Friday, December 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३२

दुर्मीळ पुस्तके : ३२

श्वेतरात्री : भाग – १

रादुगा प्रकाशन, माॅस्को या तत्कालीन प्रकाशनाने सोवियत संघात मुद्रित व १९८७ मध्ये प्रकाशित हे पुस्तक अनिल हवालदार यांनी मराठीत अनुवादित केलेले आहे.
या पुस्तकात दरिद्री माणसे (Poor People) (कादंबरी), श्वेतरात्री (White Night) (एक भावनाप्रधान प्रेमकहाणी (एका स्वप्नाळू माणसाच्या आठवणी) , एक ओंगळ घटना (A Most Unfortunate Incident) (लघुकथा), बापुडी (लघु कादंबरीका, काल्पनिक कथा) (The Meek One), एका विचित्र वल्लीचे स्वप्न (The Dream of A Ridiculous Man (काल्पनिक कथा) आहेत.

“दरिद्री माणसे” ही १४२ पृष्ठांची कादंबरी. वार्वारा अलेक्सेयेवना ही १५ वर्षांची तर तिच्यावर पोटच्या मुलीसारखे प्रेम करणारे वयस्क पांढर्‍या केसांचे मकार देवूष्कीन. कादंबरीच्या सुरुवातीला रशियन लेखक व्लादीमिर ओदोयेवस्की यांच्या ‘जिवंत प्रेत’ मधील उतारा घेतला आहे. काही विधायक, प्रसन्न, मनोरंजक लिहिण्याऐवजी जगातली सगळी घाण पायांखाली तुडवत बसणार्‍या कथाकथनकारांनी वैताग आणलाय अशा आशयाचा हा उतारा आहे.

वार्वारा अलेक्सेयेवना (वारेन्का) व मकार देवूष्कीन यांच्या परस्परातील पत्रव्यवहारातून ही कादंबरी पुढे सरकत राहते. त्यातून त्यांच्यातील प्रेम, लळा, त्यांची हलाखीची, दारिद्र्याची परिस्थिती इ. पैलू उलगडत जातात. ही कादंबरी हळूहळू मनाची पकड घेत जाते.

मकार देवूष्कीन नक्कल प्रती करुन आपला गुजारा करीत थेरेसा व फाल्दोनी सोबत असतो. त्यांच्या नजरेतून वात्रट मुलगी वारेन्का समोरच फेदोरासोबत रहात असते. त्यांची घरमालकीण निष्ठूर असते. पाठ मोडेपर्यंत ती थेरेसाला राबवत असते.

अल्प पगार असला तरी मकार त्यातून वार्वारासाठी महागड्या भेटवस्तू घेऊन देतो. त्यांच्या पत्रात तिला कवितांची उणीव भासते. ते तिच्या एकाकी पोरकेपणात तिच्यावर पितृवत प्रेम करीत होते. दुष्ट माणसांपासून तिचे रक्षण करतात. त्यांच्या दुष्टपणापासून आणि छळापासून वाचवतात.

पूर्वी मकार, त्यांची पूर्वीची घरमालकीण जी पलंगपोष विणायची व तिची नात माशा जवळजवळ २० वर्षे एकत्र रहात होते.वार्वारा त्यांना घरी बोलावते पण लोकांचा विचार करता ते चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी भेटणे पसंत करतात. वार्वाराला अजिबात बरे वाटत नसते. क्षणात ती तापाने फणफणते तर क्षणात तिला थंडीने हुडहुडी भरते. साशा ही तिची मावसबहीण. ती भेटते. आन्ना फ्योदरोवना वार्वराला पूर्वीचे सगळे विसरुन जाऊ म्हणते.

तिची कहानी ती मकारांना पत्रात कळवते. वार्वरा तिची जुनी वही मकारांना पाठवते ज्यात तिचे पूर्वजीवन, आई, पक्रोवस्की, आन्ना फ्योदरोवनाबरोबरचे तिचे आयुष्य आणि अलिकडच्या काळातील दुर्भाग्य याविषयी लिहिलेले होते. तिला भयंकर उदास वाटत राहते. निद्रानाशाचा विकार छळत राहतो.

जुन्या वहीत तिने लिहिलेले असते की तिचे वडील वारले तेव्हा ती १४ वर्षांची होती. तिचे वडील प्रिन्स प. ह्यांच्या त. प्रांतामधील प्रचंड इस्टेटीचे कारभारी होते. ते खेड्यात रहात होते. तिला १२ वे वर्ष चालू असताना ते पीटरबुर्गला आले. म्हातारे प्रिन्स प. वारले आणि त्यांच्या वारसांनी वडीलांना नोकरीवरुन काढून टाकले.

तीन महिन्यांनंतर तिची वसतीगृहाच्या शाळेत पाठवणी करण्यात आली. चिंता, दु:ख, अपयश यांनी वडीलांना छळले. ते संशयी आणि तापट बनले. एकदा त्यांना थंडी बाधली आणि थोड्या आजारात ते वारले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सावकारांचा ससेमिरा मागे लागला. ते निवार्‍याला वंचित झाले. कंगाल बनले. आईला भयानक आजार जडला.

आन्ना फ्योदरोवना त्यांच्याकडे आली व तिच्या निवार्‍याला जाण्याचे निमंत्रण दिले. ते आईने शेवटी स्वीकारले. ते वासील्येवस्की बेटावर आले. तिथेच एक गरीब विद्यार्थी पक्रोवस्की आन्ना फ्योदरोवनाचा भाडेकरु होता. ती दुष्ट बाई होती. ती छळायची. दरिद्री नातेवाईक म्हणून उल्लेख करायची. तिच्या बाबांचा उध्दार करायची. आई रडायची. ती शिवणकाम करायची. त्याच्याकडे खूप दुर्मीळ व महागडी पुस्तके होती. तो वार्वराचा मित्र बनला.

पक्रोवस्कीचा बाप मुलाला भेटायला यायचा. मुलाची पुस्तके हाताळायचा. एक दिवशी पक्रोवस्की घरात नसताना वार्वरा त्याच्या खोलीत जाते. तिला जाणवते की तो विद्वान आहे आणि ती मूर्ख. मैत्रीला लायक ठरण्यासाठी ती तेथे सर्व पुस्तके वाचण्याचा निर्णय घेते. जो खंड घेऊन घरी येते तो कसरीने खाल्लेला प्राचीन लॅटिन निबंध संग्रह असतो. तिची निराशा होते. ती ते पुस्तक परत ठेवायला जाते पण तिथला खिळा निखळून फडताळ कोसळते व पुस्तके विखुरतात. त्याचवेळी पक्रोवस्की येतो. तो संतापतो. ती काही आता लहान नाही याची खात्री पटण्यासाठी तिच्याकडे पाहतो आणि लाजतो. तिही लाजून खोलीबाहेर पळते. तिची पक्रोवस्कीशी मैत्री होते.

तो तिला पुस्तके आणून देतो. एकदा त्याचा म्हातारा बाप येतो. एक आठवड्यानंतर पेतेन्काचा म्हणजे पक्रोवस्कीचा वाढदिवस असतो. ती भेटवस्तू म्हणून पूष्कीनच्या संपूर्ण साहित्याचे खंड देण्याचे ठरवते. ११ खंडांची किंमत जवळ जवळ ६० रुबल होती. जुन्या पुस्तकांच्या दुकानात ती त्याकरिता घासाघीस करुन चांदीच्या १० रुबलवर म्हणजे ३५ रुबलवर किंमत आणते. पण तिच्याकडे ३० च रुबल असतात. दुकानदार आणखी अडीच रुबल कमी करतो. तरीही तिच्याकडे अडीच रुबल कमी पडतात. पक्रोवस्कीच्या बापालाही मुलाला भेटवस्तू द्यायची असते. पण त्याच्याकडे फक्त अडीच रुबल असतात. ते घेऊन वार्वरा सर्व खंड घेऊन येते व पक्रोवस्कीला सांगते की तुमच्या वतीने मुलाला भेटवस्तू द्या. तो आनंदी दिवस होता. नंतर मात्र पक्रोवस्कीच्या आजारापासून आणि मरणापासून तिचे दुर्भाग्य सुरु झाले.

पक्रोवस्कीला शेवटच्या क्षणी खिडकीवरील पडदा बाजूला सारुन दिवसाचा उजेड पाहण्याची इच्छा होती. पण त्या दिवशी सूर्यप्रकाश नव्हता. त्याच्या दफनाची व्यवस्था आन्ना फ्योदरोवनाने केली होती. त्या खर्चाच्या भरपाईखातर तिने मयताची सर्व पुस्तके व इतर वस्तू ताब्यात घेतल्या. म्हातारा तिच्याशी भांडला. परत घेता येईल तेवढी पुस्तके त्याने तिच्याकडून घेतली. ती त्याने खिशात कोंबली होती व तो तसाच शवपेटीमागे पळत होता.इथपर्यंत घटना त्या जुन्या वहीत असतात.

फेदोरा आजारी असते. मकार देवूष्कीन वार्वाराला आपली कहानी पत्रात लिहून कळवतो. ते नोकरीवर दाखल झाले तेव्हा १७ वर्षांचे होते आणि लवकरच त्यांच्या नोकरीला ३० वर्षे पूर्ण होतील. कचेरीत त्यांच्या बुटांबद्दल, गणवेषाबद्दल, केसांबद्दल लोक शेरे मारत. कचेरीतील उंदीर म्हणत. ते नकला लिहित. आन्ना फ्योदरोवना वार्वरावर कृतघ्नपणाचे आरोप करते आणि बीकोवच्या कृतीशी तिचा संबंध नसल्याचे सांगते व तिच्याकडे बोलावते. बीकोव हुंडा देऊ इच्छितात असे सांगते.

गोर्श्कोवचा ९ वर्षांचा मुलगा मेल्याचे मकार वार्वाराला पत्रात लिहून कळवतो. त्यांच्याकडील दारिद्रयाचे वर्णन करतात. राताझ्यायेव यांच्याकडे मकार साहित्यिक बैठकांना जात असतात. साहित्य ही चीज फार नामी आहे. माणसांचे काळीज भक्कम करते, त्याला शिकवते. साहित्य म्हणजे चित्र आणि आरसा, त्यातून आवेग व्यक्त होतात, सूक्ष्म टीका मिळते, सूचना मिळतात आणि जीवनाची नोंदही मिळते असे ते वारेन्का म्हणजे वार्वराला पत्रात लिहितात.

वार्वरा पत्रात लिहिते की तिला एका घरात गव्हर्नेस म्हणून नेमणूक करायला तयार आहे तेव्हा जावे की नाही. ती मकार यांच्याकडे सल्ला मागते. ती नोकरी नाकारते. तिने विणलेला गालीचा फेदोरा विकून ५० रुबल आणते.फेदोरा तिच्यासाठी पूष्कीनचे ‘बेल्कीनच्या कथा’ हे पुस्तक आणते. ते ती पाठवू का असे मकार यांना विचारते. तो तिला झुरणे थांबवायला सांगतो. आपला फ्राॅक – कोट विकीन पण तिला काही कमी पडू देणार नाही असे सांगतो. ती नोकरीसाठी त्याला सोडून परक्या माणसाकडे निघून गेली तर म्हातारपणी मी काय करु असा प्रश्न मकारला पडतो. ती त्याच्यासाठी बंडी शिवून देते. ते एका नाटकाला जाण्याचे ठरवतात. एकेकाळी आपण कसा मूर्खपणा केला होता. एका नटी ‘ग्लाशापायी कसे ठार वेडा झालो होतो ते मकार तिला लिहून कळवतो. खिशात अवघा १ रुबल उरलेला. पगाराला १० दिवस बाकी असताना त्याने नटीसाठी सर्व पैसे खर्चून अत्तर व साबण खरेदी केला होता. कर्जात अडकला होता. शेवटी तिचा नाद सोडला. तीस वर्षे तो कचेरीत काम करीत होता. ती आजारी असते तेव्हा तो आपला कोट विकतो. तिच्यासाठी पगारातून आगाऊ उचल घेऊन खर्चत होता. व्यसनाच्या खोल गर्तेत तो कोसळत होता. रस्त्यावर झिंगलेल्या अवस्थेत तो आढळायचा व पोलीस त्याला घरी घेऊन येतात हे वार्वाराला फेदोराकडून समजते. आपल्या संबंधांबद्दल लोकांना समजलेय व शेजारी टोमणे मारतात त्याकडे दुर्लक्ष करायला ती मकार यांना पत्रातून सांगते. तिने दिलेल्या १० रुबलमधून तो थकलेल्या भाड्यातील काही हिस्सा फेडतो. तो कर्जापायी व त्याच्या कपड्यांच्या दयनीय अवस्थेपायी खचून गेलेला असतो. घरमालकीणीला त्यांच्या पत्रांबाबत समजते. मग ती घरभर ओरडायला सुरुवात करते. फेदोराकडून त्याला समजते की कोणीतरी एक नालायक वार्वराच्या घरात अवतरला आहे आणि तिला लग्नाची मागणी घालून तिचा अपमान केला आहे. ते मकारला असह्य होते. तो संतापतो.

गरीब माणसे तर्‍हेवाईक असतात. ते सतत शोधक नजर ठेऊन असतात. जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी संशयी असते इ. मकार वार्वाराला पत्रात लिहितो. फाटक्या सदर्‍यातून कोपर बाहेर डोकावत असताना व बटणे एकाकी धाग्यांवर लोंबत असताना मकारला स्वतःची शरम वाटत होती. शरमेपायी त्याचे टक्कलसुध्दा लाल झाले. प्योत्र पेत्रोविचकडे तो ३० रुबल कर्जाऊ मागतो. पण तो त्याच्याकडे विसार विचारतो. मग तो वीबोर्गमध्ये राहणाऱ्या माणसाकडे कर्जासाठी जाण्याचे ठरवतो. तिकडे वार्वाराचीही अवस्था बिकट असते. त्यात एक अनोळखी म्हातारा घरी येऊन त्याच्या पुतण्याच्या मूर्खपणाबद्दल राग आल्याचे व तरुण माणसांकडे दुर्लक्ष करायला वार्वाराला सांगतो. फेदोराला बाजूला बोलावून पैसे द्यायचा प्रयत्न केला. फेदोराने ते घेतले नाही. आन्ना फ्योदरोवनानेच हा उद्योग केला होता. ती मकारकडे मदत मागते. पण पैसे कर्जाऊ नाही मिळाले तर? त्यांनी निराशेच्या आहारी जाऊ नये म्हणून वार्वारा त्यांना लिहिते व चांदीचे ३० कोपेक पाठवते. त्यातून आवश्यक गोष्टी घ्यायला सांगते. कर्जासाठी तो मार्कोवच्याही घरी जातो पण तोही प्रयत्न फसतो.संध्याकाळी कोणीतरी राताझ्यायेवकडे मकारने वार्वाराला लिहिलेल्या पत्राचा कच्चा तजुर्मा मोठ्यांदा वाचून दाखवला. ते त्याच्या खिशातून पडून गहाळ झालेले होते. त्यावर ते हसत होते. राताझ्यायेव त्याला मिस्टर लव्हलेस (स्त्रियांना फूस लावणारा) संबोधतो. मकारला जगायची शरम वाटायला लागते. त्याला वाळीत टाकलय असे वाटू लागते. तिकडे वार्वराच्या डाव्या हाताला इस्त्रीचा चटका बसतो. फेदोरा गेले तीन दिवस आजारी असते. ती मकारला चांदीचे ३० कोपेक पाठवते. तिला तिकडे जिन्यावरुन जाणे अशक्य बनते. सगळे टक लावून बघतात. दारुड्याशी तिने संगत बांधलीय असे तोंडावर म्हणतात. मकारपायी तिला उजळ माथ्याने वावरणे अशक्य होते. तिथून निघून जाणार म्हणते. एक दिवस मकारला घरमालकीण घरात येऊ दिले नाही तेव्हा त्यांनी मधल्या बोळकांडीत रात्र काढली होती . ते ऐकून वार्वाराला वाईट वाटते. ती त्याला २० कोपेकचे नाणे पाठवते. त्याची तंबाखू घ्या किंवा अन्य खर्च करा असे सांगते. निलाजरेपणे तिच्यासारख्या पोरक्या मुलीला लुटायचे? असे मकारला वाटते. त्याचे मन खचते.वार्वराची ओळख झाल्यानंतर सर्वप्रथम मकार स्वतःला अधिक चांगले ओळखू लागले आणि तिच्यावर प्रेम करु लागले. तोपर्यंत तो एकाकी होता.

वार्वाराला आपला बालपणीचा सोनेरी काळ आठवतो. शरदाचा मोसम विशेषतः अखेरीचे दिवस तिला खूप आवडायचे. ह्या आठवणींपायी ती अक्षरशः लहान मुलीसारखी ढसढसा रडते. यंदाच्या शरदात ती मरणार असे ती मकारला पत्रात लिहिते. ती खूप खूप आजारी असते. एक चांदीचा रुबल तिच्याकडे शिल्लक असतो. तिला अतिशय अशक्तपणा येतो.
मकार संध्याकाळी फोन्ताकावर फिरायला जातो. त्याला उदास वाटते. त्याच्या दारिद्र्याची त्याला दुपटीने जाणीव होते. गोरोखोवायाच्या रस्त्यावर त्याचे लक्ष एका मुलाकडे जाते. त्याच्याकडील कागद तो वाचतो. तीन मुलांसह आई उपासमारीने मरते आहे, तेव्हा आम्हाला मदत करा असे त्यात लिहिलेले असते. त्याला तो काही मदत करु शकला नव्हता. त्याच्या शेजारचा गोर्श्कोव. त्याचं आयुष्य मकारपेक्षा वाईट होते. तो मकारकडे उसने मागतो. निदान १० कोपेक द्या म्हणतो. मकारकडे अवघे २० कोपेक शिल्लक असतात. त्याचे काळीज पिळवटते. तो २० कोपेक त्याला देऊन टाकतो. गोर्श्कोव खटल्यात गुंतलेला असतो. त्याच्याबद्दल मकारला वाईट वाटते व मन:पूर्वक सहानुभूती वाटते. तो बेकार असतो. त्याचवेळी त्याला मूल होते. ते आजारी असते. बायकोही आजारी असते. मुलगा वारतो. मकार त्याचे सांत्वन करतो.

एकदा तीमोफेय इवानोविच मकारकडे एक तातडीचा कागद देतो व त्याची स्वच्छ व सुबक नक्कल करायला सांगतो. तो सहीसाठी जायचा असतो. पण मकार विषण्ण झालेला असतो. त्याला वार्वाराची सतत आठवण येत असते. तो नक्कल करतो पण नेमका घोटाळा होतो. एक संपूर्ण ओळ त्याने गाळली होती त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. त्याला महामहिम बोलवतात.ते चिडतात. येवस्ताफी इवानोविच सांगतात की मकारला कधीही ताकीद दिली नाही, कसल्याही चुकीबद्दल ताकीद मिळालेली नाही, आदर्श वर्तन, कामानुसार पगार.. त्याला काहीतरी मदत करा महामहिम त्याला आगाऊ रक्कम द्यायला सांगतात. परत लौकर नक्कल लिहून काढायला सांगतात व शंभर रुबलची नोट त्याच्या हातात कोंबतात व त्याचा हात हातात घेऊन हस्तांदोलन करतात. परत चुका करु नका म्हणून सांगतात. जे घडले त्याची निम्मी निम्मी जबाबदारी घेऊ असे म्हणतात. महामहिमांसाठी दररोज प्रार्थना करायला मकार वार्वाराला व फेदोराला विनवतो. हस्तांदोलन मकारला अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे महामहिमांनी परत माणसात आणले,त्याचा पुनर्जन्म घडवला असे त्याला वाटू लागते. तो वार्वरा व फेदोरा यांच्यासाठी ४५ रुबल पाठवतो. घरमालकीणीला २० रुबल देतो व स्वतःसाठी ३५ रुबल ठेवतो. त्यातून कपड्यांची डागडुजी, किरकोळ खर्च करतो.

मकारच्या भाग्याबद्दल वार्वाराला अतिशय आनंद होतो. त्याच्या साहेबांचे औदार्याचे मोल ती जाणते. ती मकारला दु:खापासून विश्रांती घ्यायला सांगते. चार पैसे बाजूला ठेवायला सांगते. ती २० रुबल ठेवून घेते व बाकीचे मकारला परत करते.
मकार महामहिमांनी दिलेल्या वर्तणूकीमुळे परत एकमेकांना सुखी पत्रे लिहू, आपले विचार, आपला आनंद आणि जर काही चिंता असेल ती कळवू असे वार्वाराला पत्रातून कळवतो. दैव बदलल्यासारखे त्याला वाटते. घरमालकीण नीट बोलू लागते. राताझ्यायेवशी समजोता होतो. लव्हलेस हा शब्द परक्या भाषेतून घेतल्याचा व त्याचा अर्थ धूर्त माणूस वा चलाख तरुण असल्याचे राताझ्यायेव मकारला सांगतो. मकार छान बुटाची जोडी खरेदी करतो.
महामहिम त्यांच्या दयाळुपणाबद्दल प्रसिद्ध होते. अनेकजण त्यांना दुवा पाठवतात व कृतज्ञतेपायी अनेकजण रडतात. त्यांनी अनाथ मुलीचा सांभाळ केलेला असतो व एका प्रतिष्ठित माणसाशी तिचे लग्न लावून दिलेले असते.
श्रीयुत बीकोव पीटरबुर्गमध्ये असतात. ते द्रोश्की (घोडागाडी) मधून जात असताना फेदोरा आणि त्यांची भेट होते. ते तिच्या घर कुठे आहे ते विचारतात.ते फेदोराला २५ रुबल देऊ करतात पण ती घेत नाही. ते खरेच परत येतील का याची वार्वाराला धास्ती वाटते.

इकडे मकारकडे एक दु:खद घटना घडते. गरीब बिचारा गोर्श्कोव खटल्यातून संपूर्ण निर्दोष सुटतो पण तो मरतो. राताझ्यायेव मकारसाठी एका लेखकाकडून काम मिळवून देतो. दर पानाला ४० कोपेक असा दर ठरतो.
दरम्यान वार्वाराकडे बीकोव आले होते. त्यांनी तिच्या करग्रहणाची इच्छा बोलून दाखवली. विवाहानंतर स्तेपमधील खेड्यात तिला नेण्याची इच्छा बोलून दाखवली. तेथे सशाची शिकार करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यांना स्वतःचा कायदेशीर वारस हवा होता. त्यांनी घातलेल्या विवाहाच्या मागणीमुळे तिला रडू कोसळते. मकार यांना उपकारांची परतफेड म्हणून ५०० रुबल पुरेसे आहे का असे ते विचारतात. पण केवळ पैशाने मकार यांचे उपकार फिटण्यासारखे नव्हे असे वार्वारा म्हणते.
बीकोवला पुस्तके आवडत नसतात.वार्वारा बीकोवशी विवाह करण्याचे ठरवते. मकारला चिंता असते की आता ते एकमेकांना पत्र कसे लिहिणार? एकटा कसा जगणार? बीकोव यांचा स्वभाव तापट असतो.
इकडे मकार आजारी पडतो. तो अंथरुणातून उठू शकत नाही. धावपळीचा महत्त्वाचा काळ आला आणि त्याला थंडीतापाची बाधा झाली. त्यात त्याच्या महामहिमांनी कडक वागायचे ठरवले होते.

वार्वाराचा विवाह होतो. ती मकार यांचा पत्रातून अखेरचा निरोप घेते. त्याच्याबद्दलच्या आठवणी तिच्या काळजात अमोल ठेवा बनून राहतील असे ती पत्रात लिहिते. मकार हा तिचा एकमेव मित्र होता. बेल्कीनच्या कथा हे पुस्तक, कशीदाकामाची चौकट आणि कधीकाळी सुरु केलेले अर्धवट पत्र ती मकारसाठी ठेवून जाते. गरीब बिचार्‍या वारेन्काची आठवण ठेवा सांगते.श्रीयुत बीकोव तिला सोडत नाही. ती पुढे लिहित राहील असे सांगून मकार यांचा कायमचा निरोप घेते. मकारला तिचे पत्र मिळते. त्यावर सगळीकडे अश्रुंचे डाग होते. अशी ही वार्वारावर पितृवत प्रेम करणार्‍या मकार देवूष्कीन या वयस्क म्हातार्‍याची, दोघांची कहानी.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९