“राजकारण गेलं मिशीत“
आपल्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण आणि वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस वातावरण तापतच चालले आहे. याला महाराष्ट्र ही अपवाद नाही. पण अशा या तापदायक वातावरणात हवेची गार झुळूक यावी तशी एक झुळूक आली आहे, ती म्हणजे “राजकारण गेलं मिशित” या चित्रपटामुळे.
मकरंद अनासपुरे हे मराठीतील लोकप्रिय विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. पण “राजकारण गेलं मिशित” हा चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे “राजकारण गेलं मिशीत” हा चित्रपट विनोदी असून तो नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील बहुतांश कलाकार मराठवाड्यातील आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार, आपल्या न्युज स्टोरी टुडे परिवारातील उद्धव भयवाळ यांच्या ‘लावण्य बहार’ या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.
या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.
या चित्रपटासह लावणीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपण ही हा चित्रपट, चित्रपट गृहात जाऊन पाहण्यास चुकवू नये, असाच आहे.
भयवाळ सरांच्या लावणीचा आनंद आपण पुढील लिंक वर घेऊ शकता.
https://www.facebook.com/share/v/UTzj1GdLuqkSKCYt/?mibextid=oFDknk
भयवाळ सरांचे आणि “राजकारण गेलं मिशीत” च्या सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800