भोपळ्याचे मांजर
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे जिकडे तिकडे वाळलेले भोपळे, दोडके, बेलफळं असे बरेच काही मिळण्याचे दिवस. या फळांचे आकार फारच सुंदर वैविध्यपूर्ण असतात.
या फळांचे आकार पाहून आकर्षक सुंदर कलाकृती तयार करावी हे पाहणाऱ्यांच्या मनात नक्कीच येत असणार. पण नेमके करावे तरी काय ? ह्याच वाळलेल्या भोपळ्याची मनीम्याऊ आपण तयार करणार आहोत.
त्यासाठी साधारण चंबूच्या आकाराचा वाळलेला दूधीभोपळा घ्यावा. देठाचा भाग कापून बिया काढून स्वच्छ करावा. त्यामध्ये रेती भरून तो जड करावा म्हणजे कलंडणार नाही. शिंपल्यांचे पाय तयार करावेत. त्यानंतर वाळलेले बेलफळ घेऊन निमुळत्या भागावर डोक्याप्रमाणे फेव्हीकॉलने चिकटवावे. बेलफळ न मिळाल्यास एखादा चेंडू घ्यावा. मांजरीचे कान तयार करण्यासाठी जाड पांढरा कागद कानांच्या आकाराने कापून चिकटवावा. त्यानंतर शेपटी तयार करण्यासाठी जाड तार घेऊन त्यावर कापूस चिकटवावा. ही मांजर आता पांढऱ्या रंगात ऑईलपेंटने रंगवावी. त्यावर काळ्या रंगाने नाक डोळे व अंगावरील पट्टे पेंट करावेत.
एवढे केल्यानंतर एक घुंगरू लावलेला मखमली पट्टा मांजरीच्या गळ्यात बांधावा. पट्टा बांधल्याने गळ्याजवळील जोडही दिसणार नाही. ही पांढरीशुभ्र मांजर सर्वांना हवीहवीशी वाटेल हेही तितकेच खरे. कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही एवढी आकर्षक आणि मजेदार.
— लेखन : अरुणा गर्जे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नाविन्यपूर्ण कल्पना.