Sunday, December 22, 2024
Homeलेखपुणे आकाशवाणी : सुवर्ण महोत्सवी बातम्या

पुणे आकाशवाणी : सुवर्ण महोत्सवी बातम्या

एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून दरवर्षी साजरा होत असतो. तसा तो यंदा सुद्धा झाला. पण यावेळी या १ मे ला पुण्यामध्ये माध्यम क्षेत्रात एक वेगळे निमित्त होते. या दिवशी म्हणजेच दिनांक १ मे १९७५ रोजी पुण्याहून आकाशवाणी केंद्रावर मराठीत रोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी नियमितपणे वार्तापत्र सुरू झालं. (आता त्या सात दहाला सुरू होतात) म्हणजे सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू झाले. त्याची लगबग पुणे आकाशवाणी केंद्रावरच नव्हे तर मराठी दैनिकांमध्ये सुद्धा याची विशेष दखल घेतली गेली.

या महत्त्वाच्या घटनेचे साक्षी म्हणून उपलब्ध होते, ते त्या वेळचे वृत्त संपादक चंद्रशेखर कारखानिस. त्यांनी परवाचे बुलेटीन सुरुवात करताना आवर्जून आठवण केली ती या बुलेटीनची निर्मिती मुळात झाली कशी या मुद्द्यावरून. आकाशवाणीच्या दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख म्हणून त्यावेळी एस सी भट हे अतिशय कर्तव्यदक्ष, कल्पक अधिकारी काम करीत होते. केंद्र शासनात राहून देखील बातम्यांची माध्यम क्षेत्रात असलेल्या मूल्यांची जाण असणारे अधिकारी म्हणून त्यांना मोठा मान होता. पुण्यातील आकाशवाणी केंद्रावर सकाळी सात पाच रोज ब्रॉडकास्ट होणारे बुलेटीन सुरू करायचे आहे त्यासाठी माझी आणि आम्हा इंडियन इंफॉर्मेशन सर्विस मध्ये माझ्यासारखेच प्रशिक्षित झालेले श्री अष्टेकर यांची नेमणूक झाली आहे सांगितले.

आम्हा दोघांना वार्तापत्र आकाशवाणीवर सुरू करायचे आहे ते देखील राजधानी नसलेल्या शहरात, याचे मोठे आश्चर्य वाटले होते. नंतर मात्र कळलं की स्वतः श्री एस सी भट यांना आपल्या मुंबईतल्या वास्तव्यामुळे पुण्याचे महत्त्व माहित होते. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचे निर्विवाद महत्त्व होतेच पण सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचे महत्त्व त्यांना नक्की माहीत होते, आम्हा दोघांच्या मदतीला कमलाकर पाठकजी आणि दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रातील जाणकार अनुभवी मराठी बुलेटीन निर्मिती करणारे सदाशिव दीक्षित आणि मराठी साहित्यिक श्रीमती सुधा नरवणे अशी टीम त्यांनी दिली होती.

सकाळी सात पाचच्या बातम्यांचे बुलेटीन तयार करायचे म्हणजे आदल्या दिवशी संकलित केलेल्या बातम्या सकाळी पाचला उठून, संपादन करून, तयार करून ठेवणे आवश्यक होते. महिन्यात सहा दिवसांच्या कॉन्ट्रॅक्टवर मराठी बुलेटीन साठी काम करू इच्छिणारे युवक आणि युवती निवडून सुरुवातीचे प्राथमिक ट्रेनिंग देऊन 30 एप्रिल 1975 रोजी बुलेटीन ची पूर्ण तयारी करून पहाटे रिहर्सल घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने या संपूर्ण टीमने मराठी माध्यम विश्वात एक मोठे धाडसी पाऊल टाकले. त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा रेकॉर्डेड शुभेच्छा संदेश आधीच मिळवलेला होता. तो तयार झालेल्या इतर सर्व बातम्यांच्या मजकुरात समाविष्ट करीत बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी ही ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष घडली.

जनरल मनोज नरवणे

आत्ता भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या मातोश्री सुधा नरवणे यांच्या आवाजातील पहिले बुलेटीन वाचले गेले याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मुद्रित क्षेत्रातील माझ्यासारखे पत्रकार आणि या महत्त्वाच्या माध्यम घडामोडी विषयी उत्सुकता असणारे असंख्य आकाशवाणी श्रोते जणू या घटनेची वाटच पाहत होते. पुणे आकाशवाणी केंद्राच्या फोनवर दिवसभर अभिनंदनाचे, कौतुकाचे आणि सूचनांचे असंख्य फोन आले आणि हा प्रयोग यशस्वी झाला यांची पावती मिळाली होती.

तेव्हा मी यु एन आय चा (युनायटेड न्यूज ऑफ इंडिया चा) पुणे मुक्कामी असलेला बातमीदार होतो. पुणे आकाशवाणी केंद्राच्या या नवीन सेवेचा मला नक्कीच लाभ होणार होता. (ते कसे ते मुद्दाम माहितीसाठी नोंदवतो). पुण्यात येण्यापूर्वी मी यु एन आय च्या मुंबई विभागीय कार्यालयात उपसंपादक म्हणून काम करत होतो. तेव्हा माझे त्यावेळचे वरिष्ठ श्री चंदू मेढेकर यांनी घालून दिलेला दंडक मी पाळत होतोच. आमच्या बातमीच्या कामासाठी मुंबई, पुणे, आणि संपूर्ण महाराष्ट्र या क्षेत्रात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा पाठपुरावा करणे हे माझे रोजचे कामच होते. मुंबई च्या आमच्या कार्यालयात यासाठी दोन ट्रांजिस्टर सेट तयार ठेवले होते. त्यावेळी संध्याकाळी सात वाजता ट्रांजिस्टर ला कान लावून महाराष्ट्राच्या बातम्या ऐकणे हे आमचे एक महत्त्वाचे काम होते. तीच सवय पुण्यात आकाशवाणी केंद्रावर मराठी बातम्या प्रसारित होणे सुरू झाले. तेव्हापासून मी आणि माझ्या घरातील सर्वांना हीच सवय अद्यापही आहे.

मध्यरात्रीनंतर रात्रभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी पर्यंत वाचायला मिळत नाहीत. पुण्यात अगदी भल्या पहाटेपासूनच कार्यरत असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या म्हणजे रिजनल न्यूज युनिट च्या (आर एन यु) च्या चंद्रशेखर कारखानीस यांच्या आणि त्यांच्या नंतर तेथे कार्यरत असलेल्या कार्यक्षम पत्रकार आणि त्यांचे तितकेच कार्यक्षम सहकारी मिळवितात आणि सात दहाच्या बुलेटिन मध्ये आपल्याला ऐकवतात. बाकी सर्व माध्यमकर्मी झोपलेले असतात, त्यामुळे असे काही महत्त्वाचे घडले असेल तर ती बातमी या पुण्यात आकाशवाणीच्या माध्यमातून मिळते.

चंद्रशेखर कारखानीस

असे अनेक प्रसंग घडले की आमच्या मोठ्या बातमीच्या कव्हरेज ची सुरुवात आकाशवाणीच्या या गोष्टींमुळे झाली.यातला एक नमुना प्रतिनिधिक स्वरूपाचा आहे. किल्लारीचा भूकंप झाला त्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे पुण्यातील सर्व दैनिकांची कार्यालये बंद होती. त्यामुळे त्यांच्या बातमीदारांना सुट्टी होती. बहुतेक दैनिकांचे बातमीदार या सुट्टीच्या निमित्ताने जवळपासच्या पर्यटन केंद्राला सहकुटुंब गेले होते. मी, लोकसत्ता चे अनिल टाकळकर आणि पत्रकार नगरच्या टेकडी ग्रुपचे बाकी काही सभासद आणि त्यांचे कुटुंबीय 29 सप्टेंबर 1993 ला असेच एका जवळच्या पर्यटन केंद्राला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परत जायचे असा प्लॅन होता. किल्लारी ला भूकंप दुसऱ्या दिवशी सकाळच्या बातम्या मी सवयीप्रमाणे ऐकल्या. त्या दिवशी किल्लारी ला भूकंप झाल्याची पहिली बातमी ही आकाशवाणीने प्रसारित केली होती. सर्व जगाला प्रथम ही माहिती त्यावेळच्या वृत्तसंपादक संज्योत आमोंडीकर यांनी दिली होती. ती ऐकली आणि मी, टाकळकर असे पत्रकार पुण्याला घरी परत यायला तातडीने निघालो आणि तिथून सलग सरळ किल्लारीच्या दिशेने निघालो. वाटेत थांबत मिळेल तिथून फोन करून आपापल्या कार्यालयाच्या प्रमुखांना बातम्यांचे मिळेल तेवढे अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा टेलिफोन हेच एकमेव संपर्काचे माध्यम होते. साधा कॉल करायलाही मोठी कसरत करावी लागायची. नशीब असेल तर एसटीडी कॉल मिळायचा.आठ पट दर असलेला लायटनिंग कॉल खूप खर्चिक होता. पण तरी आवश्यक तेव्हा आम्ही तो करायचो.

किल्लारीत पोहोचून घटनांचे गांभीर्य प्रत्यक्ष पाहून आमच्या सविस्तर आणि लेटेस्ट बातम्या करायला वेळ लागला. परंतु जगाला बातमी देण्यासाठी टप्प्या टप्प्यात आम्हाला यश मिळाले ती सुरुवात झाली होती ती आकाशवाणी केंद्राच्या बातम्यांमुळे.

आकाशवाणी या शासकीय माध्यमात काम करणारे माझे पत्रकार, सहकारी वर्तमानपत्रातील बातमीदारांइतकेच प्रभावीपणे पत्रकारिता करीत असतात हे मी गेली काही वर्षे माध्याम क्षेत्रात प्रसंगानुरूप सांगत आलो आहे. त्याविषयी पुनः केव्हातरी.

प्रा. डॉ. किरण ठाकूर

— लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments