“गोष्ट नर्मदालयाची”
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि त्याची परतफेड आपण केली पाहिजे अशी भावना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेकांच्या हृदयात जागृत होत असते. तथापि तिला मूर्त स्वरूप देणे बहुतेकांना शक्य होत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र काही थोडे वेडे जीव अक्षरशः सर्वसंग परित्याग करून मनात ठरवलेले इप्सित साध्य करण्यासाठी जीवाचे रान करतात. काही यशस्वी होतात, काही अर्ध्या वाटेतच निराश होतात, काही आरंभशूर ठरतात. मात्र प्रत्येकाची भावना प्रामाणिकच असते. फक्त तोकडा पडतो तो निर्धार. अक्षरशः शून्यातून शाश्वत निर्मिती करणे हा खडतर प्रवास असतो. त्यामुळे असे निस्वार्थ समाजोपयोगी कार्य करणारे स्त्री-पुरुष साहजिकच आदर्शवत होऊन जातात. अशीच एक अविश्वसनीय कहाणी भारती ठाकूर यांनी “गोष्ट नर्मदालयाची” या आत्मकथनात शब्दबद्ध केली आहे.
‘विवेक प्रकाशन’ यांनी या पुस्तकाची (मूल्य दोनशे रुपये) दुसरी देखणी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. भारती ठाकूर यांनी आता ‘प्रव्राजिका विशुद्धानंदा’ असे दीक्षा पश्चात नाव धारण केले असून हे कार्य पुढे नेण्यास सहकार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवले आहे.
भारती ठाकूर मूळच्या नाशिकच्या आहेत. गिर्यारोहण, सायकल स्वारी आणि अर्थातच नर्मदा परिक्रमा अशा अनेक मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्यासाठी त्या आसाममध्येही गेल्या होत्या. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात असताना एक नवी दृष्टी त्यांना प्राप्त होऊ लागली. त्यातूनच त्यांना नर्मदा परिक्रमेची प्रेरणा मिळाली आणि एक इतिहास लिहिला जाऊ लागला. भारती ताईंनी १४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या यात्रेत त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले. ते एवढे प्रभावी होते की ते शब्द रुपे व्यक्त करण्याची स्फूर्ती त्यांना लाभली. ते अनुभव ‘नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा’ या त्यांच्या अंतर्मनाशी झालेल्या स्वसंवादात वाचायला मिळतात. प्रवास हा एक महान शिक्षक असतो. ती प्रचिती भारती ताईंना या परिक्रमेत आली. ती परिक्रमा करताना त्यांना तेथील दाहक सामाजिक परिस्थितीचे प्रत्यक्ष ज्ञान झाले आणि इथल्या जनतेसाठी, विशेषतः शालेय वयाच्या मुलांसाठी, काहीतरी करण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजू लागली. तिला मूर्त स्वरूप कसे दिले आणि आज हा वटवृक्ष कसा फोफावला आहे, याचे अतिशय रोचक वर्णन या २४०–पानी पुस्तकात वाचताना कोणीही प्रत्येक पानावर खिळून जाईल, एवढे या स्वानुभवाचे सामर्थ्य आहे.
केवळ अंगावरचे कपडे घेऊन नाशिक येथील बाडबिस्तरा आवरताना झालेली मनाची घालमेल आणि नर्मदा काठी पोहोचल्यानंतर एका मागून येणारे अतींद्रीय अनुभव वाचकास स्तिमित करून सोडतात. विविध स्तरातील परोपकारी व्यक्ती आणि संस्था संघटना यांनी वेळोवेळी केलेली मदत नर्मदालयाचा पाया भक्कम करण्यासाठी कशी वापरण्यात आली, या उपक्रमाचा लाभ स्थानिक बालकांना देताना सामाजिक आणि प्रापंचिक अडचणींमुळे किती आव्हाने समोर उभी ठाकली आणि अत्यंत निडरपणे भारतीताईंनी त्यांचा यशस्वी मुकाबला कसा केला, याचे मनोज्ञ वर्णन “गोष्ट नर्मदालयाची” वाचताना सामोरे येत जाते.
हे पुस्तक वाचताना सतत होणारी बोचरी जाणीव म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतकी वर्षे उलटल्यानंतरही विकासाची गंगा वंचित वर्गापासून किती दूर आहे याची दाहक प्रचिती अत्यंत प्रवाही भाषेत भारती ताईंनी शासकीय यंत्रणेचा मख्ख कारभार, सर्वत्र उपस्थित भ्रष्टाचार आणि त्याच वाळवंटात येणारे अपवादात्मक सरकारी अधिकारी वर्गाचे सुखद परंतु दुर्मिळ अनुभव तसेच कोणतीही प्रसिद्धी किंवा सत्कार यांची अपेक्षा न बाळगता अनेक स्त्री पुरुषांनी निरपेक्ष भावनेने केलेली मदत हृदयाला पीळ घालणारी ठरते.
या पार्श्वभूमीवर अधोरेखित होणारी एक बाब म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर किंवा इतर कोणावर तरी अवलंबून राहण्याची आपल्या समाजाची मानसिकता निश्चितच अस्वस्थ करून जाते. हे अवलंबित्व दूर करण्याचा प्रयत्न म्हणून केवळ औपचारिक पुस्तकी शिक्षण न देता अशा वर्गातील मुला-मुलींना स्वतःच्या पायावर करण्यासाठी भारतीताईंनी दाखवलेली दूरदृष्टी, हे उद्दिष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे जाणून त्यांच्या उभे राहणारे कार्यकर्त्यांचे संघर्ष, लक्ष्यप्राप्तीसाठी या सर्वांनी केलेली तपश्चर्या हा या पुस्तकाचा गाभा आहे. त्या दृष्टीने या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील पुढील मजकूर त्याचे सार अत्यंत नेमक्या शब्दात आपणास सांगतो. “शिक्षण म्हणजे नेमके काय ? कागदावरची आकडेमोड आणि इतिहासातील सनावळ्या या पाठ करणे ? हे शिक्षण असेल तर मग जीवन शिक्षणाचे काय ? ते देणारी व्यवस्था कोणती ? या आणि अशा प्रश्नांना उत्तर देणारे एक रसरशीत अनुभव कथन. शिक्षण आणि जगणे एकमेकांमध्ये सामावून घेत उभा राहिलेला एक अनोखा प्रयोग. वंचित मुलांना जीवन प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या एका विलक्षण स्त्रीच्या अथक प्रयत्नांची थक्क करणारी कहाणी.”
या पुस्तकाची पहिली आवृत्ती ४ डिसेंबर २०२२ रोजी तर दुसरी आवृत्ती केवळ पंधरा दिवसात म्हणजे २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. निष्काम कर्मयोग करणाऱ्याला ‘योगक्षेमं वहाम्यहम’ असे वचन देणाऱ्या या भगवंताचे हात म्हणून समाजातल्या असंख्य ज्ञात अज्ञात दात्यांनी भारती ताईंच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांना मनापासून दाद दिली. त्या असंख्यदात्यांना हे पुस्तक सादर समर्पित करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध मानसोपचार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना म्हणजे या पुस्तकाचा अत्यंत जिव्हाळ्याने करून दिलेला परिचय. भारतीताई म्हणतात तशी ही एक अनुभव गाथा आहे. मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यात असलेल्या बैरा(ग)गड या एका छोट्याशा गावी वनवासी मुलांसाठी केलेल्या शैक्षणिक प्रयोगाची ही शब्दावली आहे. आपण सगळे म्हणतो की आपल्याला शाळेत अनावश्यक गोष्टी शिकवतात आणि त्यांचा नको तो भार मुलांवर पडत जातो. मुलांना समजेल तेवढाच अभ्यास आणि त्या सह प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव त्यांना द्यावा या विचाराने शालेय अभ्यासक्रमाच्या जोडीने सुतारकाम, वेल्डिंग, प्लंबिंग, गोशाळा व्यवस्थापन, गृह व्यवस्थापन यासारखे विषय मुलांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली. आज नर्मदालयाच्या तीन ही निशुल्क शाळा डोंगर भागातील आदिवासी मुलांसाठी कार्यरत आहेत, वसतीगृह देखील सुरू आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा एक अत्यंत महत्वाकांची प्रकल्प २०२२ साली नर्मदालयास मिळाला. त्याच्या अंतर्गत प्रगत यंत्रसामुग्री प्राप्त झाली. हा विषय आता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असला तरी त्याचे प्रशिक्षक उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेऊन संपूर्ण भारतातली पहिली मोबाईल लोकेशन ट्रेनिंग व्हॅन म्हणजे ‘कौशल्य’ रथ आता संस्थेत कार्यरत झाला आहे. शाळेतील लाकडी फर्निचर शाळेतील विद्यार्थीच बनवतात. त्याचप्रमाणे गोशाळेचे व्यवस्थापन पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. लागणारी बहुतेक भाजी देखील वसतीगृहातील सव्वाशे मुले आणि २५ कार्यकर्ते सांभाळतात. शाळेने वेगळा सफाई कामगार वर्ग नेमलेला नाही, याची नोंद घेणे जरूर आहे. ही कामे आणि अभ्यास देखील करताना जीवनानुभव घेणार्या या मुलांना संगीताचे शिक्षण देण्यास आरंभ झाल्यानंतर त्यांनी त्यात विलक्षण रुची घेतली. हार्मोनियम, तबला, पखवाज, ऑक्टोपॅड, कॉम्बोसिंथेसिस वाजवायला ती शिकली. शास्त्रीय रागांवर आणि लोकसंगीता वर आधारित पाठ्यपुस्तकातील कवितांचा सादर करणारा असा संपूर्ण भारतातील एकमेव वाद्यवृंद या शाळेत आहे. गंगा नदी, भगवद्गीता, आदी शंकराचार्य, वासुदेवानंद सरस्वती यांची असंख्य स्तोत्रे ही मुले सहज गातात.
विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातही नर्मदालय मागे नाही. भारतीताई म्हणतात, “नर्मदा परिक्रमेनं बारा वर्षांपूर्वी मला आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. ते एक निमित्त झालं नर्मदालयाच्या निर्मितीचं. गेल्या बारा वर्षात नर्मदालय विविध अंगांनी विकसित होत गेलं. तीन शाळा, वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, रोजचं साडेचारशे पाचशे मुलांचं माध्यान्ह भोजन, जैविक शेती, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग यांचं व्यवसाय केंद्र, २०१७ सालपर्यंत १७०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवलेली १५ समग्र शिक्षण केंद्र. विशेष म्हणजे हे सगळं कुठलीही सरकारी मदत न घेता घडत आहे. समजानं दिलेला भरघोस प्रतिसाद-प्रोत्साहन आणि गुरुतत्त्वाच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. या प्रयत्नांना मला साथ मिळाली ती मनापासून काम करणाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची.” त्यास भारती ताई दैवी योजना म्हणजे डिव्हाईन प्लॅनिंग म्हणतात.
भारती ताईंनी २७ एप्रिल २०२२ या दिवशी पूर्ण संन्यास घेतला आणि विशुद्धानंदा हे नाव धारण केले. त्यानंतर या पुस्तकाचे लेखन झाले आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यांच्या योगदानातून लोकोपयोगी कामे उभी राहतात आणि स्वयंसेवी स्त्री पुरुष त्यांच्या कार्य चालनात मदत करतात. आताशा ही कल्पना आपल्या देशात रुजत आहे. पारशी, मारवाडी आणि जैन तसेच अन्य काही समाजांनी त्या दृष्टीने काम केले आहे. कर्मवीर अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था किंवा पाबळ येथील विज्ञान केंद्र अशी उदाहरणे जरूर आहेत. परंतु महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्यातील सधनवर्गाचे प्रमाण लक्षात घेता इतरांना मदत करण्याची मानसिकता विकसित होणे गरजेचे आहे. “गोष्ट नर्मदालयाची” त्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
ही परिक्रमा करताना त्यांना नर्मदा खोर्यातील भीषण परिस्थितीची जाणीव झाली. शिक्षण मिळणे शक्य नसल्याने बाल वयातील ही आदिवासी मुले भटकत असायची, मेहनत करून दोन पैसे कमावयाची. हे वास्तव भारती ठाकूर यांना सतत बोचत असे. एका क्रांतिकारी क्षणी त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून नर्मदाकाठी जायचा निर्णय घेतला. त्याच बीजाचा आज एक डेरेदार वृक्ष झाला आहे.
खरं सांगायचं तर हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी त्यांनी कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले.
सुरुवातीला त्यांनी एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या परिसरात, पाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याचीही जबाबदारी मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी भारती ठाकूर ह्यांनी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशीर्वादाने एकेक निरलस कार्यकर्ता जोडला जाऊ लागला. शाळेत येणारे विद्यार्थी अभ्यास करतानाच विविध कामे करू लागले. आता निमाड परिसरातील कित्येक खेड्यांपर्यंत त्यांचे कार्य विस्तारले आहे. प्राथमिक ते माध्यमिक शाळा आणि रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण देतानाच आरोग्य आणि पर्यावरण रक्षण यांचेही संस्कार करण्यात येतात.
नर्मदालयाच्या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो. नचिकेत छात्रावास, त्याच्या नजीकच गोशाळेचा एक प्रकल्प, नर्मदा निर्मिती हा शिलाई विभाग स्थानिक महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आला आहे.
ही अथक तपश्चर्या पुढे जाणे अगत्याचे आहे. भारती ठाकूर यांच्या प्रेरणेने हे कार्य चिरायू व्हावे हीच शुभेच्छा. आपण सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊन आपल्या परिवारातही पोहोचवावे. ही विनंती करण्याचे कारण म्हणजे त्यातून होणारे उत्पन्न नर्मदालयासाठी देणगी स्वरुपात जाणार आहे. आभार आणि शुभकामना !
— परीक्षण : दिलीप चावरे. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800