Thursday, January 2, 2025
Homeयशकथापर्यावरणप्रेमी : डॉ मुकेश कुळकर्णी

पर्यावरणप्रेमी : डॉ मुकेश कुळकर्णी

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक थोर महापुरुष,  संत, महात्मे आपल्या देशाची महती वाढवून गेले. अनेक देशभक्त,  थोर स्त्रिया, इथल्याच! भारत देश नवरत्नाची खाण असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. या सगळ्याला साथ निसर्गाची ! आपला देश सूर्याचा देश !  लक्ख सूर्यप्रकाश, शीतल चांदण्यानी नटलेले आकाश, नद्या डोंगर, झरे हिरवी हिरवी राने !  समृद्ध निसर्ग, आणि स्वच्छ पर्यावरण हे आपलं वैभव होतं.

पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तस तसा निसर्गाचा समतोल ढासळू लागला. पर्यावरण बिघडले. संतांनी  “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शब्दात आपल्याला ही जाणीव करून दिली. आजचे  तरुणही  या कामासाठी पुढे सरसावत आहेत ही आनंदाची बाब आहे. अशाच एका पर्यावरण प्रेमी युवकाची ही यशोगाथा तुम्हालाही निसर्गावर प्रेम करायला नक्कीच उद्युक्त करेल !

हा तरुण म्हणजे मूळ भुसावळचे असणारे डॉ मुकेश कुळकर्णी.
डॉ मुकेश यांचे वडील रेल्वेत पी.ओ. एच. विभागात होते. डॉ मुकेश हे भावंडात सगळ्यात लहान. भाऊ व बहीण दोघेही मोठे साहजिकच घरात लहान म्हणून लाड कौतुक खूप झाले. पाच जणांचे हे कुटूंब खूप समाधानी वृत्तीचे. आई वडिलांचे खूप चांगले संस्कार मिळाले. गरिबी नसली तरी काटकसरीने  व आनंदात  राहायला  शिकले.

छोट्या मुकेशची बुद्धी खूप चौकस होती. भुसावळ तसे निसर्गाच्या सानिध्यात असलेले, मोठे रेल्वे जंक्शन. जवळच रावेरचे घनदाट जंगल’ झुळझुळणारी तापी नदी , तरीही भुसावळ इतके गरम का हा प्रश्न मुकेशच्या बालबुद्धीला पडत असे. बीएससी पर्यंत त्यांचे शिक्षण भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतांना राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग व त्यातील विविध उपक्रम यामुळे त्यांना पर्यावरण, निसर्ग याविषयी खुप आस्था व आवड निर्माण झाली. त्यामुळे जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमएससी केल्यानंतर, डॉ. थोरात सर यांनी मुकेशच्या आवडीला प्रोत्साहन देत पीएचडी साठी मार्गदर्शन केले.  उत्तर महाराष्ट विद्यापीठात पर्यावरण याच आवडीच्या विषयात त्यांनी पीएचडी केली. इतक्या लहान वयात डॉक्टरेट मिळविणे खरंच कौतुकास्पद ! तसेच या उच्च शिक्षणासाठी त्यांचे मोठे भाऊ महेश कुळकर्णी व बहीण सुनीता कुळकर्णी (आताची उपासनी) यांचे मार्गदर्शन व सहकार्य अतिशय महत्वाचे होते.

आता सगळा निसर्ग, पर्यावरण त्यांना दोन्ही हात पसरून बोलावत होते. साद देत होते. सुरुवातीला पर्यटन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बेड अँड ब्रेकफास्ट, महाभ्रमण व ऍग्रो टूरिजम सोबत शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी त्यांना मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी साठी २०१५-१६ मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे पर्यावरण व पर्यटन यांची सांगड घालत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक किशोरी गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शासना मार्फत ‘महापर्यटन – पर्यटनातून रोजगाराच्या संधी’ या १३ भागांच्या विशेष मालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पर्यटन व त्यातील संधी याबाबतची माहिती घराघरात पोहचली. आज महाराष्ट्रात आणि विशेष करून कोकणात निवास व न्याहारी योजना घराघरात राबविली जात आहे. यामुळे तेथील तरुणांचं नोकरीच्या शोधात असणार स्थलांतर तर थांबलंच, पण स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यातच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या
महत्वाच्या Omotenashi या जपान सरकार सोबतच्या उपक्रमा अंतर्गत डॉ मुकेश यांची जपान मधील प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

डॉ मुकेश सध्या चार वर्षांपासून महाबळेश्वर येथील, “हिलदारी” या घन व प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या अभियानाचे प्रमुख म्हणून काम बघत आहेत. प्रसिध्द नेस्ले कंपनीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने “स्वच्छ महाबळेश्वर” हा उपक्रम त्यांच्या सामाजिक दायित्वातून हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक होणे म्हणजे त्यांच्या पर्यावरण प्रेमाची आणि त्यातील तज्ञतेची पावतीच आहे.

या उपक्रमाअंतर्गत महाबळेश्वर व आसपासच्या पंचक्रोशीत प्लास्टिक निर्मूलन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आपल्याला नेहमीच पाहायला मिळते की मनुष्य जिथे जाईल, तिथला निसर्गाचा समतोल बिघडलाच समजा !  जिथे जाईल तिथे कचरा करून प्लास्टिक तिथेच टाकून तो  पुढे निघतो. याला प्रतिबंध घालून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व महाबळेश्वरला देशातील सर्वात स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवण्याचे डॉ मुकेश यांचे स्वप्न आहे व त्या दृष्टीने त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. 

या ध्येयवेड्या तरुणाला साथ आहे सुंदर समंजस  सुशिक्षित पत्नी सौ अंकिता ची ! त्यांचे सांसारिक जीवनही अतिशय मधुर आहे. सहा वर्षांचा निनाद व लहानश्या साईशाच्या बाललीला ! असे हे सुखी चौकोनी कुटुंब महाबळेश्वरच्या निसर्गरम्य  परिसरात  पाचगणी येथे राहत आहे. आईवडिलांचे आशीर्वाद आहेतच ! तसेच डॉ मुकेशवर श्री अनिरुद्ध बापूंचा वरदहस्त आहे व जीवनात इतके सुख आनंद सगळे बापूंच्या आशीर्वादामुळेच अशी त्यांची नितांत श्रद्धा आहे. एका कवीने म्हटल्याप्रमाणे…
  “जीनेको और क्या चाहीये ?”
असे समाधानी जीवन आहे डॉ मुकेश यांचे.

डॉ मुकेश यांच्याशी बोलतांना मला हे जाणवले की ते अतिशय नम्र, विनयशील आहेत. स्वकर्तृत्वावर एव्हडी मोठी झेप घेतलेल्या डॉ मुकेशचे माणूसपण अनुभवून मला खुप आनंद झाला. त्यांचे कौतुक वाटले. अहंपणा किंवा गर्व यत्किंचितही नसलेल्या डॉक्टरांनी पाचगणीला येण्याचे प्रेमळ निमंत्रण दिले. लिहिण्यासाठी मला पूर्णपणे मदत केली त्याबद्दलही त्यांचे मनापासून अभिनंदन !
 
डॉ मुकेश कुलकर्णी यांचा आज, ३ मे रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या मनातली सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, स्वच्छ सुंदर भारताचे त्यांचे स्वप्न त्यांच्या प्रयत्नाने नक्कीच प्रत्यक्षात उतरेल ही खात्री आहे.
डॉ मुकेश यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा !
तुम जियो हजारो साल सालके दिन हो पचास हजार !

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !