तीन वर्षांपूर्वी आपल्या पोर्टलवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुण्याजवळ सुरू केलेल्या स्नेहवन या निवासी शाळेची माहिती देण्यात आली होती.
कॉम्पुटर इंजिनियर असलेले अशोक देशमाने यांनी त्यांची चांगली नोकरी सोडून ही संस्था उभारली. बघता बघता या संस्थेला चांगलाच लोकाश्रय मिळू लागला आहे. याचेच फलित म्हणून श्री अशोक देशमाने हे 25 जून ते 22 जुलै अमेरिकेला जाणार आहेत.
या दौऱ्याविषयी अधिक माहिती देताना श्री अशोक देशमाने म्हणाले, “श्री प्रशांत मेंडकी दादांनी स्नेहवनचे काम अमित लिमये दादा आणि शेफाली वैद्य ताईंकडून ऐकले होते. त्यांनी यावर्षी San Jose ला होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या BMM Convention 2024 संमेलनात स्नेहवनला संधी दिली. सिमाताई लोकरे यांनी अमेरिकेला जाण्या-येण्याचे विमान तिकीट काढून दिले. श्रीकांत केकरे दादांनी स्नेहवनवर माहितीपट बनवून दिला. अमेरिकेतील स्नेहीजनांनी त्यांच्या त्यांच्या शहरांमध्ये स्नेहवनची माहिती व्हावी यासाठी छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तेथील प्रवास खर्च त्यांनीच उचलला”.
देशमाने म्हणाले, “अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या तारखा खालील प्रमाणे आहेत. तिकडे राहणाऱ्या आपल्या परिचयातील स्नेहीजनांना हे नक्की पाठवा, टॅग करा. त्यांचे आशीर्वाद घ्यायला, त्यांना वैयक्तिक भेटायला मला खूप आनंद होईल. शेफाली ताई, अमित दादा, सीमाताई, प्रशांत दादा, श्रीकांत दादा यांचे मनःपूर्वक आभार. अजून सविस्तर प्रवास लवकरच सांगतो. धन्यवाद.”
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800