एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीला जेंव्हा ब्रिटीशांच्या अमलाखाली भारत होता, लॉर्ड डलहौसी हे दूरदृष्टी असलेले गव्हर्नर जनरल होते, त्यांनी १८४३ मध्ये भारतात रेल्वेचे जाळे निर्माण करण्याची शक्यता वर्तवली, आणि त्या दिशेने रेल्वेचे रूळ बांधायलाही सुरुवात केली.
पहिल्या रेल्वे लाईनसाठी बॉम्बे ते कल्याण हा मार्ग नक्की झाला. त्या काळात रेल्वे लाईन रूळ बांधणे सोपे काम नव्हते. अतिशय जिकीरीचे होते. या भागात पडणारा धो धो पाऊस, वादळी वारे, तीव्र उन्हाळा, कामगारांची उपलब्धता, त्यांची मानसिक तयारी अशा अनेक अडचणी पार करून शेवटी १६ एप्रिल १८५३ हा दिवस उजाडला ज्या दिवशी बॉम्बे ते ठाणे या २१ मैल (३४ किलोमीटर) अंतराच्या मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावायला सज्ज झाली.
या पहिल्या गाडीला वाफेवर चालणारी तीन लोकोमोटिव्ह आणि १४ डबे जोडले होते. या तीन लोकोमोटिव्हची साहिब, सुलतान आणि सिंध अशी नांवे होती. बॉम्बेच्या बोरीबंदर स्थानकातून ही आगगाडी दुपारी साडेतीन वाजतां अतिशय समारंभपूर्वक निघाली आणि अगदी जल्लोषात ठाण्याला पावणेपाच वाजतां पोचली. हे २१ मैलाचे अंतर केवळ एक तास पंधरा मिनिटात या आगगाडीने कापले. अशी होती भारतीय रेल्वेची धुमधडाक्यात झालेली सुरुवात.
यानंतरच्या अर्धशतकात रेल्वेच्या वाढीत लक्षणीय प्रगती झाली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारताच्या अखंडत्वाचा बहुमान भारतीय रेल्वेला द्यायला हवा. भारत एकसंघ होण्यात रेल्वेचा मोलाचा वाटा आहे. या रेल्वेने प्रांत, धर्म, जाती, भाषा या सर्वांवर मात केली आणि माणसामाणसातला आपपर भाव नष्ट झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील संस्थानिकांच्या स्वतःच्या रेल्वे गाड्या होत्या. जसे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, हैदराबादचे संस्थानिक, निजाम, राजस्थानचे जयपूर संस्थान इ. हळूहळू रेल्वे जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागली. रेल्वेच्या विस्तारासाठी आणि वाहतुकीसाठी रेल्वे स्थानके, फलाट यांची आवश्यकता होती.
भारतीय रेल्वेचं सर्वात मोठं स्थानक हे पश्चिम बंगालमधील “हावडा” स्थानक येथे २० पेक्षा अधिक फलाट आहेत. दोन नंबरचे स्थानक आहे “सियालदा”, हे स्थापत्यशास्त्रा साठी प्रसिद्ध आहे. अत्यंत आकर्षक असं नवाबाच्या महालासारखं “लखनौ” स्थानक. ७० फुट उंचीचं मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांचं आकर्षक मध्यवर्ती “मुंबई सेन्ट्रल” स्थानक. आता या स्थानकांचं नांव बदलून “नाना शंकरशेठ” यांच्या स्मरणार्थ नांव देण्यात येणार आहे असे ऐकिवात आहे.
पूर्वीचं बोरीबंदर, नंतर व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आतां छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक एक अप्रतिम शिल्प आहे. १८८८ साली हे स्थानक पूर्णपणे कार्यरत झालं. फ्रेडरिक स्टीव्हन हे या भव्य वास्तूचे शिल्पकार होते. इटालियन गोथिक पद्धत आणि मोगल शिल्पकला यांचा सुरेख मिलाफ असून आज हे “जागतिक वारसा” म्हणून घोषित झाले आहे.
भारतीय रेल्वेची अतिलहान, लहान, मोठी तशीच भव्य स्थानकं मिळून जवळपास ८५०० इतकी रेल्वे स्थानकं आहेत. मागील २० ते २५ वर्षांपासून ही रेल्वे स्थानकं चित्रकारीने सुशोभित करण्यात येत आहेत.
मुंबईच्या लोकल रेल्वे गाड्यांची बात तर औरच आहे ! कोट्यावधी लोक दररोज या लोकल गाड्यांमधून जीवावर उदार होऊन प्रवास करतात. कितीही गर्दी असली तरी आनंदाने प्रवास करतात.
तसेच मुंबईच्या डबेवाल्यांची वेगळी खासियत आहे. रोज हजारो कर्मचाऱ्यांना घरच्या जेवणाचे डबे अचूक ज्याचे त्याला आणि अगदी वेळेवर पोचवण्याचं अनोखं काम ते करतात, त्यांना “व्यवस्थापकीय गुरु” म्हणून जगात प्रसिद्धी मिळाली आहे. ही डबेवाल्यांची आगळी वेगळी सेवा अन्यत्र कुठेही सापडत नाही.
रेल्वे मंत्रालय सर्वात मोठे (कर्मचाऱ्यांच्या संख्येने) मंत्रालय, २०१७ पर्यंत देशाच्या अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जात असे. व्यवस्थापनाच्या असंख्य आणि विविध पातळीवरील जबाबदाऱ्या लाखो कर्मचारी अव्याहतपणे पार पाडतात.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात २००० नंतर झालेली अभूतपूर्व क्रांती म्हणजे लोकल गाड्या, इंजिन, जलद गाड्या, एक्सप्रेस गाड्या चालवण्यासाठी महिला चालकांची झालेली नेमणूक ! हे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे द्योतक आहे. याची १९९५ च्या “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झाली आहे.
भारतीय रेल्वे पर्यटनात मोलाची कामगिरी बजावत आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अती श्रीमंत अशी आलिशान “Palace on Wheels” अर्थात “महाराजा एक्सप्रेस” २०१२ साली ही गाडी “world Travel Award” ने सन्मानित झाली आहे. तसेच “जीवन वाहिनी एक्सप्रेस” ही गाडी भारताच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्याचं मोलाचं काम १९९१ पासून करते. ही गाडी म्हणजे एक चालताफिरता दवाखाना किंवा रुग्णालय आहे. अशी गाडी सुरु करण्याचा पहिला मान भारतीय रेल्वेकडे जातो.
अवघ्या कोकणवासीयांचं स्वप्न असलेला, संपूर्ण भारतीय बनावटीचा आणि बांधण्यास अत्यंत कठीण असा रेल्वे प्रकल्प म्हणजे “कोकण रेल्वे” . तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखाली प्रा. मधु दंडवते रेल्वेमंत्री होते तेंव्हा साकारलेला रेल्वे प्रकल्प. भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील मनाचा तुरा ! “कोकण रेल्वे” हा त्यांच्या कार्यकाळातील अतिशय महत्वाचा निर्णय ठरला. प्रा. मधु दंडवते यांनी सादर केलेल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पातच कोंकण रेल्वे साठी तरतूद करून ठेवली. आपटा ते रोहा या मार्गाच्या कामास वाट मोकळी करून दिली.
भारतात ७ मे १९७४ ते २७ मे १९७४ असा २० दिवसांचा देशव्यापी संप झाला, ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यावेळी ज्या ५० हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं त्या सर्वाना १९७७ मध्ये प्रा. मधु दंडवतें यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतलं ! या निर्णयाचा परिणाम रेल्वे खात्यातील कामावर झाला. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा निर्णय होता. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. विक्रमी असा १२५ कोटींचा निव्वळ नफा त्यांच्या कार्यकालात रेल्वे खात्याने कमावला ! कर्मचाऱ्यांमध्ये दंडवतेंबद्दलचा आदर वाढला. सरप्लस प्रॉफिट कमावणारे पहिले रेल्वेमंत्री म्हणून प्रा. दंडवते यांचं नांव भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
भारतीय रेल्वेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय रेल्वेचा “भोलू” नावाचा हत्ती प्रसिद्ध झाला. “ नेशनल इंस्टीट्युट ऑफ डिझायन “ ने हे हास्यचित्र प्रकाशित केले. ते फारच लोकप्रिय झाले.
चित्रपट सृष्टीतही भारतीय रेल्वेला खूप महत्वाचं स्थान आहे. अनेक चित्रपट गीते रेल्वेच्या प्रवासातील आणि रेल्वे गाडीच्या ठेक्यावर लोकप्रिय झाली आहेत.
रेल्वेचा प्रवास न आवडणारा भारतीय विरळाच ! आबालवृद्धांची आवडती अशी ही भारतीय रेल्वे आज १७ एप्रिल २०२४ रोजी १७० वर्ष पूर्ण करून १७१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतीय रेल्वे भारतीयांचा अभिमान आहे !
— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
भारतीय रेल्वे……
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे.