“ग्लास पेंटींग”
कोणतेही पेंटींग करायचे झाल्यास ड्रॉईंग चांगलेच असावे लागते अशातला काही भाग नाही. हे खरं वाटत नाहीय ना ? तर सांगते, कसं ते !
हाताने चित्र रेखाटता येत नसले तरी एखादे चांगले चित्र ट्रेस करणे तर बहूतेक सर्वांनाच करता येते. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आवडणारे एखादे नुसते आऊटलाईन असलेले चित्र व त्याच आकाराची काच घ्यावी. नंतर त्या काचेवर पांढरा ऑईलपेंट किंवा आपल्या आवडीचा फिक्कट रंग एका बाजूने अगदी पूर्णपणे प्लेन लावून घ्यावा. तो चांगला सुकू द्यावा, जेणेकरून हाताला लागणार नाही.
आता रंग दिला त्याच बाजूने आपणास जे चित्र काचेवर पेंट करायचे आहे ते अगदी तसेच कार्बन पेपरच्या साह्याने जसेच्या तसे ट्रेस करावे.
अर्थात जे चित्रकार आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही. ते असे हाताने सुद्धा काढू शकतील. आता एक जाड पण टोकदार सुई घेऊन त्या सुईने जे चित्र ट्रेस केले त्या चित्रांच्या रेघांवरील रंग कोरून काढून टाकावा. रंग कोरून काढल्यानंतर चित्र जसेच्या तसे दुसऱ्या बाजूने दिसू लागेल.
आता काचेला आधी ज्या बाजूने रंग दिला होता त्याच बाजूने डार्क रंगाने प्लेन रंगवावे. असे रंगविल्याने कोरलेल्या रेघात रंग जाऊन बसेल आणि आपण काढलेले चित्र उठावदारपणे दिसू लागेल.
एवढे सुंदर चित्र ब्रशने रेखाटने कठीण आहे. पण अगदी कमी श्रमात तेही अगदी सहज ग्लास पेंटींग केल्याचा आनंद काही औरच. तर घेणार ना आपण हा आनंद ?
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800