विद्या बाळ
शतकांपासून अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करत आलेल्या समाजातील मोठा वर्ग असलेल्या स्त्रियांकडे समानतेच्या भावनेने पाहण्याची परिस्थिती निर्माण करण्यात ज्या समाज धुरिणांनी योदगान दिले त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे नाव घ्यावेच लागेल. हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या व स्त्रीवादी लेखिका, पत्रकार म्हणूनही विद्या बाळ प्रसिद्ध आहेत.
प्रेरणा आणि आधार देणा-या नारी समता मंच या संस्थेची स्थापन करणा-या विद्या बाळ यांची आज ओळख करून घेऊया. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पूर्वाश्रमीच्या सुधा केशव केळकर अर्थात मराठी लेखिका व संपादक विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला.त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली.
लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर हे विद्या बाळ यांचे आजोबा. त्यामुळे बालपणी केसरीतील विचार, हिंदू महासभा यांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला.
पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या नोकरीचा राजीनामा देऊन किर्लोस्कर समूहाच्या ‘स्त्री’ मासिकाचे संपादकपद स्वीकारले.१९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या. तर १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले.
‘ स्त्री ‘ मासिकातून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी १९८९ सालच्या ऑगस्टमध्ये “मिळून साऱ्याजणी” हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत.
या मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे ‘”स्त्रीमिती”’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या संपादिका डॉ. नीलिमा गुंडी होत्या. स्त्रियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आज स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
विद्या बाळ यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाशी सलग्ऩ ‘”सखी मंडळा’”ची स्थापनाही केली. ‘बोलते व्हा,’; ‘पुरुष संवाद केंद्र,’; ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय,’; ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,’; ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग,’; ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. ग्रामीण स्त्रियांचे भान जागृत करणारे ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
स्त्रीविषयक परिषदांच्या निमित्ताने विद्या बाळ यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन असे चौफेर लेखनही त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. त्यांनी लिखाणाची सुरुवात कथा लेखनाने केली. परंतु त्यानंतरच्या काळात विविध क्षेत्रांत भेटलेली माणसे आणि त्यांचे प्रश्न अधिक अर्थपूर्ण वाटल्यामुळे त्यासंबंधीचे स्फुटलेखन केले. सामाजिक बांधिलकीची भावना आणि स्त्रीविषयक अन्यायाची जाणीव हा त्यांच्या सर्व लिखाणाचा गाभा आहे. आजूबाजूला घडणार्या घटना, परिषदा, नाटक, साहित्य यांमधून उपस्थित केलेले प्रश्न यासंबंधी लेखन केले.
विद्या बाळ यांचे प्रकाशित साहित्य संपादन पुढील प्रमाणे आहे :—
कादंबरी संपादन :– तेजस्विनी, वाळवंटातील वाट
अनुवादित कादंबरी संपादन — जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची
चरित्र संपादन :– कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र) यामध्ये वैधव्य आणि अनेक अडचणींसह मनस्वी आयुष्य जगताना स्त्री-शिक्षणासाठी झटणार्या आणि परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळवणार्या कमलाबाई देशपांडे यांच्या धडाडीचे चित्रण आहे.
स्फुट लेखांचे संकलन संपादन :— अपराजितांचे निःश्वास (संपादित)
एकटे राहताना स्त्रियांच्या वाट्याला येणारे दाहक अनुभव, त्यांनी केलेला प्रतिकार आणि कमावलेली आत्मनिर्भरता या सर्व अनुभवांचे संकलन आणि संपादन म्हणजे “अपराजितांचे निःश्वास” होय.
कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
“डॉटर्स ऑफ महाराष्ट्र”, या संपादित ग्रंथात महाराष्ट्रातील श्रेष्ठ स्त्रियांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे.
तुमच्या माझ्यासाठी, मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस)), “शोध स्वतःचा” संवाद साकव
विद्या बाळ यांच्या विषयीचे पुस्तक संपादन :- विद्याताई आणि…..(अंजली मुळे आणि आशा साठे) प्रसिद्ध आहे.
अनेक स्त्रियांसाठी आधारवड ठरलेल्या विद्याताई यांनी ‘शोध स्वत:चा’ या पुस्तकात स्वत:च स्वत:तल्या बदलांचा खोलवर धांडोळा घेतला आहे.
सामाजिक प्रश्नांचे सहृदय आणि वस्तुनिष्ठ आकलन त्यांच्या सर्व लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे.
संपादकीय लेखन हे अनेक व्यक्तींशी संवाद प्रस्थापित करण्याचे प्रभावी माध्यम कसे ठरू शकते याची जाणीव त्यांचे लिखाण वाचताना होते.
आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’ स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता या बद्दल फाय फाऊंडेशनचा पुरस्कार…
अश्या अनेक पुरस्कारांनी तसेच त्यांचा ‘आत्रेय’तर्फे साहित्यिक, कवयित्री शिरीष पै यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा ‘शिरीष पै पुरस्कार’ तर २०१६ मध्ये स्त्रीवादी चळवळीतील अग्रणी आणि संस्थात्मक कार्यातून कृतीशील समाज घडविण्यासाठी अखंड कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या या नात्याने विद्या बाळ यांचा महाराष्ट्र फाउंडेशनने ‘जीवनगौरव’ अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्याताई त्यांच्या प्रेमळ आणि स्वागतार्ह स्वभावासाठी अत्यंत आदरणीय स्त्रीवादी होत्या.
एक लेखिका, पत्रकार, महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीतील अग्रणी आणि संस्थात्मक कार्यातून कृतीशील समाज घडविण्यासाठी अखंड कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या म्हणून विद्या बाळ यांचे नाव आज आदराने घेतले जाते. आपल्या कार्याला वार्धक्याची अडचण त्यांनी येऊ दिली नाही. त्यांचा हा उत्साह नव्या पिढीला प्रेरणा आणि आश्वासन देणारा आहे.
एकीकडे लिखाणाच्या माध्यमातून तर दुसरीकडे प्रत्यक्ष संघटना स्थापन करून स्त्रीवादी चळवळीसाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या विद्याताईं यांचा जिव्हाळयाचा आणखी एक विषय होता तो म्हणजे ‘स्वेच्छामरण’. ज्यो रोमन यांच्या ‘एक्झिट हाउस’ या पुस्तकामुळे त्यांच्या मनात ही कल्पना रुजली होती. मिळून साऱ्याजणींमध्ये त्यांनी या पुस्तकावर एक लेख लिहिला आहे. (दिवाळी 1993). मरण हा जगण्याचाच एक अटळ भाग आहे तर मग जगण्याइतकाच मरणाच्याही गुणवत्तेचा विचार व्हायला हवा हा त्यांचा आग्रह होता.
विद्याताईंनी नेमका ३० जानेवारी रोजी म. गांधींच्या पुण्यतिथीला, ३० जानेवारी २०२० रोजी अतिशय शांत मनाने या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या इच्छाशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800