नाती खरी ही रक्ताची
हेच मना खटकतं
कळे अनुभवाअंती
कुणी कुणाचं नसतं
प्रेम आपुलकी सारं
बालपणी हो असतं
जसजसे होती मोठे
कुणी कुणाचं नसतं
माय बाप हे कोणाचे
चालू नेहमी असतं
विसरती त्यांचे कष्ट
कुणी कुणाचं नसतं
धंदा नोकरी नि लग्न
पैशापायी हो अडतं
तेव्हा पैसा होई मोठा
कुणी कुणाचं नसतं
तंटे नि भाऊबंदकी
घरोघरी हे दिसतं
तडा जाई तो नात्याला
कुणी कुणाचं नसतं
माझे माझे म्हटल्याने
कुणी का आपलं होतं
तगमग ही मनाची
कुणी कुणाचं नसतं
कुणा म्हणावे आपले
कळेनासे जेव्हा होतं
तेव्हा काळच औषध
कुणी कुणाचं नसतं
— रचना : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800