र आले की, आई वडिलांनाही सुखाने नांदणाऱ्या गोकुळासारखा आनंद मिळतो. अशीच आणि हिच तर माझ्या जीवन रूपी वृक्षावर जपत आलेली प्रेमळ नाती आहेत बेटा.. .!! (सृष्टी मग्न होऊन आईचे बोलणे ऐकत असते.)
आई – सृष्टी…सृष्टी….अगं..! कुठे गुंग झालीस…..!! मिळाले ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर ….!!
सृष्टी – आई शपथ…! कसली भारी बोललीस. किती हुशार आहेस गं..आई..तू…!I am Proud Of You Aai….Love You So Much….Dear.
आई – बरं बरं..आता सांग..? आजही तुला असे वाटते का मी बाबांना आजच्या दिवसापुरतेच गुलाब फूल द्यावे.. अगं त्यांनी तर माझ्या जीवनात तुमच्या रूपातून किती गोड, सोज्वळ मुलं दिली आहेत. भैया अन् तू असेच आमच्या संसाररूपी बागेतले सर्वात सुंदर फुले आहात अन् नातेवाईक हे पालवी…!!
सृष्टी – आई मानलं तुला. नाहीतर काही ठिकाणी गुलाब दिला नाही म्हणून नाराज होणाऱ्या बायका पाहिल्यात मी. पण तू तर संसारात सगळ्यांना मानाने, लाडाने जीव लावतेस व त्यातच तू तुझे स्वत:चे सुख, आनंद मानतेस.. Hats Off Aai.
आई – आता पटलं ना….कुठलाही एक दिवस साजरा करून प्रेम मिळवता येते का..? नाही ना..! असे प्रेम अतूट बंधनात बांधून ठेवण्यासाठी साऱ्या नात्याला रोजच मनापासून प्रेम द्यावे लागते तेव्हा कुठे काटेरी असला तरीही गुलाब वृक्ष कायम बहरत राहतो व यातून पुढे सशक्त पिढीला संस्कार देता येतात… कळलं का सृष्टीराणी तू देखील हा वसा लग्न झाल्यावर सोबत घेऊन जा आणि अशीच फळवं फुलवं तुझ्या संसार रूपी अंगणातली गुलाब बाग.
आशीर्वाद आहे माझे तुला…! मला खात्री आहे, माझी राणी अशीच वागणार…होय..ना..!
सृष्टी – होय आई..! प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलाही एकच दिवस लागत नसतोतर रोजच रोज डे असतो…! तू दिलेले संस्कार, संस्कृती मी पण जपणार आई.
आई – कशी काव्यात्मक बोलतेस गं..बयो..! आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा..! सगळीच झाडं सावली देऊ शकली नाहीत तरीही त्यांच्यातले चांगलेपण वाटण्यासाठी ते सुद्धा आपणहून तयार असतात. जसे की गुलाबांसारखे रोपटे. सावली नाही पण सुगंध, विविध रंग देऊ शकतातचं ना..! अशांना गरज असते ती फक्त आपल्या प्रेमाच्या सावलीची,अंतरीक संगोपनाची म्हणून आपण ती देत रहावी. आयुष्य खूप सुंदर का आहे तर; मनात खरेपणाचा आदर असतो म्हणून….! किती गोड हसलीस..गं…! हाच “गुलाबी वसा” मानून अशीच कायम हसतमुख रहा अन् मला प्रश्न विचारत रहा..हं.. लाडके…!
— लेखन : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800