अलक म्हणजे अती लघु कथा. हा प्रकार मराठी साहित्यात चांगलाच रुजत चालला आहे. कवितेत जसा हायकू प्रकार आहे, तसाच कथेत अलक प्रकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज आपण वाचणार आहोत, बंगलोर निवासी परवीन कौसर यांच्या ४ अलक, अर्थात ४ अती लघु कथा.
– संपादक
१) उसंत
दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या माईला जेव्हा मुलीने आपल्या पास झाल्याच्या निकालाबरोबर नोकरी मिळाली त्याचे पत्र दाखवले तेव्हा माईने मावळत्या सूर्याला नमस्कार करून म्हटले, “आज खऱ्या अर्थाने तुझ्या सारखी मला पण आयुष्यात उसंत मिळणार.”
२) हिरव्या बांगड्या
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. सगळ्या सवाष्णी घरात आल्या होत्या. आज वाण म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या देण्याचा मान मिळाला म्हणून ती खूप आनंदात होती. सगळ्यांना वाण दिले आणि देत असताना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या कारण नवरा गेल्यानंतर महिन्यापुर्वीच तिचा पुनर्विवाह झाला होता.
३) अलक
मुलाने मुखाग्नी दिला तर स्वर्ग मिळतो, या श्रध्देने तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या भावाला निस्सीम प्रेम देऊन स्वर्गसुख घेण्यासाठी अमेरिकेत पाठवले आणि हिला दुय्यम स्थान दिले. आज तीच मुलगी वडिलांना मुखाग्नी देण्यासाठी पुढे आली आणि वंशाचा दिवा मात्र सातासमुद्रापलीकडे तेजोमय होत होता !
४) वचन
आईचे श्राद्ध करणे आवश्यक आहे यासाठी लागेल तो खर्च केला करण्यास मी तयार आहे, म्हणणारा मोठा भाऊ श्राद्ध झाल्यानंतर बहीणींचे हक्कसोड पत्रावर सही घेण्यासाठी कागद पुढे केला. हे पाहून आईला दिलेले वचन की तिच्या पश्चात तिने घेतलेल्या दत्तकपुत्राला आपली सगळी संपत्ती मिळावी हे आठवून बहीणींनी त्या पेपरावर सही केली आणि माहेराला कायमचा निरोप दिला.
— लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800