मुंबईत दाखल
“मनी वसे ते स्वप्नी दिसे” माझी अगदी अशीच अवस्था झाली होती. डोळ्यासमोर मुंबईच्या गगनचुंबी इमारती.बेधुंद-सुसाट, रस्त्यावरून धावणाऱ्या, वाहनांची गर्दी. महाविद्यालयात, टीप-टॉप वेषात वावरणारी मुले. लांब लचक धावणारी, मुंबईची रेल्वे. हे नजारे सतत माझ्या डोळ्यासमोर घर करू लागले होते.
गावातील अगदी ओळखीचा, पण विश्वासातला सोबती पाहून, मला मुंबईला पाठवण्याचा दिवस निश्चित झाला. बोटीच्या प्रवासाचे, देवगडहून तिकीट काढले होते.
एव्हाना, माझ्या बांधा-बांधीला सुरुवात झाली होती. ठेवणीतले चांगल्या स्थितीतले दोन मिडी स्कर्ट व दोन शर्टस, काढले. रोजच्या वापराला दोन घेरदार परकर व सैलसर लांब शर्ट, उपयुक्त असणारी, म्हणजेच इंग्रजी शब्दकोश व इंग्रजी व्याकरण पुस्तक, हात बॅगेत भरले. राहिलेल्या वह्या-पुस्तकांवरून, अलगद मायेने हात फिरवला व पूर्ण एक दिवस, प्रत्येक पानन् पान उघडून, डोळे भरून पाहून घेतले.
आई-बाबांना, दोघांनाही सोडून, प्रथमच मी निघाले होते. त्यामुळे आईची कर्तव्यदक्ष नियमावली, सांगणे सुरू होते. ‘नीट मन लावून अभ्यास कर, घर नि कालेज, येवढाच करायचा. माई(काकी) सोबत कामाक हातभार लावायचो, जेवढयाक-तेवढाच बोलायचा, पैश्यांची उधळपट्टी करायची नाय, भारचा काय खायचा नाय, तब्येत आपली सांभाळायची.’ असं खूप काही, निघण्याच्या दिवसापर्यंत आई सांगत होती.
मुंबई तशी मला काही नवखी नव्हती. आईचा शब्दन् शब्द गाठीशी बांधून, त्यांच्या आशिर्वादाला ह्रुदयी कवटाळून, मी त्या दिवशी, म्हणजेच संध्याकाळी चार वाजता, बोटीच्या प्रवासाला प्रारंभ केला होता. हळू हळू सूर्य डोंगरा आड होतान (मावळतीला) दिसू लागला होता. बोटीने, समुद्राच्या शांत पाण्याला मागे सारत, उंच लाटांचा नयन मोहक नजरा थाटला होता. मधेच वेगाचा थंड वारा येताच, पाण्याचे शिडकाव, अंगावर येत होते. नयन रम्य सृष्टीचे रूप, डोळ्यात साठवून घेतले, नि भरल्या डोळ्यांनी माझ्या गावाचा मी निरोप घेतला होता.
पहाट होताच, बोटीत माणसांची लगबगीने, आवरा-आवर सुरु झाली. मीही ताडकन उठून बसले. बोटीच्या कडेला जावून उभी राहीले. जिथपर्यंत नजर पोहचली, तिथे अगदी दूरवर, उंच इमारतींचे मनोरे दिसू लागले होते. कंपनींच्या चिमण्यातून धूर बाहेर पडताना दिसत होता. मनाने उत्सुकतेची, उभारी घेतली होती.
कधी एकदा भाऊच्या धक्क्यावर उतरते, असं वाटत राहीले होते. “मला कुणी घ्यायला आले असतील ना ? मी येण्याचा दिवस, विसरले तर नसतील ना?” भीतीने मनात शंकांचे काहूर भरले होते. भावाला (आज्याला) बघूनही खूप महिने गेले होते.
बोट धक्क्याला लागताच, मी दूरवर धक्क्यावर, माणसांमध्ये नजर फिरवली. सोबतीच्या काकांना सांगितले, “तो बघा कोपऱ्यात, हात उंचावत, माझा भाऊ उभा आहे.” बोटीतून उतरताना, जणू मी विमानातून, विमानतळावर उतरत होते, अशी कल्पना मनाला चाटून गेली .
काकांच्या घरी सर्व, (वडाळ्याला) महाविद्यालयात, मला प्रवेश मिळवून देण्याच्या घाईत होते. शेवटी माझा प्रवेश ‘सिद्धार्थ कॉलेज, फोर्टला झाला. वडाळा ते व्ही. टी. असा रेल्वे प्रवास, मला करायचा होता.
काकांची खोली तशी लहानच, त्यात आम्ही एकूण सात माणसे राहणार होतो. पार्टीशन टाकून, स्वयंपाक खोलीला आडोसा दिलेला होता. पाणी बाहेरून, सार्वजनिक नळातून भरावे लागत असे. सार्वजनिक शौचालयाचा वापर होत असे. एकूण सारे, कठीणच होते. दोन गल्ल्या सोडून, माझ्या मोठ्या बहिणीचे (बायो)सासर होते. तेवढाच मला सोबतीचा आधार होता. तिच्या मुलांमध्येही विरंगुळा मिळत होता.
महाविद्यालयातून परतल्यावर, घरातून (भाऊ)तुळशीदास व मामांचा भाऊ यांच्याकडून अभ्यासाबद्दल, सर्वसामान्य जागतिक घडामोडींबद्दल, अशी बरीचशी माहिती मिळत असे. रोज येणारा पेपर व रेडिओवरून ऐकण्यात येणारी माहिती, माझ्या ज्ञानात भर टाकत होती. माझ्या भावाची (आज्याची) पेंटिंग अगदी अप्रतिम ! त्यामुळे कामावरून आल्यावर, फिल्मी अभिनेत्यांचे, जुन्या महापुरुषांचे, संतांची व निसर्गाची अशी बरीच चित्रे तो काढत असे. पण त्याच्या आवडीच्या छंदाला जोड मिळू शकली नव्हती. मला आजही आठवतं, त्याने माझेही हुबेहूब चित्र रेखाटले होते.
अकरावीच्या वर्गात, जवळजवळ सहा महिने मला, सर्व लेक्चरस् इंग्रजी भाषेत असल्याने, डोक्यावरून जात. मराठी विषय, मातृभाषा असल्याने, त्या विषयाचा अभ्यास मनापासून होत असे. नोट्स लिहिताना, एका ओळीत दोन-चारच शब्द, लिहिले जात असत. प्राध्यापकांचे तोंडी भरभर बोलणे, वहीत इंग्रजीत लिहिणे, मराठी माध्यमातून, शिकणाऱ्या विद्यार्थ्यास, फार कठीण जात असे. शब्द- उच्चार व स्पेलिंग, नवीन शब्दांची ताळमेळ बसत नव्हती. ह्या अवधीत, अगदी जिवा भावाची एक मैत्रिण, मला मिळाली होती, सुरेखा गावडे .रंगाने गव्हाळ, रुंद बांध्याची, गोल चेहरा, कमळाच्या देठासारखे सरळ जाड केस, स्मित हास्यी होती. तीही शिक्षणासाठी तिच्या विदर्भातील गावातून, मुंबईला तिच्या काकांकडे राहण्यास आली होती. त्यामुळेच कदाचित आमच्या, विचार धारणेरूप, आमची मैत्री झाली असावी.
दरम्यान, आमच्या कुटुंबात खूप उलथापालथ झाली होती. माझ्या बहिणीचे पती (माझे भावोजी) ह्यांचे निधन झाले होते. दुःखाचा खूप मोठा पहाड आमच्या परिवारावर कोसळला होता. आई- बाबा मुंबईला येऊन, माझ्या बहिणीला, चार मुलांसह गावी घेवून गेले होते. भर तारुण्यात तिच्यावर हा प्रसंग ओढवला होता. सगळेच हेलावून गेले होते. जबाबदारीचे ओझे, माझ्या भावावर व माझ्या आई-बाबांवर पडले होते. त्यातच (बेबी)दोन नंबर बहीण, हिलाही तिच्या जाऊबाईंनी, घरातून बाहेर केले होते, त्यावेळी काकांच्या आर्थिक मदतीमुळे, तिने तिचा संसार, वडाळा (मिठागर)येथे, यथाशक्ती झोपडी खरेदी करून, संसार थाटला. म्हणतात ना ! ‘दुःखे आली की पाठोपाठ येतात !’
मनाला सावरत, अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या अभ्यासाला लागले. मराठी विषय सोडून बाकी विषय तसे कठीणच गेले होते. कशी तरी पास झाले होते. पण मराठी विषयात पूर्ण अकरावी तुकडीतून मी प्रथम आले होते. ‘दुधाची तहान ताकावर भागली’ असे मानून पुढे जायचे ठरवले.
काकांच्या सेवानिवृत्ती नंतर, त्यांनी भांडुपला घर घेतले व त्यांच्या कुटुंबाने तिथे जावून, स्थायिक होण्याचे ठरविले. तेव्हा ते म्हणाले, ‘आज्या तावसर तू हय रहव.’ पुढे आम्ही, एक वर्ष काकांच्या खोलीत, कोणताही मोबदला न देता राहिलो. मुंबईतील दहा×दहा चे घर का असे ना, पण त्यावेळी ते मिळवणे अवघड होते. त्या वेळेस त्यांनी आम्हाला दिलेली साथ, लाखोपटींनी महान होती.
बारावीचे वर्ष सुरू झाले होते. पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेला सामोरे जायचे होते. ताणतणावात असतानाच, माझ्या सोबत एक भयावह घटना घडली होती. रोज ज्या रेल्वेने मी प्रवास करत होते, त्याच नेहमीच्या प्रवासात, एके दिवशी, माझ्या डोळ्यासमोर एका मुलाने, माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून, चालत्या रेल्वेतून तो चोर, पळाला होता. त्यावेळी माझे भीतीने अंग कापत होते. मनात अनेक विचित्र विचार थैमान घालत होते. माझे रडणे, मला आवरता येत नव्हते. भावासाठी बनवलेली ती सोन्याची साखळी, माझ्याकडून हरवली गेली होती. मला फार अपराधीपणा वाटत होता. “मी, ती साखळी रोज गळ्यात घालायला नको होती. इतकी महागडी वस्तू, मी जिवापाड जपू शकले नव्हते.” असे राहून राहून, मनात विचार येत होते. हया घटने वरून, घरात मला कुणी टोचून बोलले नव्हते. पण मलाच माझी कीव आली होती. आजतागायत तो प्रसंग मी विसरू शकले नाही. प्रवासातील सावधानता कशी घ्यावी ? हा एक मला मिळालेला, आयुष्यातील महत्वाचा धडा होता.
माझ्या महाविद्यालयाची वेळ दुपारची असल्या कारणाने, मी सकाळी लवकरच पाणी भरून, स्वयंपाक, धुणी भांडी आवरून घेत असे. सार्वजनिक नळावर रजिया नावाच्या मुस्लिम मुलीशी, माझी गट्टी झाली होती. त्यामुळे तिने लावलेल्या पाण्याच्या रांगेत ती मला, सात- आठ हंडे, पाणी भरू देत असे. तिच्या घरी किंवा माझ्याकडे आमच्या गप्पाही रंगत असत. मी शिकतेय, ह्याचे तिला फार कौतुक वाटत असे. कारण तिने शाळा सोडली होती.
काकांचे मित्र, आमच्या जवळपास राहत होते. त्यांचा मुलगाही अधून मधून येत असे. तोही मला कधी बाजार वगैरे आणून देत असे. तसे त्यांचे, आमच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. तेही आमच्याच विजयदूर्गचे होते. त्यालाही अभ्यासाची खूप आवड होती. काका राहत होते, तेव्हापासूनच त्याचे येणे- जाणे आमच्याकडे होतेच, त्यामुळे ओळख ही पूर्वीपासूनच होती. ह्या दोन व्यक्तींनी, मैत्रीच्या नात्याने, त्यांनी केलेली मदत त्यावेळी मला फार मोलाची होती. कारण अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा ह्या हेतुने त्यांनी केलेली ती मदत, मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
बारावीच्या परीक्षेला, मला ‘ज्ञानेश्वर विद्यालय’ केंद्र आले होते. अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून, माझ्या छोट्या छोट्या कामांमध्ये मला खूपशी मदत करत होता, तो मित्र ‘महेंद्र‘ ह्यानेच मला दोन दिवस, केंद्रावर जाताना सोबत दिली होती. उपकारात उपकार असतात ते असे !
माझ्या तयारी प्रमाणेच माझे पेपर छान गेले होते. परीक्षेनंतर, सुरेखासोबत सिनेमाची तिकीटे महेंद्रनेच, आणून दिली होती. मोबाईल किंवा फोनची सोय नसल्या कारणाने आजतागायत माझी व सुरेखाची गाठभेट होऊ शकली नाही.
फेसबुकद्वारे मी, तिचा ठाव घेण्याचा खूप प्रयत्न केला.पण आजही तो दिवस आलेला नाही.
पास झाल्याचा निकाल मिळाला. एफ.वाय.जे.सी साठी मी एस.आय.डब्ल्यू. एस. महाविद्यालयात प्रवेश घेतला. सोबतच, वडाळा स्टेशन वरील शालिमार इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंगचा क्लास लावून घेतला होता.
दरम्यान भावाने भांडुपला खोली खरेदी केली होती. आई-बाबाही राहण्यास मुंबईला आले होते. मोठ्या बहिणीच्या सासरी घराच्या वाटणीतून, जो हिस्सा तिला मिळाला, त्यात तिने वडाळा मिठागर मधे, एक झोपडी खरेदी केली होती. त्यामुळे दोन्ही बहिणी जवळजवळच राहत होत्या. टायपिंग क्लास अर्ध्यावर सोडणे शक्य नव्हते, त्यामुळे मी बेबीकडे (बहिण) रहायला आले होते. थोडक्यात सर्वकाही स्थिरावण्याची चिन्हे दिसू लागली होती.
माझ्या सोबत घडलेल्या प्रसंगांने, मी ठरविले की, स्वतःचा खर्च निघेल, ह्यासाठी काही तरी हातपाय मारावेत असे विचार माझ्या डोक्यात घोळू लागले होते. शेवटी मी बहिणीच्या घरी, मराठी व इंग्रजी माध्यमाचे (छोट्या मुलांचे) क्लास सुरू केले होते. क्लासमुळे, मी परिचित होऊ लागले होते. बहिणीलाही आर्थिक मदत करता येत होती. माझीही फी भागत होती. हे माझे स्वावलंबीपणाचे पहिले पाऊल होते.
– लेखन : वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.

👍खूपच छान लेखन. अगदी डोळ्यासमोर घटना घडत आहेत असे वाटते. याला जिवंत लेखन म्हटले तरी वावगे ठरवू नये.
पुढच्या भागाची वाट पाहतोय
🙏धन्यवाद