दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझाच्या सहकार्याने येत्या २४ व २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिले मराठी साहित्य संमेलन गोव्यात, पणजी येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ, निसर्गाचे अभ्यासक व लेखक किरण पुरंदरे यांची निवड झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्लीचे अध्यक्ष मिलिंद महाजन, प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर व विभागीय कार्यवाह चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
या संमेलनाचे उद्घाटन २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनात विशेष पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री एड रमाकांत खलप, ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत पोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्या देवधर, त्याशिवाय दिवाकर शिंक्रे, इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर, विभागीय कार्यवाह चित्रा क्षीरसागर व मंडळाचे अध्यक्ष मिलिद महाजन आदी उपस्थित राहतील.
या संमेलनात विद्या देवधऱ, डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रशांत पोळ, साहित्यिक दया मित्रगोत्री, अलकनंदा साने व पर्यावरण प्रेमी आणि लेखक प्रा. राजेंद्र केरकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन सिध्दी उपाध्ये करणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात डॉ. प्रमदा देसाई, प्रशांत पोळ आणि परेश प्रभू सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता पुस्तकाचे डिजिटल माध्यमावरून प्रचार व विपणन या विषयावर दृकश्राव्य प्रस्तुती काजल कामिरे करतील. यानंतर सांयकाळी ४ वाजता निमंत्रिताचे कविसंमेलन अलकनंदा साने यांच्या अध्यक्षतेखाली होईल. संध्याकाळी ६.३० वाजता माझिया अंगणात सये हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. प्रा. पौर्णिमा केरकर यांनी लेखन केले असून जयेंद्रनाथ हळदणकर यांचे दिग्दर्शन आहे.
संमेलानात २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३५ वाजता प्रसार माध्यमांचा मराठी भाषेवर परिणाम या विषयावर बनारस हिंदू विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद भगवान पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात भोपाळचे अजय बोकिल, गोव्यातील प्रा. कृष्णाजी कुलकर्ण व तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर. इंदूर येथील अरविंद जवळेकर, बेळगावचे गोपाल गावडा, काशीचे संतोष सोलापूरकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन राजश्री जोशी व सर्वोत्तम मासिकाचे संपादक आश्विन खरे करतील.
सकाळी ११.१५ वाजता साहित्यिक मुलाखत व गप्पांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पुरंदरे करतील. या कार्यक्रमात साखळी येथील साहित्यिक गजानन देसाई, महाकौशलचे प्रशांत पोळ, माळवा येथील विश्वनाथ शिरढोणकर, बेळगावचे डॉ. विनोद गायकवाड, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर सहभागी होतील. या सर्वांची मुलाखत बडोदा येथील संजय बच्छाव घेतील. दुपारी २.३० वाजता बोटीवरील निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माधवराव सटवाणी करतील.
सायंकाळी ६.३० वाजता संमेलनाची समारोप होईल त्यानंतर सामूहिक पसायदन पठण होईल.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800