आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ.
वयाच्या प्रत्येक क्षणांचा
आनंद तू घेऊन बघ
लहान असताना खेळून घे,
मोठं झाल्यावर बागडून घे,
वयात आल्यावर त्या गोड गुलाबी
दिवसांमध्ये स्वतःला हरवून घे
म्हातारपण आल्यावर,
पुन्हा तरुण होण्यासाठी धडपडण्यापेक्षा,
म्हातारपणाची मजा अनुभवून बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर,
आरशात बघताना त्या त्या वयाच्या
अस्तित्वाला स्वीकारून बघ
वय वाढेल तसा शरीरात बदल हा होणारच,
सुरकुत्यांचे जाळं येणारच,
त्याचा सामना करून बघ
जाड बारीक याचा विचार करून,
मनाला कोसू नकोस
त्या त्या शारीरिक घडनीत,
डौलदारपणा शोधून बघ
शरीरा पेक्षा मनाची सुंदरता असायला हवी,
हे मनाला पटवून देताना,
स्वतःच स्वतःच्या प्रेमात एकदा पडून बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ
नवनवीन आजारपण लागतील मागे,
घाबरू नकोस वेळेत गोळ्या, औषध घेतानाच,
थोडासा व्यायामाचा, योगाचा ध्यास घेऊन बघ
निदान पंचेचाळीस मिनिटे,
फेरफटका मारलाच पाहिजे,
हे मनावर बिंबवून बघ
घे मस्त मोकळा श्वास, प्राणायमाचा ध्यास,
मग तुलाही आवडू लागेल ग्रीन ज्यूसचा वास
नुसतच तेलकट, तुपकट खाण्यापेक्षा,
कधीकधी सूपज्यूसचा,
मनमुराद आनंद घेऊन बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ
गृहिणी असशील तर,
घरातलं उरकताना, कुटुंबाला सांभाळताना,
स्वतःलाही थोडा वेळ देऊन बघ
कितीही राबलीस तरी,
तू तिथेच असणार आहेस,
कौतुकाच्या दोन शब्दांसाठी,
नेहमीच आतुर असणार आहेस
आणि नोकरदार असशील तर,
कितीही मनापासून काम केलंस,
प्रामाणिकपणा दाखविलास तरी,
चांगलं म्हणण्यापेक्षा बोचणारेच भेटतील
मानसिक टेन्शन घेऊन मग,
लढावही लागेल एकटीलाच
तेव्हा कुठलंही अवॉर्ड
माझ्या तब्येतीपेक्षा मोठं नक्कीच नाही,
हे मनाला पटवून बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ
एकदा का वयाची पन्नाशी पार झाली की,
मनाला पटेल तसं, आवडेल तसं जगून बघ
ढोपरं दुखतील ,कंबर दुखेल,
तेव्हा बाम लाव, शेक घे,
पण मस्त पिकनिकला जाऊन बघ
जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात,
पुन्हा एकदा तो भूतकाळ आठवताना,
पुन्हा लहान होऊन बघ
मनाला वाटलं तर थोडं चमचमीत खा,
नवनवीन पदार्थ चाखून बघ
पाणीपुरी, शेवपुरी खाताना तृप्त ढेकर दे
मनमुराद हसताना, बागडताना,
पुन्हा लहानपण जगून बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ
मुक्त जगताना आयुष्यात येतील
अनेक खाचखळगे, तेव्हा सुखदुःख वाटून घेताना,
काही चांगली काही वाईट माणसं भेटतील.
भाऊक होऊन वाईट कोल्ह्यांच्या जाळ्यात
अडकू नकोस, स्वतःच्या शीलाची चाळण करू नकोस
स्त्री म्हणून देवाने हे मोठं धन दिलं आहे तुला,
त्याची जबाबदारी ही तुझीच आहे,
हे मनाला पटवून बघ
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ.
इतरांच्या विचारांचा, सल्ल्यांचा
फार विचार न करता
मनात कुठलंही मळभ दाटू न देता
मोकळं, स्वच्छंदी फिनिक्स पक्षासारखं,
उंच उंच उडून बघ
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर,
तू स्वतःला घडवू शकतेस
हा मनाला विश्वास देऊन बघ
मग तुझी तूच सापडशील स्वतःला
आयुष्य खूपच सुंदर आहे,
तू भरभरून जगून तर बघ.
— रचना : शिवानी गोंडाळ.
मेकअप आर्टिस्ट, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
फारच सुंदर कविता…..खुप छान….