Tuesday, January 7, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३७

दुर्मीळ पुस्तके : ३७

भांगतुरा

महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ, मुंबई मार्फत जून, १९८३ मध्ये प्रकाशित झालेले १७४ पृष्ठांचे मूल्य बत्तीस रुपये असलेले हे डॉ सरोजिनी बाबर यांचे अतिशय दुर्मीळ पुस्तक आहे. डॉ. सरोजिनी बाबर ह्या महाराष्ट्र राज्याच्या लोक साहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे लोकसाहित्यविषयक लेखन सातत्याने चालू होते. सर्वसामान्य लोकांच्यात ऊठबैस करावी, त्यांच्याशी विचारविनिमय करावा, त्यांच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करुन घ्यावी आणि त्यांच्या जवळच्या लोकसाहित्याचा वानवळा गोळा करावा ही त्यांची हौसमौज होती. वीस – पंचवीस वर्षे त्या गावोगावी फिरल्या. खेड्यापाड्यांतील असंख्य घरोघरी गेल्या. तिथल्या स्त्रियांच्या जीवनाशी एकजीव होत त्यांनी सर्व प्रकारचे लोकसाहित्य जमा केले. विषयवार त्याची मांडणी करुन सचित्र असे सर्वांगसुंदर ग्रंथ संपादित केले व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते प्रकाशित केले. त्यांची ही कामगिरी गौरवास्पद आहे. भांगतुर्‍याद्वारे त्यांनी मराठमोळ समाजाचे भावचित्र उभे केले आहे. भांगतुरा हे अंतर्बाह्य नितांत सुंदर असे शारदेचे लेणे आहे.लोककथा आणि लोकगीते यांच्या नाजूक गुंफणीतून निर्माण झालेला ललित निबंधांचा संग्रह आहे. आपल्या संस्कृतीचा मूलस्रोत, इतिहास खेडवळ दंतकथांनी, दिव्य कथांनी, लोकगीतांनी, लोककथांनी जपला आहे.

सरोजनी बाबर

१. भांगतुरा !
गावाकडचं निर्मळ आंगण.. पखंट्या साडीत भुईला लोळणारा पदर सावरणारी लाडकी मैना.. डोईवरच्या पटक्याचा लोढण्यागत शेमला लोळवीत घराचं जोतं चढून वर येणारे बाळ.. ही चिमणी पोरं ओसरीवरच्या दिव्याला हात जोडून म्हणतात, ‘’ दिव्या दिव्या दीपत्कार “.. घराची काया मोहरुन उठते. दिवसभराच्या कामाने आळसवलेलं घर हुषारीत येतं.. घरात पेटलेली चूल, “शंभराचं शिजवीन, लक्षांना पुरवीन, हांडाभर उरवीन, मुली ग मुली “असे पुटपुटत. म्हातारी आजी किंवा मावशी पोरांना दूधभात कालवून देते. पोरं घर डोक्यावर घेतात. जेवता जेवताच गोष्टींचे पेव फुटते. “कुंभारा कुंभारा, दे दे मडकुल्ला.. “अशा भाषेला जोर चढतो. एक म्हातारी मुसळ घेऊन गहू कांडत होती.. उसळते गहू झेलावे म्हणून म्हातारीच्या पायात आभाळ घुटमळतं. त्याला मुसळाचा दणका बसतो. ते घाबरुन जसं वर जातं ते पुन्हा खाली येत नाही.. एक होती चिमणी.. एक होता कावळा.. कावळ्याला हरबरा सापडतो.. तो हरबरा खातो.. चिमणीला मोती सापडतो.. कावळा म्हणतो पाहू मोती.. तो मोती घेऊन उंच उडून जातो.. चिमणी झाडाकडे जाते.. कावळ्याला पाड म्हणते.. झाड ऐकत नाही.. मग ती सुताराकडे जाते.. झाडाला काप म्हणते… सुतार ऐक नाही.. मग अशा मालिकेत गोष्टीला रंग चढत जातो. मुलं ओसरीवर आजोबांच्या भोवती तरंगत सुटतात.. “तुझं नाव काय.. तालिमतोला.. खातोस काय?.. भाजीपाला… “.. आजीचीही गोष्ट लोकगीतातून रंगात येते.. ती आंब्याच्या मोहराचं लोणचं दिराला वाढते.. दिराने दिलेले चुडे ती खेळताना वाढविते.. सासू तिला धपाटे घालते.. तिचे आसवे गळतात ते ती तांब्यात भरते.. तो तांब्या ती गंगेत सोडते.. गंगा तिला उदक देते.. ते ती कुडाला पाजते.. कुड तिला काठी देते.. ती बुरडाला आणून देते.. बुरड तिला परडी देतो.. ती परडी माळ्याला देते.. माळी तिला फुलं देतो.. ती फुले पार्वतीच्या ईश्वराला वाहते.. अशी कहाणी रंगत जाते.. मग समुद्राची गोष्ट.. काठावर पीठच पीठ.. पण घ्यायचे जरुरीपुरतेच… एक बाई मात्र चार सहा दिवसांचं पीठ घेऊन जाते. परिणाम असा की चंद्र उरलेल्या पीठात लोळतो.. सगळं पीठ नाहीसं होतं.. उरते फक्त वाळू… तेवढ्यात आजोबा पोरांना हावळा खायला देत मोत्यांचा भांग भरलेल्या, मदब्याची चोळी ल्यालेल्या, जरतारी साडी नेसलेल्या शिरी बाशिंग बांधलेल्या कृष्णदेव रुक्मिणीची गोष्ट सांगतात. भांगतुर्‍याच्या रत्नजडित दागिन्यागत कहाणीला आजोबा आठवणीत घोळवतात.. मग इंद्राची लेकीची गोष्ट सुरु होते.. ती धनगराची बानू होते.. मल्हारीशी तिचे लग्न लागते.. घरची मालकीण एकेकाला धारोष्ण दूध प्यायला बोलविते.. उगवत्या सूर्याच्या साक्षीने दुधतुपाच्या न्याहारीची पंगत आजीच्या भोवती गोळा होते.. “एक होता राजा “,” आटपाट नगर होतं. “अशा भाषेला उत येतो असे ललित सुंदर वर्णन या लेखात केलेले आहे.

२. माहेरचा चंद्र
ध्यानीमनी नसताना हवाहवासा काळजाचा घड जिव्हाळ्याचं बंधूराज लेखिका बघते आणि तिच्या काळजाला थंडाई येते. जन्माला येऊन एकदा तरी बहीणभावांच्या प्रेमाची गोडी चाखावी असे लेखिका म्हणते. त्या चौघीपाचजणींच्या पाठीवर नवसाने उगवलेली चंद्रकोर लाडाकोडात वाढलेली.. शेलापागोट्याचे सोगं भुईला लोळवत हा चाफा चंदन स्वतःहून घरी येईल हे लेखिकेला खरेच वाटत नाही. “पान फूल पुरे, पुरे अक्षता सुपारी, नको शेला जरतारी भाऊराया “,” माझ्या ग माहेरात सदा उघडं ते दार, आल्यागेल्या पाहुणचार होत असे.. “,” हौस मला मोठी बंधूसकट बाजाराची, भैनीच्या ग चोळीसाठी कंठी मोडली हजाराची”असा टेंभा मिरवावा,” माझे की आयुष्य कमी करुनी मारुती, घाल शंभर पुरती भाईराया.. “अशी त्याच्या सुखाची अपेक्षा करावी.. “घागर्‍या घुळूघुळू दणाणीला माझा सोपा, खेळतो प्राणसखा भाईराया , बंधू राजस बाई खेळे अंगण झालं थोडं, लावीयीली फुलझाडं मामारायांनी “, बाळपणीच्या या आठवणी लेखिका घोळवीत बसते. पाळण्यात जोजवलेल्या सावळ्या सुरतीचा आलाबला घेत, “एका मागं एक नको येऊसा दुडदुडा, माळ्याच्या मळ्यामंदी येसुबंदू हाई थोडा “,” आमी चौघी भैनी एका ग गोठणीच्या, चोळ्या शिवा पैठणीच्या भाऊराया “, भाऊबीजेला “हात भरला काकणानं कान भरले कापानं, ताटी घालीतो मोतीपवळी बंधुराजस हावसेनं”, आईसुध्दा मामारायाबद्दल “चांदण्यासंगट जशी चांदाला येती शोभा, भैनीच्या मेळाव्यात भाऊ राहीला ग उभा “असं बोलणं करते. एक दिवस भैनीभावंडांचा मेळा आईसमोर बसलेला. पुढ्यात गूळशेंगा.. सालपापड्या.. तसे तिला आठवते आणि ती हुंदका देत सांगते.. एक भैन एकदा भावाला भेटायला जाते. भाऊ शेतावर गेलेला असतो. भावजय बस म्हणत नाही. भाईर आली नाही. भैन मनी झुरली. माघारी फिरणार तेवढ्यात भावजय एक गाठुडे आणून देते. तिला वाटते त्यात भाकरतुकडा असेल. वाटेत झाडाखाली ती बघते तर त्यात शेणकूट असतं. तिथून शंकर पार्वतीचे इमान चाललेले असते. ते शेणकूटाच्या सोन्याच्या लाटा करतात. मग तिकडून भाऊ येतो. दोघे गळ्यात पडून रडतात. म्हणून आपण कारणाशिवाय माहेरी जात नाही असे आई सांगते. “आई तंवर माहेर बाप तंवर माझी सत्ता, नको बोलूस दशरथ भाऊराया “, असे बोलण्याची वेळ आणू नये. फक्त त्या सुखाची वाट पहावी. माहेरच्या चंद्राला मामाची राधिका करायची असते. “वहिनीबाई भावजई तुझं बोलणं धसाफसा, माझा कल्याणी आरसा भाऊराया… “ह्या भावजईला मी अशी खुलवीन आणि साता नवसाच्या ह्या चांदाला नीट सांभाळ म्हणीन असे लेखिका सांगते. असे लोकगीतातून भाऊरायावरील प्रेम लेखिकेने सुंदर रीतीने मांडले आहे.

३. तीर्थांचे सागर
“फुलामंदी फूल सये उत्तम चाफ्यायाचं, सुख भोगावं पित्यायाचं “” जाईन माहेरी बाप्पाजींच्या घरा, घुसळीन डेरा अमृताचा “,” आई नको धाडू कधी दुसर्‍याच्या घरी, बये तुझ्या ग हातची गोड कोरडी भाकरी “माहेरघरच्या निरशा दुधाच्या घागरी लेखिका मनानेच भरते व सडा रांगोळी करुन धरित्रीला आळवते. माहेरी जायचं म्हटलं की मन हारखून जातं. “माहेराची वाट कोण पुसती येसवदा, माडी दिसं कळसासुध्दा “. वडील म्हणजे डौलदार आंबा आणि आई म्हणजे गोंडेदार तुळस. दोघांच्या सावलीत झोपेचे सुख भोगायला लेखिका उतावीळ होऊन जाते. “गडणींच्या मेळाव्यात कोण उठून दिसली, हिरवा शालू नेसली मैना माहेरी ग आली”असं म्हणत मन मोकळे होते. “हाती कंगण्या दाटल्या जवे दोरे गजरे गोट, सुभेदारिणी तुझा थाट मैनाबाई “हा डामडौल लेखिकेला हवा असतो. कुलशीलाला कुणी नावं ठेवू नये, वडील घराण्याला कलंक लागू द्यायची नाही असे लेखिका सांगते. “माझे ग मायबाई नको करुस माझी चिंता, दिलीस भाग्यवंता लेक तुझी “,कुठं खटकले तर ” सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, सैल कर माझ्यासाठी भाईराया “असे भावाजवळ मन मोकळे करीन असे लेखिका सांगते. “नाकीच्या नथनीला लावू नये ग टीक फुली, आपुन कुळवंताच्या मुली चंद्रभागे”अशी वागेन. आई भेटली की दोघी पोटभर बोलू. रात्रीचा चंद्र कलता होईपर्यंत त्यांच्या गुजाचा झाडा होणारच नाही.”कारल्याचं आळं लाव ग “कारल्याचं बी लावून तो पार कारल्याची भाजी करुन ती खाऊन होईपर्यंत सासूबाई माहेरी जायला परवानगी देत नाही. सासरच्या वाटेला कुचूकुचू काट्यांचे रान आणि माहेरच्या वाटेला मऊ रेशमी हिरवळ ही भावना भोंडल्याच्या गीताने शिकवलेली. “अक्कण माती चिक्कण माती ओटा तो मळावा “असल्या भावनेनं मनात तेगारानं ठाण मांडलेलं म्हणून त्या कारणानं सासूबाईंनी व मामासाहेबांनी माहेरचं मूळ परत धाडू नये म्हणून लेखिका श्रावणात देवाला नवस बोलते. सासूबाईचा स्वभाव, त्यांना भावनेची असलेली कदर, हौस म्हणून आपला पितांबर नेस म्हणून सुनेला सांगणे, सूनेचं कवतिक म्हणून त्यांचा राग येत नाही. उलट “काय मी पुण्य केलं आईपरी सासूबाई”” काय मी पुण्य केलं बापासारखा सासरा “म्हणून दिमाख मिरवताना अभिमानही वाटतो. पण माहेरी जायचं म्हटलं की सासूबाईचं पित्त उसळतं. जशा काही त्या माहेरी गेल्याच नाही कधी. माहेरचं मूळ दारी सारखं का येतं असे त्या म्हणतात. “शेवया बोटव्यांनी उतरंड्या आगाशी, भाऊ निघाला उपाशी”” घरी वासाचे तांदूळ काय करता असून, सासुरवाशी भैन”” आंब्याच्या सावलीत कोयाळ बोले राधा, उपाशी गेले दादा. “अशी पाळी येते. उद्या बघू तुमच्या लेकीवर हीच वेळ येईल. लेकीत न सुनेत भेदभाव करु नये. आपल्या मुलाबाळांना कुणी नावे ठेवू नये म्हणून आई – वडीलांनी नेहमीच काळजी घ्यावी. एकदा कृष्णदेव मथुरा सोडून संवगड्यांबरोबर गोमांतकात येतो. ते मथुरेत यशोदा माईला कळते नि तिला असा प्रचंड पान्हा फुटतो की ते दूध कृष्णदेवापर्यंत धावतपळत जात. त्यानं कुणाला काही मागू नये आणि तेवढ्यासाठी त्याला कोणी नावं ठेवू नये म्हणून. मातेसारखी सावली नाही. लोकगीतकारांनी वडीलही रंगवले आहे. वडीलांची कर्तबगारी शेतीच्या भरभराटीवरुन सांगितली आहे. सोन्याची अंगठी गव्हाची रास मोजताना हातात शिजून गेली अशी अपूर्वाई ऐकविली आहे. “किती वाट बघू बाप्पाजींच्या ग गाडीची सावली कलली सये उप्पर माळीची “या तीर्थांच्या सागरांना दंडवत घालताना बहीणभाऊ आपल्या नेत्रातील टपोर्‍या मोत्यांची ओंजळ त्यांच्या चरणी अर्पण करतात.

४. प्रीतीचा चंद्रहार
मैत्रिणींच्या घोळ्यामेळ्यात हिरव्या बुट्टीदार शालूतील लेखिका जाईजुईच्या मांडवाखाली बसली होती. काळीज उगीचच उडून गेलं होतं. अनोळखी असलेलं कुणीतरी ओळखीचं व्हायला त्यांच्या आयुष्यात येणार होतं. त्यामुळे कसल्यातरी आनंदाने कल्पना कंपित झाली होती. लहानपणी भावलाभावलीच्या लग्नात उडालेली धांदल लेखिकेला आठवते. “नका हो पैठणी नको मला शालू शेले, भाळ असो भरलेले कुंकवाने “, ” नको मज बिंदी नको तो चंद्रहार, पुरे एक अलंकार मंगळसूत्र “मुळात वळणच असे लावलेले. “सासू कशी सासू कशी, टिचकीनं मारायची पिसू जशी” मग सासरा.. मग दीर.. मग नणंद असले गीत खेळलं जातं. “ते कसे ते कसे, देव्हार्‍यातले देव जसे, मी कशी मी कशी, घरादारातली लक्ष्मी जशी “असला अहंभाव लेखिकेला नको वाटतो. त्यातून सासर द्वाड वाटायला लागते. परक्या मुलखात लगीन झालं की पूर्वी नवर्‍याजवळ नवा कोरा चाबूक द्यायचे. बायकोला ताळ्यावर ठेवावी म्हणून. घरी जावई यावेत ही आईची खूप हौस. “दुरड्याच्या दुरड्या आणलाय भात, याही करी मात विहिनीची “असे गीत झालीच्या कारणाने बासनातून बाहेर पडते. सगळ्याजणी तांदूळ निवडायला बसतात तर “झुन् झुन् वाजंत्री वाजती, म्होरं कळवातनी नाचती, नवरा आला शिवेपाशी, शिवपुंजन देईन, नवरी जितून नेईन”असलं गीत म्हातारी सांगते. लेक सासरी जाईल म्हणून आईचे डोळे पाणावतात. कधी न पाहिलेल्या त्यांना बघीन म्हणताना “उजेड पडयीतो नाक्याच्या कंदीलाचा, हावशा माज्याच्या जर झळकतो मंदीलाचा “अशी कुणाकुणाच्या तोंडून ऐकलेली गीतं लेखिका मनात भरते आणि त्या नादात त्यांना पारखून घेते. “आणीले रुखवत बत्तीस ताटांचे, गोत आहे मोठे नवरीचे”या ओव्यांचा दणका उडून जातो. आता आपण मोठं झाल्याची वार्ता लालचुटुक ओठ सांगतात. नवरीला पुतळी, कानी घालायचा राजकडी, मनीमंगलसूत. पाटली भरपूर बांगड्या, लगीनचुडी, नवर्‍याला राजकडी. घाटलं शेंगा इ. तयारी आईने करुन ठेवलेली. मावशी हौसेने तिच्या हातावर मेंदीची नक्षी रेखते. लग्नाचं तोरण दारावर बांधलं जातं. “घाणा भरीयला पाच कुडवती “गणगोत तिला तांदळाचा, गव्हाचा आणि जिर्‍याहिर्‍याचा घाणा भरतात. “मिरविती वरमाई पाय घड्यावरुनी जाई “ह्या हौसेमौजेबद्दल घर बोलणं करीत होते. “कृष्णदेवजी देवजी नवरा झाला, शिरी बाशिंग तुरा या ल्याला “या शिणगारानं तिचा राजा मिरवत येणार होता. त्याची वाट पाहत नेत्रांच्या चंद्रज्योती लावून ती उभी होती तिच्या उगवत्या चंद्राच्या भेटीला !

५. स्वयंवर
लेखिकेच्या दारीचं तुळशीवृंदावन तिच्या मानानं फारच उंच होतं. त्यामुळे रोज पाणी घालायला हात पुरायचे नाही. दरवर्षी श्रावणात नवीन पायरी बांधुया असे आजी म्हणायची पण तिच्या शब्दाला कोणी जागायचे नाही. दरवर्षी नव्याने स्वयंवराला उभी राहणार्‍या त्या सख्या साजणीशी हवी तशी दोस्ती होणार नाही म्हणून लेखिकेला खुळ्यागत होई. एकदा तुझ्या वृंदावनाला कसला रंग देऊ म्हणून तिची मस्करी करण्याची लहर लेखिकेला येते. “कुंकवान, कुंकूपान, कुंकवाचं नेसणं, अर्धांगी बसणं, लेक कमलावती, सून सभावती, माझा नमस्कार ईश्वर पार्वती “अशी बडबड लेखिका करते. “रुक्मिणीला साडी चोळी, सत्यभामाला दोरवा, तुळशीबाई तुला, थंड पाण्याचा गारवा “हे गीत म्हणताना लेखिका मान वर करते तशी तिला बघून दारीची तुळस खुशीने हेंदकाळते. तिच्या मंजुळा दरवळतात. गोविंदाने तिला फारच चढवून ठेवलय असे लेखिकेला वाटते. “तुळशीच्या बनी कसं झुळुझुळू पाणी, केल्यात आंघुळी नाटक्या ग गोविंदांनी “, ”तुळसाबाई तुझ्या पानाला सुवास, देव गोविंद झाले खूष “, “डोंगर परवत सार्‍या कळसाला सोनं, देव वजनी भरत्याती एक तुळशीचं पान” एवढी दोघांची प्रीत. “तुळशीबाईला नाही कुणी आईबाप, चंद्रभागेतीरी तिचं उगवलं रोप “ तरी कृष्णदेव हिच्यावर फिदा. रखुमाई सांगते, “माझ्या अंगणात उभी तुळस मालन, हिच्या सैंयवराला देव येती चालून “तुळशीची रोज पूजा करायची. उसाच्या मांडवात तिचं लगीन लावून द्यायचं. तिच्याशी गुजगोष्टी कराव्यात. “तुळशीची माती, घेईन बोटी, लावीन पोटी, लेईन लल्लाटी “…

६. शब्दानं शब्द वाढतो.
लगीन निघालं की घरात थोडी बाचाबाची झालीच पाहिजे. लेखिकेच्या मामीच्या राधेचं लगीन झोकात होतं. रुखवताच्या वेळी धमाल उडते. एकेकीने असा उखाणा टाकला की पावण्या – रावळ्यांच्या पाया पडून माफी मागताना भुई थोडी झाली. “आला आला रुखवत, त्यात हुती पुरी, विहीनीच्या नाकापरीस नथीचंच वजन लई भारी “ किष्णावैनीने उखाणा घातल्याबरोबर भडकलेल्या पार्वताबाई उखाणा घेतात, “आला आला रुखवत त्यावर ठेवली चंची न लोकांची डागिनं घालून मिरवितेली पावणी कोंची? “, “आला आला रुखवत, त्यात होता तवा, विहीनीनं लुगडं धुतलंय पानीपतची लढाई झाली तवा “,” आला आला रुखवत, त्यात रुपये होते काठोकाठ, तपकीर वढताना विहीनीला नाकात बोटं घालायची सवय लई भरमसाठ.. असा शब्दाने शब्द वाढत जातो. मंडपातली हवा तंग होते. बापई माणसांनी मधी पडायची वेळ येते. नवरीकडच्या मंडळींचा हिरमोड होऊन जातो. मग उखाण्यांतून एकमेकांची उणीदुणी काढली जातात. शेवटी आई म्हणते, “आला आला रुखवत, रुखवतात चांदीसोन्याचे गडू, नवरा नवरीचं लगीन लावायला आले तेहतीस कोटी देव तर वाट सोडा बघू “ मग लोकांच्या पंगती बसतात. रुखवताच्या सगळ्या दुरड्या पत्रावळीवर मोकळ्या होतात. पंक्तीला वाढताना भैनक्का ज्याला त्याला सांगते, “रुखवत आला रुखवत आला, रुखवतावर मोत्यांचा हार. आमची नवरी लई सुकुमार तर तिला सासुरवास करु नका फार”. नवरा मुलगा मानेनं नाही म्हणतो.

७. ताळेबंदीचा भोवरा
चार दिवसांवर दिवाळी आली. चट्दिशी फराळाचं जमेल म्हणून लेखिका निर्धास्त होते. रुणझुणत्या पाखराबरोबर लेखिका माहेरी निरोप धाडते, “एकापुढं एक मायमालणी तुमचे लेक, मोत्यापवळ्यांचं झालं समींदरी पीक “. नणंदबाई कितीपण तालेवार असू देत इथं काही कमी पडणार नाही. आपल्याजवळ पण दुप्पट कुबेरी व चौपट हौसमौज आहे. दिवाळसण चार लोकात उठून दिसू देऊ या सागाव्याला कशाला भ्यावं? जावायासाठी शेवया, बोटवं, गूळपोळ्या, पुरणपोळ्या आणि वर केळीचं शिकरण असले जिन्नस करण्याचा बेत आखला जातो. पण जावयाने “जेवण जेवतो तूप खिचडी पापड, जावई राजसाला घरला जायाची निकड “असा घोळ घालू नये असे वाटते. जावयाच्या म्हणण्यानुसार जाईजुईचा मंडप घातला होता. मांडवाला केळीच्या मेढी लावून वर भावलं केलं होतं तिथे ऊस गुंफला होता. लेकीच्या पायातील पैंजण बुडतील एवढा गुलालाचा भडीमार केला होता. विहिणीला हळदकुंकवाची पायघडी घातली होती. भर्जरी पैठणी आहेर दिली होती. तिची पोर नाजूक आहे. दृष्ट काढावी अशी सुरेख आहे. “नवर्‍या परास नवरी उजळत, सोन्याचे तिला गोठ शोभतात. “,” करवंदी मोत्यांची नथ लाखाच्या मालकीची, कोवळ्या नाकाची बाळ माझी “, उगवल्या सूर्यागत जावई सारंगधर लग्नमंडपात यायचा म्हणजे लोकांची नजर त्याच्यावरच खिळायची. त्याच्या डामडौलानं उभ्या मांडवाचा जीव हारखून जाईल. मीठ – मोहर्‍यांनी दृष्ट काढता काढता येसबंदाचा तुरा दारी लावणार्‍या मालकांची धांदल उडेल. सावळी सुरत कोमेजून जायला नको. लेण्यानटण्याची फाजील तालेवारी लेखिकेला नको वाटते. माहेरात पाऊल टाकताना मायमालणीनं हौसेने यावं, भाग्यवती होऊन यावे. रायभान बाळाला हिरवा मंदील आणावा. म्हणजे मग लेखिकेचा ताळेबंदीचा भोवरा आपोआप – “शिरी मंदील लेतो बाळराजा देखणा, शहराचा रहाणार खेड्यात झाकेना “, आईच्या परास सासूबाईचा उपकार, सासुमालतीनं दिला पिर्तीचा चंद्रहार”. या दिवाळीला खरा मान जावईबाळाचा !

८. बाळलेणी
आपल्या अंगाखांद्यावर देखण्या बाळानं रमताना खाली उतरत घरभर खेळखेळ मांडला म्हणजे जीव हारखून जातो. बाळराजाला मांडीवर घेऊन गोष्ट सांगावीशी वाटते. त्याच्या कानाशी गीत गुणगुणावंसं वाटतं. त्याचायासंगे खेळ खेळ खेळायची लहर येते. त्यामुळे बाळराज आपल्या जीवनाचं सुखनिधान होतं. बोबड्या बोलाचं लेणं लेत पोरात पोर होऊन आपणही बडबडत सुटतो. “इथं इथं बस रे मोरा, बाळ माझं घालतय वारा “लक्ष देऊन हे गीत ऐकलेले सोनुलं खुदकिनी हसतं, डुलतं, नाचतं किंवा टाळी वाजवीत सुटतं. हसत नाचत गुणगुणावं वाटते, “अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग “ छकुलं हातपाय उडवीत डोळे मिचकावीत बसल्या बसल्याच झोकात नाचते. म्हणावेसे वाटते “अडगुलं मडगुलं.. “. तालासुरात बडबड केली की आणखी लहान वयाचं लेणे ल्यायचा मोह होतो. “सालम सालकी, तुझी माझी पालखी, पालखीत बसू, खोबरे खिसू “. बाळराजं आणखीनच खुलालतं. त्याच्याभोवती जमलेल्या पोरासोरांना मजा वाटते. “दिन दिन दिवाळी… “त्याला ऐकवतात.

९. कुळाचार
“देवाच्या देऊळात दिवा जळतो लोणीयाचा, आत संदूक सोनीयाचा, देवाच्या देऊळात झालं फुलांचं सारवण, रोज हरीचं कीर्तन. “, “दारी तुळशीचं जाळं, दारी चांदीचं घंगाळ, तोच देवाचा वाडा, अल्याड केळीचं बन, पल्याड तुळशी वृंदावन, तोच देवाचा वाडा, मांडव सोन्याचा घातीला, चांदवा मोत्यांचा लावीला, हिर्‍या रत्नांचा जडावा, वाडा देवाचा जपावा “कुलदैवतापुढे आपोआप नतमस्तक व्हावं असे लेखिकेला वाटते. “देवा ज्योतिबाच्या वाटं सारा डोंगर गुजारला, चांगभलं ग म्हणताना गड पन्हाळा हादरला”. देवाच्या दारी दणाणत्या सनई – चौघड्याचा, शिंगाचा आवाज कानात साठवत आणि त्याच्या कीर्तीची ध्वजा हाती घेत मानकर्‍यांची काठी सजवायची लहर येते. वाडवडिलांच्या चालीरीतींचा सराव करावा म्हणून लेखिकेचा जीव धडपडतो. भांगतुर्‍याला लक्ष मोती गुंफलेल्या आणि सौभाग्यचुडा ल्यालेल्या रुक्मिणीच्या घरातील विठू दयाळाचे पाय विटेला कसे गवसले याचा हिशोब होतो. घरातल्या देव्हार्‍यातील कृष्णदेव सांजिवंत होऊन उठतो. आई जगदंबेला साकडं घातलं जातं. घराण्याचे कुळाचार आपोआप पाळले जातात. लोकधर्माची जोपासना होते. भक्तगणांना पाचारण करुन घरी गोंधळ घातला जातो.

१०. पाऊस पावणं दारी आलं
वादळवार्‍यासकट येणाऱ्या पावसाच्या सुरवातीच्या शिडकाव्यानं मनाला एकदम संतोषी येते. त्यावेळी पाऊस पडत्या जमिनीचा सुगंध आला की त्यापुढे इंद्राच्या घरचं सुखदेखील फिक्क पडतं. “पड पड पावसा, माजा पिकूंदे ऊसमळा, बाजूबंद मी लीन येळा “,” वळवाचा पाऊस ग, फळी धरुनी उठयीला, ताईता बंधु राजा, बाळ कुणब्याचा नटयीला “पावसानं दम टाकला तरी वळचणीच्या पन्हाळी टिपकत राहतात. पोरीबाळींनी अंगणात झिरमिरता पाऊस झेलला. कागदाच्या नावा सोडल्या. “देवा मेघरायानं सूर्यासमूर डेरं दिलं, पाऊस पावणं दारी आलं”,” मेघरायाचं लगीन ढगांचा वाजे डफ, आली नवरी झपझप “, “पाणी जाऊं द्या जाऊं द्या, पलाणी पाटाव.. “पाऊसपाण्याची नवलाई ओठांवर खेळते आणि उरीपोटी दाटलेला आनंद कंठात खुलतो. “पाऊस पडला पडला, वल्या झाल्यात जमिनी, शेती जाती कामिनी पेरणीला “पावसाकारणानं उभ्या राहिलेल्या समाधानाचा पारावार उरत नाही असे लेखिका नमूद करते. अस्मान ठेंगणं होत खाली येतं. श्रावणमास जवळ आल्याने लेकीबाळी माहेरी यायच्या कशा याची चिंता पडते. “भरली कृष्णा कोयना, कोयना हाथोडी खडाफोडी, बंधू दंडानं पाणी तोडी”आषाढी वारीसाठी पंढरीला जाणाऱ्यांच्या मुखी घोष चालतो. “भरली चंद्रभागा नावा लागल्या बुडायला, र्‍हाई रुक्मीन आली पुढं नारळ सोडायला. “, ” पाऊस पडतो भरले नदीनाले, भाईराज अडकले पैलतीरा “पाऊस दम टाकतो. नदीनाले ओसरु लागतात. “पूर ओसरले नदीनाले शांत झाले, अजून का न आले भाईराज”,” वाजे चौघडा रुणझुण, आला ग हादगा पावणा, दारी तुळस दवणा”

११. फुलवरा : धुरपाय शिणगार
दारात पाऊस सुप्पानं ओतत होता तरी झुंजुरकाचाच धुरपायचा गळा सजला. “रानामागली तुळस, पाना फुलांनी फुलली, पुतळ्यांच्या भारंभार, गवर कशी ग लवली “, “कराड कोलापूरच्या गौराय, निगाल्या म्हायारी, त्येंच्या ग पैंजनाचा नाद, येतूया दुयेरी “गौरी गणपतीच्या दिवसात “घागर घुमूं दे घुमूं दे, रामा पवा वाजूं दे”असे गळे सजतात. गोरीपान धुरपाय ही लेखिकेची चुलत चुलत आत्या. तिला लेखिका चांगलं लुगडं नेसायला सांगते तशी ती गुणगुणते ”पाऊस पडला चिखल झाला, व्हात आली गंगा, गौराय पावनीला जेवायला, भाजी – भाकरी सांगा. “दोन दिवस गौराय पावनी येणार. ती जाबा तेरडा, परसदारीची फुलं, आघाडा, दूर्वा, चाफ्याची फुले, कन्हेरीच्या फुलांचे झुबके आणायला सांगते. फुलवरा सजवते.

१२. गावाकडची दिवाळी
गोठ्यातल्या दावणीच्या गाईवासरांना सोमू मोगरेल तेलानं चोळून आंघोळ घातलेली पाहून त्यांच्या तात्याला सारं गाव हसायचं. कावेने रंगवलेल्या गाईवासरांच्या शिंगाला बेगडेच्या चांदण्यांची वाहवा व्हायची. चंदनाच्या उटीनं गाईवासरांचे हातपाय मा खायचे. तात्या लोकांना सांगायचा की त्या गाई त्यांच्या घरच्या लक्ष्मी आहेत. त्यांची व्यवस्थित पूजा नको का करायला? तात्या त्यांना धूपदीप करुन फुलांच्या गजर्‍याने नटवत रहायचे. गाईवासरांच्या पाऊलांनी लेखिकेच्या घरी दिवाळी यायची. सगळीकडे आनंदीआनंद व्हायचा. वसुबारसेच्या दिवशी पंचारती घेऊन गाईवासरांना ओवाळले जायचे. पुरणावरणाचा निवद दाखवायचे व नमस्कार करायचे. लेखिकेच्या घरात सगळ्यात अगोदर गोड्यातेलाच्या पणत्यांची ओळ पहिल्यांदा गोठ्यात चमचमायची. अंगणात “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वोवाळी “तालासुरात सुरावट फेकीत “टिपक्या दांड्या नम नम करे ss”या गीतावर काठ्यांचा नाच घालत गाई वासरांपुढे रंगभोगाची पूजा मांडली जायची. गोकूळचा गौळवाडा त्यांच्या घरी येऊन ठेपायचा. मंजुळा आजी यायची. ती गौळणींसाठी कट्टा थापायची. बळीराजा मांडला जायचा. ठिपक्यांच्या रांगोळ्यांनी अंगण शोभिवंत व्हायचं. थोरल्या बायकांच्या हाताखाली फराळाचं करताना लेखिका राबायची. बारक्या पोराला आकाशदिवा करायला मदत करायची. दारी आकाशदिवा आला की घरात भाग्यलक्ष्मी येते. “लक्ष्मीआई आली तू आल्याली जाऊ नको, बाळ राजसाच्या माज्या घरला पालव सोडू नको “अशी जात्यावर गाणी व्हायची. आमच्या शेतवाडीला बरकत येऊ दे अशा घोकण्या घातल्या जायच्या. “दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार “असली गीतं बडबडत खेळायचे व फुलबाजा, चंद्रज्योती आणि फटाक्यांची धमाल उडून जायची. धनतेरसला पहाटेचे उजाडायच्या आत गरम पाण्याने तेल उटण्यासकट वासाच्या साबणानं केलेली आंघोळ घमघमायची. फराळाचे पोटभर खाऊन फटाके लावायचे. मामा ब्रम्हपूजा करायचे. केळीच्या पानावर मातीचा घडा ठेवून त्याची पूजा करायचे. सोनं नाणं, अलंकार, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणपती, कुबेर देवांच्या पूजा निघायची. नरक चतुर्दशीला दारात शेणाच्या थापलेल्या नरकासुरावर घरातला केरवारा फेकून दिला जायचा. मंगलस्नान करुन देवांना, वडीलधारी मंडळींना नमस्कार केला जायचा. लक्ष्मीपूजनला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची पूजा व्हायची. दौत, रुपाया आणि वही पुजली जायची. रात्रभर सोंगट्या, पत्ते व सारीपाट खेळले जायचे. पाडव्याला आई ओवाळायची.भाऊबीजेला खरी गंमत येई. “अंगड्या टोपड्यांनी पेठ करिती झगाझगा, भाचा मामाचा टोपीजोगा “ असे जिकडेतिकडे ऐकू येई. “दिवाळीच्या दिशी माझं ताट लागे जड, सावळा बंधुराया घाली वाक्यांचे जोड “.. भाऊबीजेच्या झोकानं सुख त्यांच्या घरी उतरत.

१३. चैत्रांगण
सूर्यदेव दारी यायच्या आत लेखिकेच्या घरी सडा रांगोळी झालीच पाहिजे असा त्यांच्या सदाफुली काशी मावशीचा तगादा असायचा. भल्या पहाटे कोंबडं आरवलं व बायकांनी माजघरातल्या जात्यावर बसत ओव्यांचा भडीमार केला की लेखिका लगबगीने उठायची. रांगोळी घालायची. चैत्रगौरी आल्या की देव्हार्‍याजवळ रेशीम बैठकीवर केशर चंदनाच्या शिडकाव्याने व पानाफुलांनी शिणगारलेल्या गौरीला मांडले जाई. चैत्रांगण नावाची रांगोळी काढली जाई. हळदीकुंकवाच्या दिवशी शिकेकाई नहाणं व्हायचं. केस धुपवले जायचे. आवळा, माका यांच्या घरगुती तेलात वाळा, गव्हल्याचा कचरा मिसळला जायचा. एखाद्या लग्नकार्यासारखी हळदी कुंकवाच्या समारंभाला कशी लगबग चालायची, गर्दी, धांदल याचं ललित सुंदर वर्णन या लेखात केलेले आहे.

१४. संन्याशाचा बाळ
आळंदीला गेलं की इंद्रायणीला नारळ, पानफूल व्हावं,तिथल्या तुळशी सख्यांशी गुजगोष्टी कराव्या व वाटेने दिंडीतल्या आळंदीकरांकडे ज्ञानदेवाची विचारपूस करावी असा मनोभाव घेऊन लेखिका आळंदीला गेली होती. गर्दीतून वाट काढत त्या पुढे गेल्या तर त्यांना ज्ञानदेवाची तसबीर दिसते. “सोन्याच्या मुद्रुका देवा ज्ञानूबाच्या गाली, मुरदुंग वाजवितो पाची बोटांची टाळी “, आळंदी गावामंदी देवा ज्ञानोबाचं ठाणं, दारी सोन्याचा पिंपळ त्याला जडावाचं पान “,” आळंदीच्या पारावरी सांडली कसली फुलं, भैन मुक्ताबाई बोलं आमी संन्यासाची बाळं”असं लेखिकेचं मन पुटपुटते.तिथला हरिकीर्तनाचा सोहळा लेखिका पाहते. चांदीचा नक्षीदार दरवाजा ओलांडून त्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. ज्ञानदेवांच्या समाधीपुढे नतमस्तक होत त्या विठ्ठलरखमाईला हात जोडतात. त्यांना आळंदी गावाचा महिमा ऐकावासा वाटतो. ओव्यांमधून तिथल्या एकेक आख्यायिका ऐकतात. तिथे चांगदेव वाघावर स्वार होऊन कसे आले होते. ज्ञानोबारायांनी भिंती कशा चालविल्या होत्या. रेड्याच्या मुखी चारी वेद कसे बोलविले होते.चंदनाची उटी वाट्या भरभरुन ज्ञानदेवांच्या अंगावर चढवतानाचे अप्रूप लेखिका अनुभवते. अठ्ठावीस युगं विटेवरी उभं असलेलं आळंदीतील सावळ्या पांडुरंगाचे ध्यान ज्ञानदेवासाठी खाली उतरुन सभामंडपात येते. ज्ञानदेव महाराज अभंग संकीर्तन करताहेत आणि विठूदेव त्यातलं एकेक टिपून घेत बसलेले आहेत असे लोकांनी बघितले होते. स्वत: रखुमाईनं साधुसंतांच्या पंक्ती बसविला होत्या. आळंदी नगरी तेव्हा धन्य झाली होती.

१५. कल्लोळले हरिनाम
टाळमृदंगाच्या साथीत रंगलेलं भजन कीर्तन राऊळात शिगेला जाऊन पोचते. विठूदेव अठ्ठावीस युगं पायाखाली ठेवलेली भाग्याची वीट सोडून खाली उतरला. कल्लोळलेल्या हरिनामाचा दाट गजर होतो. ज्ञानदेव दाराशी आले तेव्हा विठूदेव स्वत:त्यांना सामोरे जातात. हरिनामात दंग झालेल्या जनलोकांची ब्रम्हानंदी टाळी लागली आणि कवित्व स्फुरले.. शब्दांचा मळा फुलला… हातात जाईजुईचा झुंबडा घेतलेल्या पंढरीरायाने आपल्या खांद्यावर वीणा घेतली. समोर तुळशीमंजिरीच्या व बुक्क्याच्या पायघड्या फेकीत ज्ञानदेवाला म्हटलं की, “ बाळा, अभंग बोलावा “. ज्ञानराज धीरगंभीर वृत्तीने विठूदेवाला दंडवत घालत बोलतात, “माझा मर्‍हाठाचि बोलु कवतुके |परी अमृतातेहि पैजा जिंके |ऐसी अक्षरे रसिके |मेळवीन|… या प्रसंगाचं ललित सुंदर शब्दचित्र लेखिकेने या लेखात मांडले आहे.

विलास कुडके.

— लेखन : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Purnima anand shende on “तू”
अजित महाडकर, ठाणे on श्रीकांत सिनकर : एक अवलिया
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “हरिभाऊ विश्वनाथ” : गौरवशाली वाटचाल
Prashant Thorat GURUKRUPA on हवा हवाई : १८
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : २०