Wednesday, January 15, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ४९

मी वाचलेलं पुस्तक : ४९

“रफ स्केचेस” ‌

शालेय जीवनात चित्रकला हा माझा सर्वात आवडता विषय होता. अशाच एखाद्या पुस्तकाचा शोध घेतांना मला सुप्रसिद्ध कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार श्री सुभाष अवचट यांचं “रफ स्केचेस” हे अत्यंत सुबक बांधणीचे अतिशय सुंदर पुस्तक हाती आले.

सुभाष अवचट हे मला केवळ चित्रकार नव्हे तर शब्द साहित्याचे किमयागार वाटले. त्यांनी मुखपृष्ठ सजवलेल्या अनेक साहित्यिक, लेखक, कवींच्या पुस्तकांचे मी अवलोकन केले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच हे रफ स्केचेस समग्रपणे वाचून काढले.

सुभाष अवचट यांच्या चित्रकारांपेक्षा लेखनशैलीची निश्चितच दाद द्यावीशी वाटली. कारण त्यांत मुखपृष्ठ सोडल्यास एकही रफ स्केच नसतांनाही अनेक थोर साहित्यिकांच्या रसाळ, मधूर आठवणी पानापानातून विखुरलेल्या आहेत.

रंग ही जशी सुभाषजींच्या अभिव्यक्तीची आपसूकच भाषा आहे तीच त्यांनी शब्दसृष्टीचे किमयागार म्हणून संपादन केलेली दिसते. अर्थात त्यांच्या घडणीचा काळ अनेक लेखक, कवींसोबत वावरल्यामुळे ते शक्य झालेले दिसून येते.त्यांचे काही लेख रविवार लोकसत्तामध्ये मी यापूर्वी वाचलेले आहेत. चित्र-शब्द सृष्टीचे किमयागार म्हणून मी जो सुरूवातीला उल्लेख केला आहे त्याची हूबेहुब साक्ष “रफ स्केचेस” वाचून निश्चितच लक्षात येते.

आपल्या बालपणातील रम्य जीवन जगलेल्या खेड्यातून पुण्यात आल्यावर सुभाष अवचटांचा गोतावळा शनिवार पेठेतील साधना प्रेस मध्ये वाढला.तिथे अद्भुत लोक त्यांना भेटले. नाथ पै, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान मास्तर अशी भली मोठी यादी तयार होईल. ही माणसं अन्यायाविरुद्ध लढत होती. वैयक्तिक आयुष्यात ते सुभाष यांचे शिक्षक झाले. लेखक त्यांच्यापासून खूप शिकले. त्याचबरोबर पुण्यातील तालमीमुळे त्यांचा कुस्तीचा छंद जोपासला गेला. त्यांच्या गोतावळ्यात पैलवानांपासून टांगेवाल्यापर्यंत आणि कवी गायक तब्बलजी, भटजीपासून मल्लखांबावरच्या सवंगड्यांपर्यंत सारे जमा झाले. थोर थोर लेखक, प्रकाशक, प्रिंटर्सही सामील झाले. शाळेतल्या विद्वान शिक्षकांनी अनेक प्रोफेसरांनी त्यांच्यात ज्ञानाची भर घातली हे त्यांना आठवलं की एक जाणवतं, त्यावेळी पुण्यात वैचारिक ट्रॅफिक जाम नव्हता. त्याकाळी जो तो आपापले काम हिरिरीने, आनंदाने करण्यात मग्न होता. साऱ्यांचे डोळे उघडे होते. आचार्य अत्रे, ना. सी. फडके, दत्तो वामन पोद्दार, यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे यांच्या व्याख्यानांनी पुण्यातले रस्ते आणि त्यांची मने मोहरून गेलेली असायची. एकंदरीत मधुबालाच्या अद्भुत स्मिता सारखा तो काळ होता. तुकाराम, महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, र.धो.कर्वे, वारकरी अशा आप्त मंडळींचा त्यांचा परिवार होता” असंही त्यांनी पुस्तकात म्हटलंय आहे.

आपल्याकडे माणसांवर लिहिलेलं वाचायला सर्वांनाच आवडते. सुभाषजींनी तर तात्या माडगूळकरांपासून पुलं पर्यंत, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते शांताबाई शेळकेंपर्यंत, कवी नारायण सुर्वे, कुसुमाग्रज पासून तर आरती प्रभू पर्यंत, शशी कपूर, विनोद खन्ना पासून तर ओशो रजनीशापर्यंत अनेक मान्यवर लेखक, कवी, प्रकाशक, चित्रकार आणि मित्रांच्या बरोबर जगून घेण्याचा आनंद या पुस्तकातून सामान्य वाचकांनाही मुक्तकंठाने दिला आहे.

तसे म्हणावे तर पुलंच्या सुनीता देशपांडे, जी.ए,दि.के.बेडेकर, आरती प्रभू असलेलं चि.त्र्यं. खानोलकर, मे.पु रेगे, स्मिता पाटील, सत्यदेव दुबे, विंदा, अरविंद गोखले, सुभाष भेंडे, व.पु काळे, मेनकाचे पु.वि.बेहेरे, आर्किटेक्ट मैत्रीण नीतू कोहली, श्रीदेवी, बोनी कपूर, रवींद्र मिस्त्री, निळु फुले, अरुण सरनाईक, निळूभाऊ लिमये, जी.डी.गोंधळेकरसर, ‘चक्र’ सिनेमाचे दिग्दर्शक रबींन्द्र धर्मराज, इत्यादी महनीय व्यक्तींचे वाजवी अनुभव कथन केले आहेत.

सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे तर अवचट कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते होते. एक संपूर्ण प्रकरण त्यांच्या विविध आठवणींशी निगडीत आहे. शांताबाई त्याकाळात वांद्रे येथील साहित्य सहवासात एकाकी रहात होत्या. त्यांना जीवनाच्या शेवटच्या काळात पुणे येथे आई, भाऊ, वहिणीसमवेत राहण्याचा आग्रह भाऊ नेहेमी करत होता. सुभाषजींच्या ताईंच्या मैत्रीच्या प्रयत्नातून त्या पुण्यात रहायला गेल्या. त्यांचा फ्लॅट प्रारंभी भाडे तत्त्वावर व नंतर शांताबाईंच्या भावाने ठरविलेल्या किंमतीत सुभाषजींनी खरेदी केला. साहित्य सहवासात राहून मग काय त्यावर एक प्रदीर्घ प्रकरण सुभाषजींनी लिहिले आहे .
विंदा,वपु,रेगे,अरविंद गोखले, अरूण साधू, सत्यदेव दुबे, गंगाधर गाडगीळ, दिनकर साक्रीकर, सुभाष भेंडे, धर्मयुगचे संपादक धर्मवीर भारती, म.वा.धोंड,म.वि. राजाध्यक्ष, विजया राजाध्यक्ष, सचिनचे वडील रमेश तेंडुलकर इत्यादी साहित्यिक
या साहित्य सहवासात रहात होते. सुभाषजींनी सा-यांच्या विविधांगी आठवणींचं सुरेख चित्रण केलं आहे. अगदी सचिनच्या क्रिकेट खेळण्यापर्यंत!ते मुळातच वाचले पाहिजे. असा ‘साहित्य सहवास’ इतरत्र नाही इथं राहण्यास भाग्य लागतं असे सांगत सुभाषजी या प्रकरणात शेवटी म्हणतात, “माझ्याकडे मित्रमंडळी येत असत. अनेकदा खालच्या कट्ट्यावर आम्ही बसायचो. इथे राहिलेल्या पण आता हयात नसलेल्या अनेक मोठ्या लेखकांविषयीच्या गप्पा रंगत. अजूनही इथे विंदांची साहित्य दिंडी निघते, त्यात सारे सहभागी होतात. गाण्यांच्या मैफली होतात. विविध कार्यक्रम होतात .देवराजांनी भारतीजींनी आणि अनेक लेखकांनी लावलेली झाडे अजून आहेत. त्यावर पोपट येतात, फुलपाखरे येतात, किलबिलाटात साहित्य सहवासात सकाळ होते आणि रात्री या साहित्यकारांची घरे शांत झोपतात.

तीनशे बाय तीनशे मीटर असलेल्या या साहित्य सहवासाने साहित्य संमेलनाचे दहा अध्यक्ष दिले. तीन साहित्य अकादमी अवॉर्ड चे लेखक दिले.चार संगीत नाटक अकॅडमीचे विजेते दिले. पद्मश्री, पद्मविभूषण, ज्ञानपीठ सन्मान दिले. एक ‘भारतरत्न’ सुद्धा दिला अशी कॉलनी इतरत्र असेल असे मला वाटत नाही. योगायोगाने आपण साहित्य सहवासात आलो मला फिरावं लागलं नाही. मैत्रिण स्मिता पाटील, विनोद खन्ना यांच्यामुळे आपण मुंबईत साहित्य सहवासात आलो.या कॉलनीने मला पेंटिंग करायला, राहायला स्थैर्य दिलं, शांतता दिली. अनेक लेखकांनी, रहिवाशांनी प्रेम, आपुलकी दिली .त्यांच्या मोठ्या, अलौकिक कुटुंबात सामावून घेतलं”.

सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही ‘रफ स्केचेस’ आपल्याला एक विरळ संधी देतात. आयुष्यात भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्र, त्या चित्रामागचा विचार, त्यामागची प्रोसेस, जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, तसेच माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं सुभाषजींचं लिखाण त्यांच्या चित्रा इतकंच उत्स्फूर्त आणि लकाकतं आहे. चित्रकाराला जग हे वेगळंचं दिसते. पण त्याच्या विचार विश्वात, लेखणीच्या सामर्थ्यात, डोकावण्याची संधी आपणास या ‘रफ स्केचेस’ मुळे मिळते.हे या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्यपूर्ण यश आहे असे म्हणावयास हरकत नाही.

सुभाषजींनी पॅरिस, मेक्सिको , अमेरिकेतील चित्रप्रदर्शनावर व तेथील चित्रकारांच्या कलाकृतींवर तसेच जहांगिर आर्ट गॅलरी वर ब-याच विस्ताराने तीन चार प्रकरणातून परामर्ष घेतला आहे. पिकासो, व्हन्सेंट व्हॅन गो, रेम्ब्रोन, पोल सेझान, ब्र्युगुल, बिंद्रा काहलो,साल्वोदार दाली, मोंमार्त इत्यादींच्या कलाकृतींचे विस्ताराने चित्रण केले आहे. भारतीय चित्र तपस्वी मकबूल फिदा हुसेन यांच्यावर तर पूर्ण प्रकरण ‘अब्बाजान’ या शिर्षकावर लिहिले आहे. कोल्हापूर कला नगरीतील तंत्रज्ञानी बाबूराव पेंटर ते अभिनव कला महाविद्यालयातील सहाध्यायी त्रिभुवन यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविले ते अगदी आपल्या नाशिकच्या ‘मिसळ क्लब’चे धनंजय गोवर्धनापर्यंत! बालपणाच्या खेड्यातील बंधू अनिल अवचट यांच्या सोबतच्या आठवणी पासून तर पुण्यात टिळक रोडवर स्वतःचा स्टुडिओ उभारल्या पर्यंतच्या कुटुंबीय आठवणींचा सुरेख मागोवा घेतला आहे. त्याचबरोबर परदेशातील संचार, तेथील चित्रप्रदर्शने यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. पुस्तकांचे जवळपासचे सर्व प्रकाशकांचा, कवी-लेखकांचाही उल्लेख प्रसंगानुरूप केलेला आहे. त्यामुळे नव्या पिढीतील साहित्यप्रेमी जिज्ञासूंनी तसेच चित्रकारांनी हे पुस्तक संपूर्णपणे वाचले पाहिजे.अभ्यासले पाहिजे.असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय