“मिट्ट काळोख…..लख्ख उजेड“
एका व्यसन मुक्ताची प्रेरक कहाणी
१९८६ पासून लेखन करणाऱ्या सुमेध वडावाला यांची ३८ वर्षांत जवळ जवळ ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यासह विविध संस्थांची जवळ जवळ वीस पुरस्कारांनी त्यांच्या लेखनाच्या उच्च गुणवत्तेची साक्ष दिली आहे़.कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेखन इत्यादी अनेक साहित्य प्रकारांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या “आत्मकथा” अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.
सुमेध वडावाला यांनी लिहिलेले आणि रोहन प्रकाशन ने प्रकाशित केलेले “मिट्ट काळोख….. लख्ख उजेड” हे खरं म्हणजे ७ मार्च १९६४ रोजी जन्मलेले दत्ता पांडूरंग श्रीखंडे यांचे ‘आत्मकथन’ आहे़.
पूर्वी अंबरनाथ येथे राहणाऱ्या श्रीखंडे यांना व्यसनी, गुन्हेगार यांची संगत लागली व ते छोटे मोठे गुन्हे करू लागले. त्यामुळे त्यांना अनेक वेळा जेलची हवा खावी लागली व त्यांच्या जीवनात मिट्ट काळोख पसरला.
सुदैवाने श्रीखंडे यांना पुणे स्थित “मुक्तांगण” या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथील संस्था चालकांनी त्यांच्यावर मायेची, संस्कारांची पाखर घातली आणि त्यांच्या जीवनात ‘लख्ख उजेड’ पडला. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते याचा अनुभव दत्ता श्रीखंडे यांना आला.
२० नोव्हेंबर १९९४ रोजी दत्ता श्रीखंडे यांचे लग्न झाले. त्यांना दोन मुलगे झाले. पतीपत्नी आपल्या कुटुंबासाठी कष्ट करू लागले. त्यांचा संसार बहरला. पाचवीत शिक्षण सोडलेल्या दत्ता श्रीखंडे यांनी मुलांच्या व पत्नीच्या आग्रहाखातर पुन्हा शिक्षण सुरू केले व ते एम.ए.झाले.
उत्पन्नाचे साधन म्हणून दत्ता श्रीखंडे स्वयंपाकी झाले व त्या क्षेत्रात सुध्दा तरबेज झाले. निरोगी राहण्यासाठी जीममध्ये जाऊ लागले तेथेही बॉडीबिल्डर म्हणून नावाजले गेले.
नशेच्या विळख्यातून मुक्तांगणमुळे स्वच्छंदी जगण्याकडे वाटचाल करणाऱ्या दत्ता श्रीखंडे यांनी मुक्तांगण संस्थेच्या माध्यमांतून इतरांना आपल्या अनुभवातून व्यसनमुक्ती करण्यासाठी व्याख्यान देण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्याची पत्रकारांनी तर दखल घेतलीच परंतु २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मनकी बात” ह्या कार्यक्रमांत दत्ता श्रीखंडे यांच्या नावासह कार्याचा उल्लेख केला. त्यामुळे दत्ता श्रीखंडे यांचे नांव सर्वत्र पसरले.
या २६० पानी पुस्तकात श्री दत्ता श्रीखंडे यांनी जन्मल्या पासून अद्याप पर्यंत जे घडले ते जसेच्या तसे सुमेध वडावाला यांना सांगितले व त्यांनी त्याचे शब्दांकन केले. हे पुस्तक वाचताना श्री दत्ता श्रीखंडे आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असे वाटते. त्याचे सर्व श्रेय सुमेध वडावाला यांना जाते. तर आत्मचरित्रात काहीजण चांगले त्याचाच उल्लेख करतात व पुष्कळगोष्टी लपवतात. श्रीखंडे यांनी सर्व गोष्टी जशाच्या तशा सांगितल्या आहेत व वडावाला यांनी सुध्दा आपल्या ओघवत्या भाषेत त्याचे शब्दांकन करून पुस्तक रूपाने “शब्दशिल्प” तयार केले आहे़.
वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.ज्यांच्या कुटुंबात व्यसनी व्यक्ती असेल त्यांनी तर हे पुस्तक वाचून दत्ता श्रीखंडे यांच्याशी संपर्क करावा.जसे परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसेच कोणतीही व्यसनी व्यक्ती दत्ता श्रीखंडे यांच्या सानिध्यात आली तर ती नक्कीच व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.
ह्या पुस्तकात दत्ता श्रीखंडे यांचे रंगीत फोटो आहेत त्यामुळे ते “मिट्ट काळोखातून मुक्तांगण” मुळे लख्ख प्रकाशात कसे आले ते समजेल.
ह्या पुस्तकाच्या वाचनामुळे व दत्ता श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना व्यसनमुक्तीचा आनंद मिळू शकेल. नुकतेच साठाव्या वर्षात पदार्पण केलेल्या दत्ता श्रीखंडे या ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकाला खुप खुप शुभेच्छा. त्यांचे कार्य अखंड सुरू रहावे व संपूर्ण भारत व्यसनमुक्त करण्यासाठी दत्ता श्रीखंडे यांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
दत्ता सर,
फक्त नाव घेतलं तरी व्यसनमुक्ती होते.💐💐💐💐💐💐
अतिशय प्रेरणादायी कहाणी…
मनापासून धन्यवाद 🙏
जीवनाच्या अंधार कडून उजेडाकडे प्रकाशमय सत्य जीवन कहाणी
सेंट
संपादक साहेबांनी सुंदर सदर सदर सुरू केले अभिनंदन भुजबळ सरजी
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.