नमस्कार मंडळी,
१० जून रोजी आपण नेत्रदान विशेषांक प्रकाशित केला त्यास वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. आठवड्यातील निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
कळावे, लोभ असावा.
आपली, टीम एनएसटी
नमस्कार.
न्युजस्टोरीटुडे वेबपोर्टल वरील साहित्य वाचले. एक अनोखी म्हणजेच वेगळी संवेदना जाणवली. यातील साहित्य पारंपरिक चौकटीतील नसून विविध मानवी अंगांना स्पर्शणारे आहे. आपल्या सामाजिक, मानसिक व वैचारिक कक्षा रुंदावणारे हे निवडक साहित्य आहे आणि म्हणूनच मला येथे माझे मत एका वाचकाच्या चष्म्यातून मांडावेसे वाटते.
महाराष्ट्रातील एक रत्न परमपूज्य साने गुरुजींच्या शाळेची यथार्थ ओळख संपादक देवेंद्र भुजबळ यांनी करून दिली आहे. गुरुजींविषयीचे प्रेम व आदर संपादकांच्या मनात किती खोलवर रुजलेले आहे हे त्यांनी जाणीवपूर्वक गुरूजींनी शिकवलेल्या शाळेची माहिती काढून तेथे सहपरिवार प्रत्यक्ष भेट देऊन शाळेविषयी व तिच्या प्रगतीविषयी माहिती तर जाणून घेतलीच पण मुख्यत: तेथील साने गुरूजींनी आपल्या आचरणातून व अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये कसे चांगले बदल घडवून आणले हे सांगून साने गुरूजींच्या व्यक्तिमत्त्वांतील अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे.
सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आदरणीय बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम‘ या चाकोरी बाहेरच्या कादंबरीवरील परिसंवादात साहित्य क्षेत्रांतील मान्यवरांनी फक्त कादंबरीचा आशय, गाभा, शैली, शब्दसामर्थ्य, रचना इत्यादींवर प्रकाश तर टाकला. त्यामुळे ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा रसिक व अभ्यासू वाचकांच्या मनात निर्माण झाली आहे .
मानसीची चित्रकार: शिल्पा निकम ही यशकथा सर्वांनाच विशेषतः स्त्रियांना खूपच उपयुक्त व उद्बोधक ठरावी अशी आहे. ताईंनी त्यांचे जीवनानुभुव सुंदर रीतीने मांडले आहेत. अशा नारीरत्नाची ओळख करून दिल्याबद्दल वेब पोर्टलचे आभार.
‘आम्ही नागपूरकर‘ या तॄप्ती काळे यांच्या लेखामधून महाराष्ट्राची उपराजधानी ऑरेंज सिटी नागपूरच्या विविध प्रेक्षणीय स्थळांची सर्वांगसुंदर माहिती दिली आहे. शांततामय सहजीवन अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणांचे सुयोग्य वर्णन तॄप्तीताईंनी केले आहे. यात अतिशयोक्ती बिलकुलच नाही. कारण माझे बऱ्याच कालावधीसाठी तेथे वास्तव्य होते. नागपूरकारांचा सडेतोड तितकाच मायाळू स्वभाव, सुंदर चालीरीती, जीवनपद्धती, विविध चवदार खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, आदरातिथ्य अनुभवायचे तर एकदा तरी नागपूरला भेट देणे आवश्यक आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रतिभा सराफ यांची ‘तुझीच मी’ ही एक भावगर्भ व भावस्पर्शी गझल खासच जमून आलेली आहे.
थोडक्यात, हे पोर्टल स्थान महती, साहित्यिक कलाकृतीची समीक्षा, नामवंत चित्रकाराचे अनुभवविश्र्व, पर्यटकांसाठी माहिती अशा विविधांगांनी नटलेले आहे. वाचकांनी याचा लाभ तसेच निर्भेळ आनंद घ्यावा ज्याची आजच्या तणावयुक्त काळात नितांत गरज आहे.
मी संपादकांचे इतक्या सुंदर अंकासाठी अभिनंदन करतो तसेच त्यांचे आभारही मानतो.
– प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे.
आम्ही नागपूरकर हा लेख खूप आवडला. विस्तृत माहिती मिळाली. मेघना ताईंचा माहितीपूर्ण लेख वाचला. अमेरिकेतील मराठी शाळा. बरीच माहिती मिळाली आणि तिथल्या मराठी लोकांची मायमराठी बद्दलची तळमळ जाणवली.माझ्या दिराचा मुलगा सुचिर करमरकर याच शाळेत मराठी शिकला. खूप कौतुक वाटतं आणि अभिमान पण 🙏🏻
– वर्षा फाटक
नमस्कार.
10 जून , जागतिक नेत्रदानाविषयी प्रसारीत केलेले न्यूज पोर्टल अतिशय वाचनीय बनले आहे. माननीय देवेंद्र भुजबळ यांनी नेत्रदानाचे महत्त्व पटविण्यासाठी अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि लेख प्रकाशित केले आहेत. “करू या नेत्रदान” हा अवयव दान चळवळीत सतत सक्रिय असलेले सुनील देशपांडे आणि डॉक्टर पुरूषोत्तम पवार यांचा लेख वाचनीय तर आहेच याशिवाय प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा आहे. “नेत्रदानाचे महत्त्व” हा दुसरा लेख संजीव वेलणकर यांचा तर उजेडाचा दीप या लेखात अमरावती येथील हरिना फाउंडेशन बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अवयव दान चळवळीमध्ये अमरावती करांनी नेहमीच योगदान दिले आहे. जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचे छायाचित्र संकलन आणि प्रकाश फासाटे यांची लघुकथा सर्वच वाचनीय ठरले आहेत. 11 जून न्यूज स्टोरी, सर्वच लेख सुंदर आहेत. पु ल देशपांडे यांच्या जयू भाटकर यांनी लिहिलेल्या आठवणी, मानसीची चित्रकार शिल्पा निकम यांची स्टोरी प्रेरक वाटते.
याशिवाय नागपुरातील फुटाळा तलाव, चिल्ड्रन ट्राफिक पार्क, सेमिनरी हिल्स, महाराज बाग, गोरेवाडा तलाव, मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, अंबाझरी तलाव, दीक्षाभूमी आणि आम्ही नागपूरकर हे सर्व लेख वाचनीय आहेत, नागपूर जवळील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र याचा उल्लेख केला असता तर अधिक बरे झाले असते. धन्यवाद. देवेंद्र भुजबळ हे माहिती जनसंपर्क खात्याचे अधिकारी या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सतत लोकांसमोर आहेत. भुजबळ हे सेवानिवृत्त झाले असे वाटतच नाही. त्यांच्या या प्रसार माध्यमाचे स्वागत.

– माधव अटकोरे, ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे, नांदेड.
साने गुरुजी वरील लेखन देवेंद्रजी आपण अतिशय सुंदर लिहिले आहे. गुरुजीचे छोटे-मोठे अनुभव वाचावयास मिळाले. मुख्य म्हणजे तुम्ही शाळेला भेट दिली. खूपच स्तुत्य उपक्रम चालूआहे. खरंच लेख अप्रतिम.
आपणा उभयतांचे मनःपूर्वक
💐💐अभिनंदन💐💐
– सुरेखा गावंडे., कल्याण
नमस्कार.
न्युजस्टोरीटुडे आणि श्री देवेंद्र सरांचे आभार.
मी १९८२ मध्ये काॅलेजच्या वार्षिक अंकात छोटीशी कविता लिहिली होती. आज सरांच्या प्रेरणेने परत काही तरी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे.
एनएसटी हे फक्त साहित्य व कलेशी निगडीत कार्य नसुन बहुरंगी इंद्रधनुष्यच आहे. ज्या मध्ये साहित्य, कविता, गझल बरोबर सामाजिक भान ठेवणाऱ्या गोष्टीवर ही लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कौतुक करावे तितके थोडेच आहे. व्ही सावळाराम यांच्ं हे गाणं मी १९८१ मध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रांवर ऐकायचो. आज ही ते ताजतवानं वाटतं. प्रारब्ध वाचुन आपण पण समाजाला काही देणे लागतो, याची प्रत्येकाला जाणीव होईल. प्रत्येक क्षेत्रातील प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याबद्दलची माहिती दिल्यामुळे त्यातून नविन पिढीसाठी निश्चितच फायदा होईल.( साने गुरुजी / डॉ तात्या राव लहाने / डॉ विद्या डागा ).
नागपूर शहर, अमरावतीचे हरीना फौंडेशनचे कार्य वाचनीय आहे. प्रत्येक व्यक्ती व विषयावर भाष्य करणं शक्य नसुन प्रत्येक विषयच महत्त्वाचा आहे.
याचं सर्व श्रेय जातं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या देवेंद्र भुजबळ सर व त्यांच्या टीमला.
अशीच परीपुर्ण माहिती आम्हा वाचकांपर्यंत मिळत राहो
यासाठी सरांना व त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा.
– लक्ष्मण दारकुंडे, औरंगाबाद.
नगर येथे फिरते मनोरंजन ही कल्पना खूप छान आहे. ते मी पाहिलं आहे. आणि बूथ हॉस्पिटलपण छान आहे. तिथे प्रार्थना घेतल्या शिवाय गोळी पण देत नाही. खूप सिस्टिमॅटीक नियम आहेत.
– कल्पना गव्हाणे, पैठण.
नमस्कार. एका चहाच्या टपरीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, ते :
“दुकान आहे लहान
चहा आहे छान
याल तर हसाल
न आल्यास फसाल”
किती मार्मिक आहे हे वाक्य.
कविवर्य मा विलास जी, यांची ‘कुमारी माता’ छान, अप्रतिम अन् खरोखरच प्रचलीत परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारी आहे.
अभिनंदन व शुभेच्छा.

नंदकुमार रोपळेकर, जेष्ठ पत्रकार, मुंबई.🙏
नमस्कार, सर.आपण दखल घेऊन फिरते मनोरंजन या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती तुमच्या newsstorytoday मार्फत सर्वांन पर्यंत पोहचवली त्या बद्दल आपले खुप धन्यवाद🙏
– हेमंत दंडवते, कलाकार, नगर.
प्रकाश पळशीकरांचा … झुरका…
खरच मनाचा वेध घेऊन गेला … व्यसन… माणसाच्या आयुष्यात किती मोठं संकट उभं करतोय हेच ह्या लेखातून अधोरेखित केलं गेलं आहे. श्रद्धा जी कराळे यांनी आठवणीतील जिव्या सोमा मशे यांच्या वारली चित्रकलेतील बारकावे आणि त्यांना भेटण्याचा अनुभव अगदी सुंदर शब्दांत वर्णन केलं आहे.
श्री हेमंत जी दंडवते यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच सुमधूर आवाजातून गायलेल्या सदाबहार गाण्यांच्या “संगीत कला फिरता मंच” ह्या गीत संगीताच्या कार्यक्रमातून नक्कीच ह्या कोरोना महामारीच्या काळात हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या मनावरचा ताण-तणाव आणि मानसिक दृष्टया खचलेल्या त्या बांधवांना एक आनंद देणारा आणि मनावरचा ताण-तणाव कमी करणारा क्षण ठरेल एवढं मात्र नक्की आणि त्यातच बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांनी स्वतः आपल्या आवाजात प्रार्थना गीत गात… ह्या सुंदर आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमाचं उद्घाटन करून आपलं कर्तव्य पार पाडलं त्या बद्दल त्यांच कौतुक करावं तितकं थोडंच आहे. 🙏

अनिल घरत (पिरकोन, उरण,रायगड)
‘वैरी ‘या कवितेची संकल्पना आवडली. खरोखरीच जग आपले वैरी आहे असे आपल्याला भासत असते. पण खरे वैरी आपणच असतो. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बरेचदा असे होते की दुसरा वागतो, तसेच आपणही कोणत्या तरी परिस्थितीत वागलेले असतो.
आपण आपल्याला समजून घेतले तर जगातील अर्धी बडबड कमी होईल. कोरोनाच्या काळातील फिरते मनोरंजन हा लेख वाचला. रुग्णांना मनोरंजनाची खरेच गरज असते. कोरोना झालेल्या व्यक्तींना तर कोणी भेटायला देखील येत नाही. एकटे पडतात बिचारे !
मुझिक थेरपीने त्यांच्यात फरक होत असेल तर हा उपक्रम खूपच चांगला आहे. हॉस्पिटल मध्ये जाऊन कार्यक्रम करायलाही धैर्य लागते. १२.६.२१ चा सगळा अंक वाचला. साने गुरुजींची शाळा हा लेख आवडला.

– मेघना साने, ठाणे.
नेत्रदान विशेष खूपच सुंदर.
मानसीची चित्रकार आणि आम्ही नागपुरकर वाचले अप्रतिम.
सीमा वैद्य, ठाणे
“श्यामची आई”, साने गुरुजी यांचे हे पुस्तक मी खूपदा वाचले. बालपणीचा श्याम, आणि त्यांचे महान व्यक्तिमत्व व अजरामर कार्य, अविस्मरणीय आहे. भुजबळ सरांनी, शाळेचे व गुरुजींच्या कक्षाचे चित्रीकरण लेखात दिल्याने, वाचकांस त्यांचे दर्शन घडले. धन्यवाद🙏खूपच छान !

वर्षां भाबल, नवी मुंबई
जीवन प्रवास, वैरी कविता, झुरका लेख खूप सुंदर आहे.
महामारी लेखमाला अतिशय सुंदर आणि सखोल माहिती देणारी आहे. कुमारी माता आणि ओठांवरचे गाणे सुरेख शलेख📰 आहे
डोळे कविता खुप सुंदर आहे आणि निवडक कवितेतील सर्व कविता खुप छान आहेत.
प्रारब्ध कथा छान आहे, नेत्रदाननाचे महत्व छान आहे साने गुरुजी हा लेख आणि माहिती सुंदर आहे, विदर्भातील अगदी बरोबर आहे माहिती, तुझीच मी कविता खुप छान आहे 🙏
– स्मिता शेटे, मुंबई.
सायकल वरचे तिन्ही लेख माहितीपूर्ण आणि रंजक आणि रश्मी मॅडम आठवणी कविता पण खूप छान👌🏼
खूपच छान विचार. अभिनंदन अभिजीत बांगर साहेबांचे आणि ते आमच्या पर्यंत newsstorytoday माध्यमातून पोहोचवल्या बद्दल देवेन्द्र सरांचे💐💐 मी नासिककर भन्नाट. काय लिहिलंय अप्रतिम. पूर्ण नाशिकमय वाटायला लागलं. खूप छान. विलास कुडके ना खूप खूप शुभेच्छा. पूर्णिमा मॅडम यांनी सासऱ्यानबद्धल खूप छान शब्द बद्ध केलं आहे. अमेरिकेतल्या मराठी माणसांची कामगिरी वाचून क्षणाक्षणाला उत्सुकता ताणत होती. खूप छान वाटलं. वाचून त्रिवार अभिनंदन आपल्या मराठी जनांचे💐 साने गुरुजींचा लेख खूप आवडला आणि तुझीच मी कविता ही खूप सुरेख.

– शुभदा रामधरणे, वाशी, नवीमुंबई.
तीही एक माता असते ! मस्त जमली आहे कविता.
गंगा जमुना रसग्रहण 👌👌 आपल्या काळात घेऊन गेलं. दंडवते ग्रेट 🙏🙏. युवंता अजून वाचली नाही
पण वाचावी वाटली परीक्षण वाचलं. डॉ डागा खूप प्रेरणादायी आहेत. ओठावरच गाणं खूप काही देऊन गेलं. जिव्या सोमा मशे परिचय कळला.
अश्या प्रसिद्धी न लाभलेल्या व्यक्तींचा परिचय हा प्लॅटफॉर्म घडवून आणतो ही वाचकांसाठी मेजवानीच. सावरकरांच्या कार्याचा मागोवा नवीन काही माहिती देऊन गेला. अगदी जागतिक नेत्रदान दिनादिवशी लेख प्रसिद्ध करून समय सूचकता साधली. मस्त. लेख परिपूर्ण आहे. नुसते नेत्रदानाचे आव्हान नसून त्याविषयी शात्रशुद्ध माहिती दिली आहे त्याचे महत्त्व अधिक आहे. नेत्रदान संशोधनासाठी उपयोगी होऊ शकते ही नवीन संकल्पना मांडली आहे. मृत्यू नंतर कार्निया कसा जपावा ही माहिती तर खूप उपयुक्त. सज्ञानाना डोळस करणारा लेख.👍

– मृदुला चिटणीस, सानपाडा, नवीमुंबई
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा मागोवा घेताना, श्रीयुत दामलेंनी चिकाटीने अथक परिश्रम केलेत. सध्याच्या कोरोना काळात समाजातील ताणतणाव कमी करण्यासाठी, श्रीयुत दंडवते ह्यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्यक्रम राबविला जातो तो खरच स्तुत्य आहे.
श्रीयुत भुजबळ सर आपण ह्या कार्याची दखल घेतलीत त्याबद्दल आपले आभार निः स्वार्थी पणे रुग्णसेवा करणाऱ्या थोर डॉक्टर विद्या डागा आणि कुटुंबीयांना सलाम. ह्यांच्या कार्याच्या गौरवार्थ शब्दही अपुरेच आहेत. त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी
आमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या बद्दल भुजबळ सर तुमचे मनापासून धन्यवाद.
सुनील देशपांडे आणि पुरुषोत्तम पवार ह्यांनी श्रेष्ठ अश्या नेञदानाविषयी खूपच छान माहिती दिली आहे. समुपदेशनाने शंकानिरसन ही झाले. “प्रारब्ध ” ….हृदयस्पर्शी कथा. संपूर्ण कुटुंब अंध असणं ह्या पेक्षा मोठं दुर्दैव नाही. श्री प्रकाश फासाटे तुम्ही तुमच्या लेखाद्वारे, नेञदानाची किती गरज आहे ह्याची जाणीव करून दिलीत. कष्टमय जीवन… लिखाण रंगतदार होत चाललंय. छान पुस्तक तयार होईल. अखेरचा झुरका मारून व्यसनावर विजय मिळवणाऱ्या
पळशीकरांचे कौतुक.

– दमयंती पाटील, पनवेल
