युवा संशोधक “श्वेता धनश्री श्रीनिवास बर्वे” हिला मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःच्या संशोधनातून सुपारीच्या विऱ्यापासून चप्पल बनवून उत्पादनाचे पेटंट मिळवण्यात यश मिळवल्या बद्दल “ सानेगुरुजी युवा वैज्ञानिक पुरस्कार “ नुकताच विले पार्ले येथे युवादिनानिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक आणि वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्वेताचा जन्म २३ डिसेम्बर २००० रोजी कोकणातील सावंतवाडी येथे झाला. प्राथमिक शिक्षण तळकट येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण बांदा येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल मध्ये, उच्च माध्यमिक शिक्षण गोव्यातील पेडणे हायर सेकंडरी स्कूल मध्ये झाले. पुढे वाणिज्य शाखेत सावंतवाडी येथील सर पंचम खेमराज महाविद्यालयातून श्वेताने पदवी संपादन केली.
श्वेताच्या आई वडिलांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपारी, नारळ आणि आंबा बागायत हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील सुपारी झाडापासून मिळणाऱ्या विऱ्या केवळ टाकाऊ किंवा जळणासाठी वापरल्या जातात. २०१९ च्या लॉकडाउन काळात सहज प्रयोग करत असतांना सुरवातीपासून आर्ट आणि कलाकुसर करण्याची आवड असलेल्या श्वेताने स्वतःसाठी सुपारीच्या विऱ्यापासून चप्पल बनवली. त्यामुळे आपल्या बागेत फुकट जाणाऱ्या सुपारीच्या झाडावरील विऱ्यापासून उत्तम पर्यावरण पूरक चप्पल तयार करण्याची कल्पना तिला सुचली. त्या दृष्टीने श्वेताने प्रयत्नपूर्वक अनेक प्रयोग करून टिकाऊ चप्पल बनवली.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सहकारी शास्त्री सरांनी श्वेताच्या संशोधनाला पाठबळ दिले आणि या चपलांच्या उत्पादनाचे पेटंट मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.
आता लवकरच कोकणात दोडामार्ग येथे श्वेता या पर्यावरण पूरक चपलांचा उद्योग उभारणार आहे. त्यामुळे कोकणात सुपारीच्या बागांमधून फुकट जाणाऱ्या विरीलाही आता महत्व प्राप्त होणार असून त्यातून रोजगार निर्माण होणार आहे. श्वेताला लघू उद्योगिका बनण्याच्या मार्गावर सुयश लाभो यासाठी न्यूज स्टोरी टूडे तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800